प्रा. श्री. पु. भागवत यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘भारतीय संस्कृती : काही समस्या’ या मुलाखतीत भारतीय व हिंदू संस्कृती एक की भिन्न, अशी विचारणा केल्यावर तर्कतीर्थांनी विस्ताराने सांगितले होते की, आज भारतीय संस्कृती म्हणून आपण जिचा विचार करतो, ती मूलत: हिंदू संस्कृती आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिाश्चन, पारशी आदी सुसंस्कृत समाजगट (धार्मिक समुदाय) देशात आहेत; पण भारतीय संस्कृती म्हणताना त्याचा विसर पडलेला असतो. वरील सर्व धर्म, समाज घटकांची भिन्न सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत. या सर्वांची मिळून जी संस्कृती आहे, तीवर हिंदुत्वाची छाप आहे. भाषा, आहार, वाङ्मय, ललितकला, व्यवसाय यावर हा रंग उतरलेला दिसतो. पारशी, मुस्लीम समुदायाच्या भाषा भिन्न आहेत. सर्व धर्मीयांच्या आहार-विहारावर धार्मिक बाबी वगळता सामाजिक, सांस्कृतिक परिणाम, प्रभाव दिसून येतात. हे सर्व धर्म संप्रदायी गट आपापल्या प्रांत विशेषाशी एकरूप झालेले दिसतात.
भारतात अस्सल व उच्च दर्जाची इस्लाम संस्कृती विशेषत्वाने आली नाही. ती अरबांपाशी होती. अरब तत्कालीन हिंदुस्थानच्या किनाऱ्याला नुसते शिवून निघून गेले. मुस्लीम संस्कृतीतील कला, साहित्य, भाषा, आहारातील काही पदार्थ, पोशाखातील काही वस्त्रे, दरबारातील काही रिवाज, वास्तुकला (स्थापत्य), अत्तरे, गालिचे-सतरंज्या इत्यादी उपयोगी व विलासी जिनसा हिंदू संस्कृतीत बेमालूम व स्पष्टपणे मिसळलेल्या दिसतात. हिंदू संस्कृतीची शस्त्रक्रिया (शल्यचिकित्सा) केली तरी मुस्लीम संस्कृतीची हिंदू संस्कृतीत मिसळलेली अंगे वेगळी करता येणार नाहीत. असाच ख्रिाश्चन धर्म संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. काँग्रेसच्या तत्त्वज्ञानातील सेवाभाव, ख्रिाश्चन मिशनरी वृत्तीचा परिणाम आहे. ब्राह्म समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, ख्रिाश्चन समाज प्रभावाची निर्मिती आहे, असे म्हणण्यात काहीएक तथ्य दिसून येते.
जगाच्या सगळ्याच प्राचीन व अर्वाचीन संस्कृती या देवाणघेवाण किंवा अनुकरण करून जगल्या व जगत आहेत. त्या सर्वसंस्कारक्षम, सर्वानुकरणक्षम आणि परंपरेतून व पूर्वसंस्कारांतून उत्तीर्ण होणे इष्ट असल्यास तसे करण्यास पूर्ण समर्थ आहेत. इष्ट तेथे तद्रूप होणे व अनिष्ट जे असेल त्यातून मुक्त होणे, याचे सामर्थ्य माणसाला त्या मानव्यमूलक मेंदूमुळे प्राप्त झाले आहे. दुसऱ्या संस्कृतीतील इष्ट किंवा योग्य काय याचा विवेक करून उचलण्याचे सामर्थ्य संस्कृतींच्या ठिकाणी नष्ट झाले, म्हणजे ती संस्कृती नष्टप्राय होते. भिन्न भिन्न संस्कृतींचा समागम ही मानवी इतिहासातील अत्यंत मंगल घटना असते. उच्चतम प्रतिभा वा अलौकिक बुद्धिसामर्थ्य हा काही एका विशिष्ट मानवगटाचाच सवता सुभा वा मक्ता नाही. म्हणून भिन्न भिन्न संस्कृतीच्या देवाण-घेवाणीची क्रिया प्रगतीची शक्ती होय, असेच संस्कृतीशास्त्रास मान्य करावे लागते.
भारतीय संस्कृती हजार-बाराशे वर्षांच्या इतिहासात जीर्णावस्थेस पोहोचली आहे. भारतीय व पाश्चात्त्य नागरिक फरकातून ते स्पष्ट होते. आत्मसंभावितत्त्व (सांस्कृतिक मिथ्याभिमान) आसुरी असते. विज्ञाननिष्ठा ही मानवी आत्म्याची धन्यता आहे. त्याचा धिक्कार करणारे अध्यात्माच्या वाऱ्यासही राहण्यास अपात्र आहेत. पाश्चात्त्य युद्धपिपासू आहेत, भारतीय नाहीत असे म्हणण्यास आधार नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीने आधी भारतीयांना तारायला हवे. पाश्चात्त्य कंबरेइतके रुतले असतील, तर भारतीय गळ्याइतके बुडाले आहेत. मोतीबिंदू होऊन मंददृष्टी झालेल्यास दृष्टी नष्ट झालेला अंध कसा मार्गदर्शक होईल?
भारतीय संस्कृतीच्या अध:पाताची कारणे तिच्या जातिसंस्थेत आहेत. भिन्न जातींमध्ये परस्परांत अंतर राहिल्यामुळे सामाजिक दौर्बल्य पराकाष्ठेस गेले आहे. सामाजिक आरोग्य (स्वास्थ्य) राहिले नाही. सांस्कृतिक समरसता न आल्याने भिन्न सामाजिक गटांमध्ये (जातीत) खिंडारे पडली आहेत. जिव्हाळा राहिलेला नाही. गृह्य संस्कृती (गृहस्थ जीवन) विसदृश (विसंगत) झाल्याने सांस्कृतिक जीवन डबघाईस आले आहे. भिन्न जातींतील कोरड्या संबंधांमुळे परस्परांतील जिव्हाळा लोप पावला आहे. जातिभेद हिंदू संस्कृतीस लागलेली महाव्याधी होय. त्यामुळे भारतीय संस्कृती पराभूत अवस्थेत आहे. पराभूत अवस्थेचे दुसरे कारण, विज्ञानात्मक दृष्टिकोनाने परिपूत, बौद्धिक स्वातंत्र्याने युक्त व श्रद्धाजाड्यापासून मुक्त अशी शैक्षणिक व ज्ञानविषयक परंपरा लुप्त झाली, हे होय.