देशभरातील विद्यापीठांना ‘प्रेरक व्यक्ती’च्या प्रतिमेबरोबर सेल्फी काढण्याची मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आल्यावर अवघे शैक्षणिक वर्तुळ आनंदून गेले. प्रत्येक महाविद्यालयात या सेल्फीसाठी विद्यार्थ्यांकडून विचारणा होऊ लागली. मात्र हे छायाचित्र काढण्याचे काम शिस्तीत व्हावे यासाठी अनेक विद्यापीठांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) सेल्फी काढताना स्वत:ची सावली ‘प्रेरक व्यक्ती’च्या छायाचित्रावर पडणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. सूर्य कोणत्या बाजूला आहे याचे भान ठेवणे गरजेचे.

२) छायाचित्रात देशाला दिशा देणाऱ्या योजना धूसर दिसल्या तरी चालतील, पण ‘प्रेरक व्यक्ती’चे छायाचित्र ठळक दिसेल याची काळजी घ्यावी.

३) सेल्फी काढताना आपण एका राष्ट्रकार्यात सहभागी होतोय याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.

४) छायाचित्रात स्वत:चा चेहरा मोठा व ‘प्रेरणादायी व्यक्ती’चा छोटा असे चालणार नाही. आपण हिरो नाही. देशाचे खरे हिरो कोण आहेत, याचे भान प्रत्येकाने बाळगणे आवश्यक.

हेही वाचा >>> पहिली बाजू : भारताची नवी मुत्सद्देगिरी!

५) तुमचा फोटो पासपोर्ट साइज व ‘प्रेरक व्यक्ती’चा फुल साइज अशी प्रतिमा कॅमेऱ्यात सेट झाल्यावरच सेल्फीची कृती करावी. गुरू महान असतो ही भावना अशा वेळी मनात ठेवावी.

६) छायाचित्र काढताना छबीच्या उजव्या बाजूलाच उभे राहणे बंधनकारक.

७) तुम्ही वेगवेगळे पोशाख घालून अनेक सेल्फी काढू शकता. ‘खास जॅकेट’ असेल तर उत्तम.

८) उत्कृष्ट सेल्फी काढणाऱ्याला सार्वजनिक समारंभात गौरवले जाईल व अंतिम परीक्षेत दहा गुण दिले जातील. या गुणांमुळे त्याचे एकूण गुण शंभरपेक्षा जास्त भरले तरी ते मान्यताप्राप्त समजले जातील.

९) ‘एंटायर पोलिटिकल सायन्स’च्या विद्यार्थ्यांना सेल्फीसाठी प्राधान्य दिले जाईल. समजा यापैकी एखाद्या विद्यार्थ्यांचा सेल्फी सरस ठरून त्याला मिळालेल्या अतिरिक्त गुणांच्या आधारे तो मेरिटमध्ये आलाच तरी त्याला ‘दुसरा मेरिट’ असेच संबोधण्यात येईल. पहिला मेरिट कोण हे तुम्ही सर्व जण जाणताच.

११) सेल्फी काढणाऱ्या प्रत्येकाला वर्गात त्याचा अनुभव विशद करताना फलकावरील मजकुरापेक्षा  ‘प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वा’च्या चेहऱ्यावरील भावाचे यथार्थ वर्णन करावे लागेल. शेवटी योजनेपेक्षा प्रेरणा महत्त्वाची.

१२) घाईगडबडीत सेल्फी काढण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. तसे करून चुकीचा फोटो व्हायरल केल्यास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

१३) या उपक्रमाला विरोध करणाऱ्या मंडळींपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे व तसा अडथळा कुणी आणला तर तात्काळ व्यवस्थापनाला कळवावे.

१४) सेल्फीद्वारे घेतलेले छायाचित्र घरी फ्रेम करून लावले तर उत्तमच.

१५) यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला म्हणून ‘कॅम्पस प्लेसमेंट’ मोहिमेत प्राधान्य दिले जाईल.

(संबंधित संकेतस्थळावरून या निर्णयासोबत जोडलेले सेल्फी पॉइंटचे संकल्पचित्र अचानक गायब झाल्याने या सूचना स्थगित समजाव्यात.)

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on ugc directs universities to set up narendra modi selfie points on campuses zws