तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मूळ आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेले हे भाषण नंतर साप्ताहिक ‘साधना’, पुणेच्या २१ जुलै, १९५६ च्या अंकात ‘भारतीय नीतिविकास : वेदकालीन नीती’ शीर्षकांतर्गत प्रकाशित झाले होते.

यात ते म्हणतात की, माणसाला जगण्यास अन्न, पाणी, हवा आणि प्रकाश अशा भौतिक साधनांची जशी अत्यंत आवश्यकता असते, तशीच व तितक्याच प्रमाणात नैतिक आचरणाचीही जरुरी असते. त्यासाठी वर्तनविषयक विवक्षित विवेक आवश्यक असतो. भाषा व व्यवहारात जेव्हा नैतिक जिव्हाळा प्रकट होतो, तेव्हा भाषा उजळते आणि व्यवहार पवित्र होऊन जातो. वेदकाळात माता, पिता, आचार्य, राजा यांच्याबद्दल पूज्यभाव बाळगणे नैतिक मानले जात असे. वंद्या व्यक्ती नीतिनियम उल्लंघनाने निंद्या ठरत असे. शिष्यास गुरू आपल्या शिष्ट वर्तन, आचरण, अनुकरणाचा उपदेश नि दीक्षा देत असे. सज्जनाचे वर्तन समाजासाठी आदर्श असे. जे नीतिनियम होते, त्यांचा आधार परस्परांविषयीची सहानुभूती असे. ‘ऋग्वेद’च्या समाप्ती सूक्तात स्पष्ट केले गेले आहे की, ‘‘माणसांनो, पूर्वीचे देव आपापला भाग समान बुद्धीने स्वीकारत. त्याप्रमाणे तुम्ही समान मनाचे बना. परस्परांत मेळ राहील असे संभाषण करा. तुमची सल्लामसलत एक असू द्या. मन एक असू द्या. संकल्प समान, हृदये समान, मन समान असू द्या. त्यामुळे तुमचे सहअस्तित्व सुंदर बनेल.’’ अथर्ववेद, यजुर्वेदात संज्ञान सूक्ते आली आहेत. ती समजून घेणे, सौमनस्य (पारस्परिक सद्भाव) यांचा पुरस्कार करणारी आहेत.

‘शतपथब्राह्मण’ ग्रंथात पंचमहायज्ञ हे गृहस्थाचे नित्य कर्तव्य सांगितले गेले आहे. देव, ऋषी, पितर, मनुष्य व प्राणीमात्रांप्रति पूज्यबुद्धी, कृतज्ञता, दया भावनांचा परिपोष वर्णिला आहे. वेदांतील ही नीतिकल्पना मानवाच्या ऐहिक साफल्यासाठी सांगितली गेली आहे. ती पारमार्थिक निवृत्तिमार्गी नसून प्रवृत्तमार्गी आहे. ब्राह्मण ब्रह्मतेजाने युक्त, क्षत्रिय शूर, घोडे चपळ, बैल पुष्ट, स्त्री गृहकार्यनिपुण सांगण्यात वा आवश्यक मानण्यात इहवाद, कर्मवाद, प्रवृत्तीवाद आहे, निवृत्ती नाही. प्रवृत्त जीवनपण नैतिक असावे म्हणजे काय? तर द्याूत खेळणे गैर. त्याचे फासे हातास थंडगार लागतात; पण पडले की हृदय जाळतात. द्याूत खेळात सर्वस्व गमावलेला मनुष्य गुलाम होऊन शेकोटी किनारीही थरकापत पडलेला असतो. दुसऱ्याच्या संसारात रमलेल्या स्त्रीस पाहात द्याूत खेळणाऱ्याच्या अंगात रात्री ताप भरतो, अशी वर्णने आढळतात.

म्हणून ऋग्वेदात ‘ऋत’ कल्पना आहे. ऋत म्हणजे सत्य. ते केवळ मानवी जीवनाचे नाही, तर वैश्विक व्यवहाराचे प्रेरक तत्त्व होय. निसर्ग ऋतयुक्त होय. सूर्य-चंद्र गती, समुद्राची भरती-ओहोटी, ऋतुचक्र सत्य आहे, कारण ते नियमित असते. सत्य व अनृत (असत्य) द्वंद्व ऋग्वेदात आहे. सत्यासत्य निर्णय म्हणजे विवेक. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ ते हेच. ऋषी सत्योक्ती महिमा वर्णितो. ‘सत्योक्ती माझे सर्वत्र रक्षण करो,’ ही प्रार्थना म्हणजे सत्याचरण. सत्याप्रमाणेच वेदांमध्ये दम, दान, दया यांची महिमा सांगितली गेली आहे. त्रिकार ‘द’चा ध्वनी देव, दानव व मानवास अंगीकारावा लागतो. देवाने दान करावे, मानवाने इंद्रियदमन करावे आणि असुरांनी दया अंगीकारावी असे सांगितले जाण्यात नैतिक आचरणाचे नियमन अध्याहृत आहे.

तिकडे सामवेदात मानवी जीवनातील कोश (संग्रह), कृपणता, अश्रद्धा, असत्य इत्यादी दोषांच्या परिहाराचे वर्णन आहे, तसेच साधनशुचितेचेही वर्णन येते. म्हणजे असे की, हिंसेला अहिंसेने, असत्याला सत्याने जिंकावे. बुद्धानेही हेच सांगितले आहे; पण आपण जसजसे पुढे जातो, तसतसे हे मोक्ष साधन बनत गेलेले दिसते.

तर्कतीर्थांनी अधिकांश भारतीय दर्शने विकासकालात मोक्षकारक बनल्याचे आणि म्हणून ती दु:खवादी दर्शने झाल्याचे आपल्या ‘आनंदमीमांसा’ प्रबंधात दाखवून दिले आहे. त्या दु:खवादी दर्शनांची दोन रूपे- प्रपंच दु:खवाद आणि साचिक दु:खवाद सांगून त्यांची तुलनाही केली आहे. आनंदमीमांसा उपयुक्ततावाद, सौंदर्यमीमांसा प्रेम, सत्य इत्यादी तत्त्वांच्या आधारे सांगण्याचा त्यांचा या प्रबंधातील संकल्प चांगला १५००-१६०० पानांचा विस्तारित संकल्प होता. तो सिद्धीस गेला असता, तर भारतातील पक्षी पूर्वेकडे आकर्षित न होता पश्चिम क्षितिजवासी झाले असते आणि विद्यामान भारत अधिक प्रागतिक दिसला असता.