भारत सरकारच्या तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्रालयामार्फत अनेक आकाशवाणी केंद्रे महाराष्ट्रात चालविली जातात, त्यांपैकी काही केंद्रांमार्फत वार्षिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जात. अशांपैकी पुणे केंद्रामार्फत ‘पु. मं. लाड व्याख्यानमाला’ ही एक. लाड यांनी ‘श्री तुकारामबाबांच्या अभंगांची गाथा’ संपादित केली होती. सन १९५० मध्ये तत्कालीन मुंबई सरकारतर्फे ती प्रकाशित करण्यात आली होती. अशा व्यक्तीच्या स्मरणार्थ समर्पित व्याख्यानमालेचे सन १९६२चे पुष्प तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी गुंफले होते. तर्कतीर्थांनी २५ व २६ मार्च १९६२ रोजी ‘रहस्यवाद : कला आणि सौंदर्य’ तसेच ‘रहस्यवाद : प्राचीन आणि आधुनिक काव्य’ विषयांवर दोन व्याख्याने दिली होती. ती आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आली होती. प्रख्यात इतिहासकार प्रा. न. र. फाटक या व्याख्यानमालेचे अध्यक्ष होते. ही व्याख्याने ‘प्रकाशन विभाग, माहिती व नभोवाणी मंत्रालय, भारत सरकार’मार्फत फेब्रुवारी १९६५ मध्ये प्रकाशित झाली.

‘रहस्यवाद : कला आणि सौंदर्य’ या भाषणापूर्वी व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रा. न. र. फाटक यांनी जो ‘उपोद्घात’ (प्रस्तावना) केला होता, त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की, ‘‘लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विस्तीर्ण व्यासंगाची, मर्मग्राही कुशाग्र बुद्धिमत्तेची, त्यांच्या बुद्धिविलासात चमकून जाणाऱ्या प्रतिभेची व ज्यांनी या विषयाचा पूर्वविचार केलेला असेल, त्यांनाही नव्याने पुन्हा विचार करावयास लावणाऱ्या प्रतिपादन शैलीची या व्याख्यानात ओळख पटल्याशिवाय राहणार नाही’’

तर्कतीर्थांनी या व्याख्यानात म्हटले होते की, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ‘मिस्टिसिझम’ हा एक पारिभाषिक शब्द होय. त्याला आपल्याकडे रहस्यवाद, गूढवाद, दिव्य आध्यात्मिक अनुभूती अशा अनेक रूपांनी ओळखले जाते. साहित्य आणि सत्य ही शुचि (पवित्र) आणि मोचक (निवारक) अशी मानवी अंगे आहेत. मानवाने आपल्या विकासकाळ नि प्रवासात सत्याचा जितका शोध घेतला, तितका तो त्याने सौंदर्याचा घेतलेला नाही. समीक्षेचा आणि सौंदर्यशास्त्राचा धांडोळा घेताना लक्षात येते की, साहित्यसौंदर्याची मीमांसा प्लेटोपासून आपल्याकडे मराठीत बा. सी. मर्ढेकरांपर्यंत वेळोवेळी अनेकांनी केली आहे. तशीच सत्याची चर्चा नि चिकित्साही अनेकांनी केली आहे. सत्यशोधन वृत्तीमुळे आपले मानवी जीवन समृद्ध झाले आहे. मात्र, ही समृद्धी भौतिकाच्या मर्यादेतच संकुचित होऊन राहिली आहे. पवनचक्कीपासून ते अवकाश स्पर्शण्याच्या मानवी प्रयत्नांतून ते स्पष्ट होते.

पाश्चात्त्य देशांत प्लेटो, प्लोटिनस, इमॅन्युअल कांट, ऑर्थर होपेनहॉवर, रुडॉल्फ स्टेनिअर, कार्ल युंगसारखे सौंदर्यशोधक होऊन गेले. त्यांनी गूढतेबद्दल सूक्ष्मात जाऊन विचार केला आहे. त्यांनी या बाबीचा विचार करताना कला, कलेचा उगम या गोष्टींचा सर्वांगीण विचार केला आहे. त्यातून अनेक सौंदर्यविषयक उपपत्ती (हायपॉथिसिस) निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, व्यक्तिनिष्ठ, वस्तुनिष्ठ, दिव्यतत्त्वनिष्ठ इत्यादी. सौंदर्यमीमांसा क्षेत्रात दिव्य अध्यात्मवादाची मांडणी सर्वप्रथम प्लेटोने केली. सौंदर्याचा विचार करता असे लक्षात येते की, निसर्ग सौंदर्याचा शोध हाच खरा सौंदर्य शोध आहे. हा शोध अनेकांनी अनेकांगांनी घेतला आहे. प्लोटिनस हा त्यांपैकी एक होय. त्याने तीन तत्त्वांच्या आधारे सौंदर्यमीमांसा केली आहे- (१) एकमेवाद्वितीयम् (वन), (२) प्राज्ञ (नाउस), (३) आत्मा (सोल) पैकी आत्म्याने प्राज्ञ स्वरूपात आदर्श आणि एकमेव अशा दृश्य विश्वाचा शोध घेतला आहे. गूढ रहस्याचा शोध ही एक कलात्मक अनुभूती आहे. ती वर्णनात्मक व रहस्यात्मक असते.

या भाषणात वरील मतांच्या समर्थनार्थ तर्कतीर्थांनी कवींद्र रवींद्रनाथ टागोर, बालकवी यांच्या काव्यरचनांचा हवाला देऊन विवेचन केले. त्यातून त्यांनी रहस्यवादाची संकल्पना विस्ताराने श्रोत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com