‘प्रिन्स’ असे बिरुद, सुटाबुटातला व आलिशान प्रासाद-मोटारींसह वावर आणि तरीदेखील इमाम आणि आध्यात्मिक उपदेशक अशी ओळख… प्रिन्स करीम अल हुसेनी ऊर्फ आगा खान चौथे हे असे अजब रसायन होते. धर्माशी संबंधित होते पण पुराणमतवादी नव्हते. अतिशय दानशूर होते. पण त्याचबरोबर आधुनिक काळाशी सुसंगत छंद, सवयी त्यांना त्याज्य नव्हत्या. त्यांनी जगभरातील अनेक संस्थांना मदत केली. उत्तम वास्तूंच्या निर्मितीस हातभार लावला. घोड्यांच्या शर्यती, पैदास यातही त्यांना विलक्षण रुची. उत्तम राहणीमान, राजघराण्यातील धुरंधर आणि राष्ट्रप्रमुखांबरोबर ऊठबस असूनही त्यांचे पाय सदैव जमिनीवर राहिले. त्यांनी रूढार्थाने हार्वर्डमध्ये धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. पण धर्माच्या एककल्ली कर्कशपणापासून ते फर्लांगभर दूरच राहिले. धर्म हे जोडण्याचे आणि आधाराचे माध्यम आहे, असे ते मानत. धर्मावरून संघर्ष तीव्र असलेल्या आजच्या किंवा कुठच्याही काळासाठी ही शिकवण अत्यंत मूलभूत तरी महत्त्वाचीच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिन्स आगा खान हे इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि त्यांची कन्या फातिमा व जामात अली यांचे वंशज मानले जातात. निझारी इस्मायली शिया पंथाचे ते इमाम. प्रेषितांचे खरे वारसदार कोण या मुद्द्यावरून इस्लाममध्ये सुन्नी आणि शिया असे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. यांतील शिया पंथीयांचेही तीन उपपंथ निर्माण झाले, त्यांतील एक इस्मायली शिया. या उपपंथामध्येही निझारी इस्मायली आणि दाऊदी बोहरा असे दोन आणखी उपपंथ आहेत. आगा खान आणि त्यांचे नजीकचे पूर्वज हे निझारी इस्मायली पंथातले. आगा खान हे पदनाम इराणच्या शाहकडून १९व्या शतकात बहाल करण्यात आले.

प्रिन्स करीम अल हुसेनी यांचा जन्म १९३६ मध्ये जिनिव्हात झाला. प्रिन्स अली खान यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव, तर सर सुल्तान मोहमद शाह ऊर्फ आगा खान तिसरे यांचे नातू. स्वित्झर्लंड, नैरोबीत बालपण गेल्यानंतर प्रिन्स करीम यांनी हार्वर्ड विद्यापीठात इस्लाम आणि इतिहासात पदवी घेतली. त्यांचे आजोबा सर सुल्तान मोहमद शाह १९५७ मध्ये निवर्तले, पण इच्छापत्रात त्यांनी करीम यांनाच उत्तराधिकारी नेमले. आपल्या मुलांऐवजी नातवाला आगा खान नेमण्यामागे त्यांची भूमिका अशी होती, की आधुनिक काळाशी सुसंगत आणि वयाने युवा असलेल्या आपल्या नातवाने निझारी इस्मायली पंथाचा वारसा पुढे चालवावा. अणुयुग सुरू झाले असताना असे करणे योग्य ठरेल, असेही आगा खान तिसरे यांना वाटायचे.

आगा खान चौथे यांनी आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक लोकप्रियता आणि पाठिंबा मिळवला. त्यांचा पंथ सुन्नींच्या तुलनेत अल्पसंख्य होता आणि त्याचे परिणामही इस्मायलींना भोगावे लागायचे. पण प्रत्येक वेळी आगा खान मदतीस धावून यायचे. त्यांच्या सभांना इस्मायली मोठ्या संख्येने हजेरी लावायचे. घोड्यांच्या शर्यती आणि उंची पार्ट्यांमध्ये दिसणारी ही व्यक्ती धार्मिक निरूपणेही तितक्याच तन्मयतेने करायची. इमाम होणे म्हणजे रोजच्या जीवनातून निवृत्ती घेणे नव्हे. उलट इमामाने त्याच्या समुदायाचे रक्षण आणि मार्गदर्शन सहभागातून केले पाहिजे, असे आगा खान यांनी एकदा म्हटले होते. ‘आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क’ या धर्मादाय संघटनेच्या माध्यमातून जगभर आरोग्य, गृहनिर्मिती, शिक्षण, संस्कृतीसंवर्धन, ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये आगा खान यांनी भरभरून योगदान दिले आहे. या संघटनेचे वार्षिक अंदाजपत्रकच एक अब्ज डॉलर इतके असल्याचे सांगितले जाते. आगा खान चौथे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta article on prince karim aga khan iv css