योगींचे रामराज्य म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या प्रदेशातील शाहजहापूरमध्ये रस्ते कंत्राटदाराने ‘रंगदारी’ दिली नाही म्हणून सत्तारूढ पक्षाच्या आमदाराच्या हस्तकांनी रस्ताच खोदल्याच्या वृत्ताने आमची संघटना अजिबात विचलित झालेली नाही हे आम्ही जेसीबीधारक आरंभीच स्पष्ट करतो. या घटनेच्या माध्यमातून देशात वेगाने उदयास येत असलेल्या ‘जेसीबी संस्कृतीला’ धक्का पोहचवण्याचे काम केले जात आहे. आमचा व्यवसाय कर्माशी निगडित आहे, धर्माशी नाही. ‘रंगदारी’ वसूल करणे हे जर कुणी कर्माच्या व्याख्येत बसवत असेल तर त्यासाठी आमच्या महागडय़ा यंत्राला जबाबदार धरणे योग्य नाही. या राज्यात अल्पसंख्य असलेल्या दंगलखोरांची घरे आम्ही जशी पाडतो तसेच रस्तेही उखडतो. हेतू अथवा कार्यकारणभाव मात्र यंत्र भाडय़ाने घेणाऱ्याच्या मनानुसारच असणार. त्यासाठी जेसीबीला व त्यावरून वेगाने फोफावत असलेल्या संस्कृतीला दोष देणे योग्य होणार नाही. २०१४ पूर्वीपर्यंत या यंत्राला समाजात मानाचे स्थान नव्हते. यानंतर सुशासन आणि विकासाच्या संकल्पना राबवायला सुरुवात झाल्यावर याचे महत्त्व वाढले. ‘दंगलमुक्त प्रदेश’ घडवण्यासाठी जेसीबीने हातभार लावला.

हेही वाचा >>> मानसिक आरोग्य हा मानवी हक्कच!

‘रंगदारी’ वसूल करणे हे सुशासनासाठी चांगले की वाईट या वादात आम्हाला पडायचे नाही. अनादी काळापासून भारतीय व्यवस्थेत या ना त्या स्वरूपात अशी वसुली होत आली आहे. व्यवस्था संतुलनासाठी अनेकदा ती गरजेची असते. त्यामुळे ‘त्या’ एकटय़ा आमदाराला दोष देऊन चालणारे नाही. जेसीबीचा वापर भलत्याच कारणासाठी होत असल्याची टीकासुद्धा चुकीचीच आहे. प्रचलित काळात जे साधन लोकप्रिय असते त्याचाच वापर करण्याची प्रथा आहे. आधी लोक हत्तीच्या सोंडेतून नेत्यांवर फुलांचा वर्षांव करायचे, आता आमच्या जेसीबीचा वापर केला जातो. हे संस्कृती विस्ताराचे द्योतक असल्याने त्या आमदाराची यात काही चूक असेल असे आम्हाला तरी वाटत नाही. आता प्रदेशातील गुन्हेगारी संपली, गुंतवणूक सुरू झाली असा प्रचार केला जातो. या पार्श्वभूमीवर एखाद्या आमदाराने स्वत:ची गुंतवणूक वाढावी म्हणून हा प्रयोग केला असेल तर त्याचा फार बाऊ करण्याचे कारणच काय? रस्ता उखडण्याचा उद्योग करणारा त्यांचा प्रतिनिधी नव्हता पण पक्षाचा कार्यकर्ता होता. यावरून पक्षाची नाहक बदनामी काहींनी चालवली आहे. त्याकडे जनतेने नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करावे! जगातला सर्वात मोठा पक्ष चालवण्यासाठी भरपूर खर्च येतो याची आम्हाला कल्पना आहे. त्या खर्चात थोडाफार हातभार लावण्याच्या उद्देशातून ही कृती घडली असेल तर त्यात गैर काही नाही अशी संघटनेची धारणा आहे. या असल्या नाहक चर्चेमुळे केवळ जेसीबी बदनाम होत नाही, तर नवसंस्कृतीलासुद्धा धक्का पोहोचतो. शिवाय आमच्या व्यवसायावर परिणाम होतो तो वेगळाच. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना अकारण प्रसिद्धी मिळू नये यासाठीच आम्ही संघटनेतर्फे हे निवेदन प्रसृत करीत आहोत. आगामी काळात केवळ लोकप्रतिनिधीच नाही तर सर्व नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यात एक जेसीबीसुद्धा असेल. तो दिन आमच्यासाठी व या संस्कृतीसाठी सुदिन असेल अशी आम्हाला आशा आहे.