फुटबॉलच्याइतकेच हॉकीमध्येही गोलरक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. पण फुटबॉलमधील गोलरक्षकाइतके वलय हॉकीतील गोलरक्षकाला मिळत नव्हते. पी. आर. श्रीजेशने हे अलिखित वास्तव बदलून टाकले हे नक्की. गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरुष हॉकीत भारताला मिळालेल्या दोन कांस्यपदकांमध्ये श्रीजेशचा सिंहाचा वाटा आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून भारतीय संघाने जितके गोल झळकवले, त्यापेक्षा कदाचित अधिक गोल श्रीजेशच्या चापल्य व चतुराईने रोखले. टोक्यो आणि पॅरिस या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांत पदकांच्या स्पर्धेत राहिलेला भारताचा हॉकी संघ एकमेव होता. टोक्योमध्ये बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक विजेते होते. पॅरिसमध्ये त्यांना पदक जिंकता आले नाही, नेदरलँड्स आणि जर्मनी हे सुवर्ण व रौप्यपदक विजेते ठरले. दोन्ही वेळी भारत कांस्यपदक लढतींमध्ये जिंकला. हॉकीमध्ये सध्या पहिल्या सहा संघांच्या क्षमतेमध्ये फार फरक दिसून येत नाही. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावणारा संघच जिंकतो. भारताने इतक्या वर्षांनंतर ही कामगिरी करून दाखवली.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: रोजगारसंधीच्या पोटातील प्रश्न

फुटबॉलवेड्या केरळमध्ये खरे तर श्रीजेश हॉकीकडे वळायचाच नव्हता. संपूर्ण राज्यात एकच अॅस्ट्रोटर्फ आहे. श्रीजेशला तिरुअनंतपुरम येथील क्रीडा विद्यालयात प्रवेश मिळाला, पण तेथेही प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून तो हॉकीकडे वळला. श्रीजेशचे वडील शेतकरी आहेत आणि एकदा हॉकीचे साहित्य विकत घेण्यासाठी त्यांनी घरची दुभती गाय विकली. आपण थोडे आळशी होतो म्हणूनच गोलरक्षकाच्या भूमिकेत शिरलो हे तो कबूल करतो. भरपूर उंची लाभलेल्या श्रीजेशच्या हालचाली (रिफ्लेक्सेस) चपळ होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याच्याकडे हॉकी संघटना आणि विविध परदेशी प्रशिक्षकांचे लक्ष गेले. २००४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. सुरुवातीला त्याला फार छाप पाडता आली नाही. त्याने तंत्रात प्रयत्नपूर्वक बदल केला. काही वर्षांपूर्वी पेनल्टी शूट-आऊटच्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने बदल केला, त्यावेळी अनेक सामन्यांमध्ये श्रीजेशचे गोलरक्षण हा जय-पराजयातला फरक ठरला. टोक्यो आणि पॅरिसमध्ये तर त्याच्या थक्क करणाऱ्या काही बचावांमुळे भारताला कांस्यपदके मिळाली, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरत नाही. दोन दशके आणि ३२९ सामने खेळल्यानंतर श्रीजेश निवृत्त झाला. निवृत्तीची घोषणा त्याने ऑलिम्पिकदरम्यानच केली होती. या निर्णयाने आपल्या आणि संघसहकाऱ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होणार नाही ही खबरदारी श्रीजेशने व्यवस्थित घेतली. पॅरिसमध्ये विशेषत: ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जर्मनीविरुद्ध त्याची कामगिरी अफलातून होती. ती पाहता त्याच्या निवृत्तीचा निर्णय अवकाळीच ठरतो. पण थांबायचे कुठे हे ठरवण्याची परिपक्वता हे श्रीजेशचे आणखी एक वैशिष्ट्य. त्याची १६ क्रमांकाची जर्सी हॉकी इंडियाने निवृत्त केली, ही त्याला मिळालेली समयोचित मानवंदनाच.