जन्म १९५२ चा . शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्रातील पदवी. मुंबईच्या ‘आयआयटी’तून एमएस्सी. १९७९ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ‘स्टोनी ब्रूक’ विद्यापीठातून सैद्धान्तिक कण भौतिकीमधून पीएचडी. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत आणि मुंबई विद्यापीठात पदार्थविज्ञान विषयात प्राध्यापकी. १९९५ मध्ये बंगळूरुच्या ‘आयआयएस्सी’मध्ये रुजू. मधल्या काळात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत मानद प्राध्यापक म्हणून व्याख्याने, १४ पीएचडी आणि तीन एमफिलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि स्वतंत्रपणे संशोधनही. पदार्थवैज्ञानिक डॉ. रोहिणी गोडबोले यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची ही थोडक्यात दखल. पण, माहितीची अशी नुसती जंत्री कारकीर्दीची उंची दाखवू शकत नाही. भारतीय विज्ञान क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांच्या कर्तृत्वाला वेगळी झळाळी मिळालेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. गोडबोले यांचे वडील सरकारी खात्यात उच्च पदावर नोकरीला, तर आई संस्कृतमधील विद्वान. त्यांना आणि त्यांच्या तिन्ही बहिणींना आई-वडिलांनी शिकण्यासाठी कायमच प्रोत्साहन दिले. त्यामुळे डॉ. गोडबोले यांनी आधी सातवीत आणि नंतर राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शिष्यवृत्ती मिळवून, त्या जोरावर शालेय, महाविद्यालयीन आणि नंतर आयआयटीमधील शिक्षणही पूर्ण केले. ‘स्टोनीब्रूक’मध्ये पीएचडी केल्यानंतर त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची वाट निवडली आणि कण भौतिकीमधील अभ्यासाचे जणू व्रत घेतले. विश्वाच्या उत्पत्तीचा आणि पदार्थाच्या मूलभूत रचनेचा शोध घेणाऱ्या प्रयोगांत त्यांचे असणे हे भारतासाठी गौरवाचे होते. ‘सर्न’ या प्रयोगशाळेशीही त्यांचा संबंध होता. ‘हिग्ज बोसोन’मुळे मूलभूत कणांचे चित्र स्पष्ट झाले, तरी कृष्ण पदार्थाचे स्पष्टीकरण मिळणेही आवश्यक असल्याने त्यावरही संशोधन गरजेचे असल्याचे त्यांचे प्रतिपादन होते. मूलभूत कणांसाठीचे पदार्थ प्रारूप पुरेसे नसून, प्रति-पदार्थांवर असलेले पदार्थाच्या वर्चस्वाचे कोडेही सुटायला हवे, असे त्यांचे म्हणणे. नव्या संशोधकांनी ‘मशीन लर्निंग’सारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने या संदर्भातील प्रचंड माहितीचे विश्लेषण करावे, असे त्या सुचवत.

हेही वाचा : संविधानभान : आचारसंहिता: लोकशाहीचे चारित्र्य!

भारतीय विज्ञान जगतातील स्त्री-पुरुष समानतेसाठीही त्या हक्काने पुढाकार घेणाऱ्यांतील एक. त्या दृष्टीने ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्स’मधील ‘इंडियन वुमेन इन सायन्स’ या समितीची त्यांनी केलेली निर्मिती महत्त्वाची. पदार्थविज्ञानातील अनेक शोधनिबंधांप्रमाणेच शंभर भारतीय स्त्री शास्त्रज्ञांचे योगदान अधोरेखित करणारा ‘लीलावतीज् डॉटर्स’ हा ग्रंथही त्यांनी संपादित केला. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन ‘पद्माश्री’ आणि फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने त्यांचा झालेला गौरव खचितच मोठा आणि औचित्यपूर्णही होता.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great personality of physicist rohini godbole css