‘हम बाकी कुछ सुनेंगेही नही, भर पत्रपरिषदेत आमच्या सहकाऱ्याचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागायलाच हवी’ असा निर्वाणीचा इशारा देत आलेले पत्रकारांचे शिष्टमंडळ बाहेर गेल्याबरोबर जयरामजींनी घाम पुसला. तऱ्हेवाईक नेत्याला समजवायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला. मनाचा हिय्या करून माध्यम कक्षातील विश्वासू सहकाऱ्याला बोलावून त्यांनी एकच मसुदा असलेली पण माफी, दिलगिरी, खेद, क्षमा असे वेगवेगळे शब्द असलेली चार पत्रे टाइप करून घेतली. ती घेऊन ते राहुल यांच्या बंगल्यावर सायंकाळी पोहोचले. ते आत गेले तर युवराज पुशअप करण्यात तल्लीन होते. ते अचानक पुटपुटू लागले. ‘गांधी, माफी, कभी नही’ हे शब्द ऐकून हातातल्या पत्राचे काय, असा प्रश्न त्यांना पडला. तेवढय़ात राहुल गांधींच्या तोंडून सावरकर असा शब्द बाहेर पडताच जयराम रमेश ‘नो, नेव्हर’ असे जोरात म्हणाले. त्याकडे दुर्लक्ष करत राहुल यांचा व्यायाम सुरूच राहिला. अर्ध्या तासानंतर राहुल थांबताच जयरामांनी विषयालाच हात घालता. ‘आपल्या पक्षाचे बीट सांभाळणारे पत्रकार केवळ नाराजच नाहीत तर संतप्त आहेत. त्यांची माफी मागून प्रकरण संपवायला हवे.’ ऐकून न ऐकल्यासारखे करत राहुल ‘गांधी कभी माफी नही मांगते’ असे म्हणत राहिले. ‘अहो, भाजपची नाही पत्रकारांची माफी मागायची आहे. त्यांना दुखावून चालणार नाही’ असे जयरामांनी म्हणताच ते भडकले. ‘आमच्या चुका सांभाळून घेण्यासाठीच तर पक्ष आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर प्रकरण मिटवायला हवे. त्यांना म्हणावे मी किमान पत्रपरिषद तरी घेतो. समोरचे तर तेही करत नाहीत. उल्लेखाने मारण्यापेक्षा अनुल्लेखाने मारण्याची वेदना मोठी असे समजावून सांगा त्यांना. तरीही ऐकत नसतील तर राहुल माझ्याजवळ सॉरी म्हणाले असे सांगून मोकळे व्हा. त्याउपरही ऐकणार नसतील तर त्या पत्रकाराच्या मालकाशी बोलून त्याचे बीट बदलून टाकायला सांगा. दुसऱ्या पक्षाच्या मुख्यालयात गेल्यावर कळेल त्याला अपमान कसा असतो ते.’ राहुल ऐकत नाही हे बघून जयराम अस्वस्थ झाले. ‘पण प्रश्न काही वाईट नव्हता व लोकशाहीत हे चालायचेच’ हे ऐकताच राहुल चिडले. ‘या देशात राहिलीच कुठे आता लोकशाही? ती पुनर्स्थापित होण्यासाठी तर मी धडपडतोय. हे करताना थोडय़ाफार चुका होणारच. त्यांना सांगा सत्ता आल्यावर चांगले वागवू. बरं, ते तुमच्या हातात कसले कागद आहेत? दाखवा मला’ हे ऐकताच जयरामजी हातातली पत्रे छातीशी घट्ट कवटाळत उठून उभे राहिले व ‘आपको दिखाये तो आप फाड डालेंगे. आपको फाडने की आदत हैं’ असे पुटपुटले. घाम पुसण्यात व्यग्र असलेल्या राहुलला ते काही ऐकू गेले नाही. अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून जयरामांनी त्या पत्रकाराशी किमान फोनवर तरी बोला अशी विनंती केली. ‘कैसे हो, घर मे सब ठीकठाक है ना’ एवढेच बोलेन, माफी मात्र मागणार नाही या अटीवर राहुल तयार झाले. जयरामजींच्या फोनवरून हा संवाद झाला. तो आटोपताच ते माध्यम कक्षात परतले. तिथे जमलेल्या पत्रकारांनी ‘नुसते बोलून काय उपयोग, माफी का नाही’ असे म्हणत त्यांना घेरले. त्यावर हात जोडून जयराम म्हणाले, ‘त्या प्रसंगामुळे तुमची नाही पण ‘मेरी हवा निकल गई’.
Already have an account? Sign in