पुण्यातील ‘श्री शाहू मंदिर महाविद्यालया’ची स्थापना १९६० मध्ये झाली, तेव्हा डॉ. मा. प. मंगुडकर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी सन १९६० ते १९६४ या काळात ‘लोकशिक्षण व्याख्यानमाला’ योजली होती. सन १९६१ ते १९६४ या कालावधीत सदर व्याख्यानमालेत झालेल्या व्याख्यानांचे संपादन ‘विचार-मंथन’ शीर्षकाने करून सन १९६४ला त्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला होता. यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘लोकशाहीचे तात्त्विक अधिष्ठान’ विषयावरील व्याख्यान आहे.
या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘अठराव्या शतकाच्या सुमारास लोकशाहीचा जन्म झाला. ‘लोक’ या संकल्पनेच्या अध्ययनात तिच्या जन्माचे मूळ सापडेल. … लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. प्रत्येकाचे स्वातंत्र्य हाच लोकशाहीचा आधार आहे. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये नागरिकांना आपली सत्ता दोन निवडणुकींच्या मधल्या अवधीत प्रतिनिधींना द्यावी लागते. तथापि, त्यामुळे लोकशाही म्हणजे दिल्लीमधील लोकसभा वा मुंबईमधील विधानसभा असे समीकरण करू नये. सार्वभौम सत्तेचा मालक लोक म्हणजे सर्व व्यक्तींचा समूहच असतो, हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. मानवी इतिहासात लोकशाहीच सर्वांत उत्तम शासनसंस्था ठरली आहे व कूर्मगतीने वाटचाल करणाऱ्या संसदीय प्रातिनिधिक लोकशाहीला पर्याय म्हणजे जिवंत व मूलगामी लोकशाहीच. ग्रामराज्य हा तिचा मूलघटक व्हावयास पाहिजे, ही गोष्टही सर्वमान्य होत आहे.
मानव व निसर्ग यांच्या संबंधाचे अध्ययन करून असा निष्कर्ष निघतो की, मानवी स्वातंत्र्यातच मानवाची वा मानवी समाजाची प्रगती होऊ शकते. मानव निसर्गाचा स्वामी बनण्याचे कार्य सत्याच्या सतत शोधाने होत असते. निसर्ग व मानव या संबंधात बंधमुक्ती ही सापेक्षा असते, तसेच माणूस हा केवळ स्वत:साठी जगत नाही. माणसा-माणसांमधील संबंध हे विवेकमूलक सहकार्याचे असावे लागतात. या संबंधाने माणसाची शक्ती वाढते, विवेकाच्या मर्यादेत बुद्धी, भावना व इच्छाशक्ती काम करू लागतात.
केवळ राष्ट्र समृद्ध झाले म्हणजे व्यक्तिविकास झाला असे म्हणता येणार नाही. त्यासाठी व्यक्तिविकास हाच महत्त्वाचा निकष मानावा लागेल. हा विकास भौतिक व आध्यात्मिक असा दोन्ही प्रकारचा असला पाहिजे. समाजवादी समाजरचनेमध्ये राजकीय सत्तेबरोबर आर्थिक सत्ता राज्यसत्तेच्या हातात जाते. नियोजनाचा तो अपरिहार्य परिणाम असतो. सत्तेच्या या केंद्रीकरणामधून स्वातंत्र्य, लोकशाही यावर नवे आक्रमण येण्याचा संभव असतो, परंतु लोकशाही राष्ट्रांना समाजवादी अर्थव्यवस्था अमलात आणताना याची जाणीव असते. साम्यवादापेक्षा लोकशाहीवाद्यांचे श्रेष्ठत्व यातच आहे. सत्ता व स्वातंत्र्य यांचा मेळ घालणे हे लोकशाहीत आवश्यक असते. सत्ता व स्वातंत्र्य यांचा मेळ घालण्याचे कार्य म्हणजेच लोकशाहीचे पूर्ण रूप होय. समाजवाद तेथेच थांबतो, म्हणून लोकशाहीच्या विकासात समाजवादाचे प्रश्न सुटतात.
मानवतावाद हाच लोकशाहीचा तात्त्विक आधार होय. व्यक्ती ही बुद्धिनिष्ठ आहे, त्यामुळेच तिच्याजवळ सृजनशील शक्ती आली. व्यक्ती हेच अंतिम साध्य होय, असे मानवतावाद मानतो. माणूस आपल्या इतिहासाचा व भविष्यकाळाचा भाग्यविधाता असतो, असे लोकशाहीत मानले जाते.’’
लोकशाहीच्या अनुषंगाने तर्कतीर्थांचे वरील विचार मार्क्सवाद, गांधीवाद, रॉयवाद, नवमानवतावाद अशा वैचारिक स्थित्यंतरांच्या प्रवासानंतरचे असल्याने त्यास एक प्रकारचे अनुभवसंपन्न अधिष्ठान आहे. यात ‘लोक’तत्त्वावर देण्यात आलेला भर हा जगातील अनेक सत्तांतरांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्येच खरे तर लोकशाहीचे पायाभूत घटक होत. ‘लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले ते खरे लोकराज्य’ हे विचारसूत्र यामागे दिसून येते. drsklawate@gmail.com