तत्कालीन नागपूर विद्यापीठाने १९४० मध्ये आपल्या ‘श्रीधर गणेश परांजपे व्याख्यानमाला’मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना व्याख्यानार्थ आमंत्रित केले होते. ती व्याख्याने या विद्यापीठाने त्याचवर्षी ग्रंथरूपात प्रकाशित केली होती. या व्याख्यानमालेत तर्कतीर्थांनी दिलेल्या तीन व्याख्यानांपैकी पहिल्या व्याख्यानाचा विषय ‘धर्मसमीक्षेची भूमिका’ होता. कार्ल मार्क्सने म्हटले होते की, ‘धर्मसमीक्षा हाच सर्व समीक्षांचा खरा आरंभ आहे.’
धर्मसमीक्षा हा मूलत: मानसशास्त्रीय भाग होय. जगात धर्मसमीक्षेचा प्रारंभ अठराव्या शतकात झाला. आज जगात हिंदू, जैन, बौद्ध, यहुदी, ख्रिाश्चन, पारशी, मुसलमान, शीख इत्यादी अनेक धर्म आहेत. त्यांचा स्थापना काळ पाच हजार ते पाचशे वर्षे आहे. नवा धर्म गेल्या अनेक शतकांत निर्माण झालेला नाही. एका अर्थाने नव्या धर्म स्थापनेची शक्यता धूसर दिसते. याचा एक अर्थ मानवी समाज धर्ममुक्तीकडे अग्रेसर आहे. पूर्वी धर्मरूप ईश्वरकेंद्री व ईश्वर संचालित मानले जायचे. आज ते मानवकेंद्री व मानव संचालित होते आहे. तरीही एक लक्षात घेतले पाहिजे की, धर्म नाही असा मानवसमाज जगात अस्तित्वात नाही.
प्रगतिशील समाजात धर्माचे स्वरूप बदलत जाते. ‘जसे लोक, तसे त्यांचे देवधर्म’ या विचाराने हेच स्पष्ट होते. राष्ट्रधर्म, राष्ट्रवाद यांतील संकीर्णता लक्षात येऊन जगात ‘वसुधैवकुटुम्बकम्’चा विचार अस्तित्वात आला. धर्मविकासाच्या प्रवासात आपण पाहतो की, तो अध्यात्माकडून आधिभौतिकतेकडे अग्रेसर आहे. संस्कृती विकासातून धर्मोदय झाला नि म्हणून धर्म हे समाज परिवर्तनाचे साधन बनले. धर्म मानवी भौतिक गरजेतून निर्माण झाला. भावनिक प्रतिसादातून तो प्रचारित झाला. जादूटोणा, मंत्र-तंत्र, कर्मकांड मानवी भौतिक साध्याची साधने बनली. त्यातून अंधश्रद्धा जन्मली. धर्माचे कल्याणीरूप क्षीण होत जाऊन ते शोषणसाधन बनले. त्याची प्रतिक्रिया म्हणून धर्म सुधारणा आवश्यक झाली. धर्म परिवर्तनासाठी धर्मसमीक्षा अनिवार्य झाली. त्यातून धर्माद्वारे मानव विकासाचा, हिताचा विचार दृढ झाला.

दुसऱ्या व्याख्यानाचा विषय होता, ‘धर्मलक्षण व धर्मप्रमाण’. यात तर्कतीर्थांनी धर्माची व्याख्या करत म्हटले आहे की, ‘‘अलौकिक शक्तीच्या कल्पनेवर आधारलेले व श्रेयस्कर मानलेले मानवी आचरण म्हणजे धर्म होय.’’ भारतीय संदर्भात श्रुती, स्मृती, पुराण, वेद हे आदी धर्मग्रंथ होत. ‘चोदनालक्षणऽर्थो धर्म:’ अर्थात उपदेश करणारा तो धर्म. धर्म परंपरात यज्ञसंस्था येथे अस्तित्वात होती. यज्ञसंस्थेतून श्रुती, स्मृती जन्मल्या. स्मृतीतून चातुर्वर्ण्य जन्मला. नंतर धर्मात कर्मकांडाचे प्राबल्य वाढले. त्यातून मग अंधश्रद्धा, शोषण सुरू झाले.

तिसऱ्या व्याख्यानाचा विषय होता, ‘हिंदुधर्माचे स्वरूप’. यात तर्कतीर्थांनी हिंदुधर्माची समीक्षा आजवर त्याच्या तीन धर्मस्वरूपांच्या आधारे झाल्याचे लक्षात आणून दिले आहे – १) ऐहिकवादी, २) पारमार्थिक, ३) उभयवादी. या चर्चेत त्यांनी स्पष्ट केले आहे की, हिंदुधर्माची सामान्य लक्षणे ठरविणे कठीण आहे. धर्मस्वरूप विविधता त्यांचे प्रमुख कारण होय. हिंदुधर्म विकास तीन अवस्थांतून विकसित होत गेला आहे – १) जादू, निसर्ग आराधना, पितृपूजा, २) मानवसदृश देवपूजा, ३) एकेश्वरवाद, ब्रह्मवाद व तत्त्ववाद. हिंदुधर्म विकास वा इतिहास लक्षात घेता, दैवी व मानवी अशा स्वरूपातून तो निर्माण झाला असल्याचे सांगितले जाते. तो विविध अवस्थांतून विकसित झाला आहे – वेद उपनिषद, स्मृती, श्रुती, ब्रह्मसूत्रे, पूर्वमीमांसा, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पुराणे इ. या धर्माचे प्रमाण आधार ग्रंथ होत. हा धर्म अनेक धर्मीय आक्रमणानंतरही सुरक्षित आहे. आधुनिक काळात ब्रह्मसमाज, आर्यसमाज इ. चळवळींतून यांच्या विकासाचे प्रयत्न झाले आहेत. त्याचीही समीक्षा इतिहासात वेळोवेळी झाली आहे. अध्यात्मवाद आणि भौतिकवाद दोन्हींच्या आधारे हिंदुधर्माची समीक्षा व स्वरूपाचा विचार आवश्यक आहे.

तर्कतीर्थांच्या या ग्रंथाची समीक्षा डॉ. के. ल. दप्तरी, ना. गो. चाफेकर, गोविंद महादेव जोशी, गो. रा. राजोपाध्ये, वि. वि. दीक्षित, प्रा. मे. पुं. रेगे, कॉम्रेड शरद पाटील, प्रा. डॉ. यशवंत मनोहर इ. मान्यवरांनी वेळोवेळी केली आहे.