आज महात्मा गांधींची १५६ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना तर्कतीर्थ आणि महात्मा गांधी यांच्यामधील पत्रानुबंध समजून घेणे हे दोन व्यक्तीसंबंधांना सामाजिक दृष्टिकोनातून जाणणे ठरेल. तर्कतीर्थ महात्मा गांधींच्या सहवासात आले, ते वर्ष होते १९२२. ‘तर्कतीर्थ’ या पदवी परीक्षेसाठी ते रेल्वेने कलकत्ता येथे निघाले असता चौरीचौरा हत्याकांड झाले. इंग्रजी अत्याचाराविरोधी जनमत कृद्ध झाले होते. तर्कतीर्थांची रेल्वे बार्डोली रेल्वे स्टेशनवर ‘चक्का जाम आंदोलना’चा भाग म्हणून अनिश्चित काळासाठी रोखून धरली होती. चौकशी करता तर्कतीर्थांना कळले की, गालबोट लागल्याचे लक्षात घेऊन महात्मा गांधींनी आंदोलन मागे घेऊन आत्मक्लेष म्हणून २१ दिवसांचे उपोषण बार्डोली येथील ‘स्वराज्य आश्रमा’त सुरू केले आहे. तर्कतीर्थांनी परीक्षेस जायचे स्थगित करून गांधींच्या निकट सहवासात राहण्याचा निश्चय केला. ते तिथे तीन-सहा महिने महात्मा गांधींच्या निकट सहवासात राहिले. त्यानंतर तर्कतीर्थांची महात्मा गांधींशी भेट १९३२च्या अखेरीस येरवडा तुरुंगात झाली. १९३२चा शेवट व १९३३चा प्रारंभ हा गांधी-तर्कतीर्थ निकट अनुबंधाचा काळ म्हणावा लागेल. या काळात उभयतांनी एकमेकांना स्वहस्ताक्षरात पत्र लिहिण्याचा रिवाज नि रियाज जपला-जोपासला होता. ७ मार्च, १९३३ला लिहिलेले नि ८ मार्च, १९३३ असा पुणे सिटी पोस्टाचा शिक्का असलेले महात्मा गांधींच्या हस्ताक्षरातील पोस्ट कार्ड ‘तर्कतीर्थ समग्र वाङ्मय’ या ‘पत्रसंग्रहा’मध्ये (खंड १३) संग्रहित आहे. त्यात महात्मा गांधींनी लिहिले आहे, ‘भाई लक्ष्मणशास्त्री, आपका कार्ड मिला है। शुक्रवार (१० मार्च) को २ बजे आइये। आपका मोहनदास.’ पत्र स्थानिक आहे. ते पुण्याचे गांधीवादी कार्यकर्ते हरिभाऊ फाटकांच्या पत्त्यावर पाठविण्यात आले आहे.

पुणे करार (१९३२) झाल्यानंतरच्या काळात महात्मा गांधी राजकीय चळवळीकडून सामाजिक कार्याकडे मोर्चा वळविण्याच्या मन:स्थितीत आलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राखीव मतदार संघसंबंधी चर्चेतून महात्मा गांधी अस्पृश्यता निर्मूलनप्रश्नी नेतृत्व करू इच्छित होते. या कार्यास त्यांना धर्माधार हवा होता, म्हणून त्यांनी येरवडा कारागृहात सनातनी धर्मपंडितांबरोबर पुरोगामी, धर्मसुधारक पंडितांशी विचारविनिमय सुरू केला होता. त्याचा सविस्तर वृत्तांत तर्कतीर्थांनी लिहिला आहे. ‘अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील एक पर्व : येरवड्यातील धर्मपरिषद’ शीर्षक लेख ‘तर्कतीर्थ समग्र वाङ्मय’ लेखसंग्रह (सांस्कृतिक), खंड ८मध्ये तो जिज्ञासू वाचकांस वाचण्यास उपलब्ध आहे. त्यातून गांधी- तर्कतीर्थ यांच्यामधील विचारविकास समजून घेणे शक्य आहे. या काळात आणि नंतरही ‘महात्मा गांधी पत्रव्यवहार खंड’मध्ये (कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, व्हॉल्यूम-६१) तर्कतीर्थ – गांधी अनुबंधावर प्रकाश टाकणारी अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यातून लक्षात येणारी गोष्ट अशी की, महात्मा गांधींची घडण बालपणाच्या काळात कर्मठ हिंदू धर्म संस्कारात झाली होती. त्यांच्या मानसपटलावर हिंदू कर्मकांड आणि संस्कारांचा प्रभाव होता; पण जग आणि भारत भ्रमणानंतर आणि भारतात कार्यस्वरूपी वास्तव्य काळात ते आचार-विचारांनी उदारमतवादी व पुरोगामी होत गेले.

तर्कतीर्थांविषयी या पत्रव्यवहारातील महात्मा गांधींचे उद्गार, मते, विशेषणे लक्षात घेता उभयतांतील अनुबंध एकमेकांना समृद्ध व विकसित करणारे दिसून येतात. तर्कतीर्थांनी आपल्या समग्र वाङ्मयातील नोंदी, भाषणे, लेख, मुलाखती यांमधून महात्मा गांधींविषयी आदराने लिहिल्याचे आढळते. तर्कतीर्थ १९३६ला मानवेंद्रनाथ रॉय यांच्या निकट सान्निध्यात गेल्यावर त्यांच्या वैचारिक धारणा गांधीवादाकडून मार्क्सवाद, रॉयवाद, नवमानवतावाद अशा क्रमाने उत्तरोत्तर धार्मिकतेकडून मानवीय मूल्यांकडे अग्रेसर झाल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, विवेकवाद असा तर्कतीर्थांचा मूल्यप्रवास आणि विकास सनातनतेकडून प्रागतिकतेकडे असा उदारमतवादी व मानवीय दिसून येतो. ‘तर्कतीर्थविचार’ सदर खरे तर या वैचारिक विकास प्रवासाचा शब्दालेख होय. त्याचे सिंहावलोकन करताना लक्षात येणारी गोष्ट अशी की, ते सतत नव्या धारणांकडे आकृष्ट होत राहिले. हे आकर्षण प्रबुद्धतेच्या ध्यास नि ध्येयाची परिणती म्हणून पहावे लागते.

– डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com