‘लज्जागौरी’ हे मराठी संत साहित्य, भक्ती परंपरा, देव-दैवते इत्यादींचे अभ्यासक, संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जून १९८७ मध्ये आदिमातेच्या स्वरूपावर आणि उपासनेवर प्रकाश टाकणारे पुस्तक लिहिले.
तर्कतीर्थांनी सदर ग्रंथाची मीमांसा ‘नवभारत’ मासिकाच्या ऑक्टोबर १९८७ च्या अंकात केली आहे. त्यात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, लैंगिक शक्ती-पूजेची प्रतीके आपल्या धर्म नि संस्कृतीत पूर्वापार प्रचलित असून, त्यांचे विवेचन आणि विश्लेषण डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे यांनी ‘लज्जागौरी’ ग्रंथात केले आहे. मनुष्य प्रारंभापासूनच शक्तिपूजक आहे. तो प्राचीन काळी लैंगिक प्रतीकांचे पूजन, अर्चन करीत होता, हे उत्खननात सापडलेल्या मूर्ती, मंदिरे, चित्र इ.मधून स्पष्ट होते. प्राचीन आणि प्रगत अशा दोन्ही काळांतील मनुष्य समाज संस्कृतीत लैंगिक प्रतीके नि त्यांचे रूप असलेल्या विविध देव-देवतांची पूजा करण्याचा रिवाज होता नि आहे. डॉ. ढेरे यांनी या ‘लज्जागौरी’वर पुरातत्त्वविद डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी केलेल्या लिखाणाशी असहमती दर्शवत हे लेखन केल्याचे तर्कतीर्थ या परीक्षणात स्पष्ट करतात.
‘लज्जागौरी’ची शिल्पे विविध मंदिरांत आजही आहेत नि पूर्वीही होती, हे उत्खननातून सापडलेल्या मूर्तींतून स्पष्ट होते. (तेर जि. धाराशिवच्या लामपुरे वस्तुसंग्रहालयात ‘लज्जागौरी’च्या मूर्ती पाहिल्याचे मला आठवते.) ‘लज्जागौरी’ हे स्त्री योनीचे गौरवीकरण करण्यातून उद्भवलेले पूजन वा उपासना होय. पार्वती, दुर्गा, लक्ष्मी, श्री अंबा, सरस्वती, काली इ. देवता त्याचीच विकसित रूपे होत. दुसरीकडे पुरुष लिंगदेवताही आपल्या भक्तिपरंपरेत शक्तिपूजेच्या रूपात आढळतात. महादेव, भैरव, शिव, हनुमान ही पुरुष लिंग वा शक्तिपूजेची रूपे आहेत. (उदा. महादेवाची पिंड) ‘लिंगदेवता’ आणि ‘योनिदेवता’ यांच्या संयुक्त पूजेचे विधानही आपल्यात आढळते. मूलत: मूर्तिविकास हे शक्तिपूजनाचे प्रतीकरूप होय. तर्कतीर्थ या परीक्षणाच्या समारोपात म्हणतात की, ‘‘लज्जागौरी’ हे पुस्तक म्हणजे मातृपूजक संस्कृती व विशेषत: भारतातील देवीपूजा पद्धती यांच्या अध्ययनाचे एक उत्कृष्ट साधन आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. आधुनिक मनोविश्लेषणशास्त्रातील सांस्कृतिक मानसशास्त्राच्या अध्ययनाला व संशोधनालाही याचा चांगला उपयोग होईल.’’ यासंदर्भात जिज्ञासूंनी तर्कतीर्थलिखित ‘मानस लिंगपूजा’ हा लेख वाचावा. तो ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पातील ‘खंड ८- लेखसंग्रह (सांस्कृतिक)’ मध्ये अंतर्भूत आहे.
अशाच प्रकारच्या आणखी एका ग्रंथाचे परीक्षण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिले असून, ते ‘नवभारत’च्या १९८९ च्या एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. लोकसाहित्य अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. तारा भवाळकर यांनी मिळून लिहिलेल्या ‘महामाया’ ग्रंथाचे ते परीक्षण होय. डॉ. ढेरे हे दक्षिण भारतातील धार्मिक संस्कृतीचे मूळ अभ्यासक, तर डॉ. भवाळकर या लोकसाहित्याच्या. त्यांनी ब्रिटिशपूर्व काळातील दाक्षिणात्य धार्मिक व साहित्यिक परंपरेचा खोलात जाऊन उलगडा करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे केला आहे. या ग्रंथाचा विषय ‘मराठी-तंजावरी नाटकांमधून लोकपरंपरा शोध’ असा आहे. अशी ३७ नाटके संशोधकद्वयांच्या हाती लागतात. मराठी नाटके मध्ययुगात आढळतात, तशी ती आधुनिक काळातसुद्धा. परंतु, दोन्हींची प्रेरणास्थळे भिन्न आहेत. मध्ययुगीन नाटके संस्कृत प्रभावित तर आधुनिक पाश्चात्त्य (इंग्रजी) प्रभावित. महाराष्ट्र-कर्नाटकात विठ्ठल नि व्यंकटेश दैवते प्रभावी आहेत. त्यांची माहात्मे तपासत असताना लक्षात येते की, ‘कुरवुंजी’ नाट्यातील प्रमुख पात्र कैकाडीण असल्यामुळे तिच्यासंदर्भात भटक्या, उपऱ्या जमातीचा, त्यांच्या रूढी-परंपरांच्या शोधात स्त्रीचे हीनत्व समोर येते. तिला ‘मनुस्मृती’त ‘तिर्यग्योनी’ म्हणजे पशुकोटीतील प्राणी योनी संबोधले आहे, असे सांगितले जाते. परंतु, तर्कतीर्थ म्हणतात की, त्यांच्याकडे असलेल्या ‘मनुस्मृति’च्या प्रतीत हा शब्द आढळत नाही. असे असले तरी हा ग्रंथ पूर्वापार स्त्रीच्या हीनत्वाचा शोध घेत ते दूर करण्याच्या उद्देशाने केलेले संशोधन म्हणून पाहायला पाहिजे. भारतीय देव-देवतांमध्ये ‘महामाया’ची अनेक रूपे, मंदिरे आहेत. त्यांच्या आख्यायिका भिन्न आहेत. ५१ शक्तिपीठांपैकी महामाया एक आहे. ही दोन्ही परीक्षणे म्हणजे तर्कतीर्थांनी स्त्रीरूप आणि विचारांचा घेतलेला वेध आणि परामर्श होय.
© The Indian Express (P) Ltd