साधारण दोन दशकांपूर्वी संथाली भाषेतून एक कविता हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली आणि या कवितेने जाणकार वाचकांचं लक्ष वेधलं. तिचा साधारण आशय पुढीलप्रमाणे होता…

एवढ्या दूर मला देऊ नका बाबा की जिथं तुम्हाला भेटायला येण्यासाठी घरच्या बकऱ्या विकाव्या लागतील. अशा देशात नका लग्न करून देऊ जिथे माणसापेक्षा देवच जास्त राहतात. अशा घरासोबत नका जोडू माझं नातं जिथं मोठं अंगण नसेल, कोंबड्याच्या आरवण्याने जिथली सकाळ होत नाही आणि जिथं परसदारामागून डोंगराआड सूर्य मावळताना दिसत नाही… अशा हातात माझा हात देऊ नका ज्या हातांनी कोणतंही झाड लावलेलं नाही, ना कोणते पीक घेतलं ना कोणाला साथ दिली ना कोणाचं ओझं उचललं. अशा ठिकाणी लग्न लावून द्या की जिथं तुम्हाला पायी सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येईल. एका नदीच्या काठावर जर मी रडत असेल तर दुसऱ्या काठावर आंघोळ करणाऱ्या तुम्हाला ते सहज ऐकू येईल. असा जोडीदार जो सुखदु:ख वाटून घेईल, बासरी, ढोल वाजवण्यात पारंगत असेल आणि वसंतात रोज फुलं घेऊन येईल.

संथाली भाषेतल्या कवयित्री निर्मला पुतुल यांची ही कविता. त्यांचा जन्म झारखंडमधल्या दुमका जिल्ह्यात कुरुवा नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांनी सुरुवातीचं कविता लेखन संथालीतून आणि नंतर हिंदी भाषेतून केलं. त्यांचा संथाली, हिंदी असा द्विभाषिक कवितासंग्रह ‘अपने घर की तलाश में’ २००४ साली प्रसिद्ध झाला पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या ‘नगाडे की तरह बजते शब्द’ या संग्रहाची. पुढे ‘बेघर सपने’ हा त्यांचा कवितासंग्रह आला. ‘वागर्थ’ या नियतकालिकात त्यांची कविता पहिल्यांदा छापून आली तेव्हा देशभर तिचे पडसाद उमटले. मोठमोठ्या लेखकांपासून ते अगदी तुरुंगातून आलेल्या कैद्यापर्यंत त्यांना कुठून कुठून पत्रं यायला लागली. यात ‘तुमची कविता वाचली आणि स्त्रीकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. कधी स्त्रीचा आदर करत नव्हतो पण आता यापुढे नक्की करेन’ असं पत्रातून सांगणारा कैदी असेल किंवा देशातल्या वेगवेगळ्या भाषांमधले वाचक असतील… या सर्वांनाच ही कविता खूप आवडली. या कवितेला जंगलाचा आदिम असा गंध तर होताच पण तिने आदिवासी समाजातल्या स्त्रियांच्या दु:खाचे जणू तळघरच उघडले. शिवाय शब्दांना आदिवासी लोकगीतांची लय होती. ‘केवळ कविता लिहिणाऱ्यांच्या यादीत आपला समावेश व्हावा म्हणून हे लेखन नाही तर आपले शब्द नगाऱ्यासारखे वाजावेत आणि तो आवाज ऐकून लोकांनी आपापल्या घरांमधून रस्त्यावर बाहेर पडावं’, असं निर्मला पुतुल यांनी आपल्या कवितेबद्दल सांगितलं आहे.

आदिवासी जीवनावर भारतीय भाषांमध्ये इतरांनी लिहिलेलं लेखन विपुल आहे. कविता, कथा, कादंबऱ्यांमध्ये आदिवासींविषयी आस्थाभावाने लिहिलेली अनेक उदाहरणे सापडतील पण कालांतराने खुद्द आदिवासींमधूनच लेखन यायला प्रारंभ झाला. झारखंडसारख्या भागातून आदिवासी जीवनाचं खरंखुरं चित्र यायला लागलं. ज्यांना या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता ते सहानुभूतीपोटी लिहायचे पण अनेकदा कोणत्या हंगामात कोणती रानफुलं फुलतात हे लिहिताना गफलत व्हायची. प्रत्यक्ष त्या जीवनातूनच आलेल्या लेखक, कवींनी लिहिल्यानंतर मात्र शब्दातला सच्चेपणा उठावदार दिसू लागला. साधारणपणे या शतकाच्या सुरुवातीपासून थेट आदिवासींमधूनच आलेल्या झारखंडमधल्या लेखक, कवींनी आता मोठा अवकाश व्यापला आहे.

संथाल या आदिवासी समूहाची संथाली ही भाषा. झारखंडमधला संथाल परगणा हे या भाषेचे प्रभावक्षेत्र. तशी ही भाषा प्रामुख्याने झारखंडसह पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, आसाम अशा राज्यांमध्ये त्या समूहाकडून बोलली जाते. २००० साली झारखंड या वेगळ्या राज्याची निर्मिती झाली आणि २००३ साली संथालीला भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत स्थान मिळालं. ‘ओल चिकी’ ही संथालीची लिपी आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी पंडित रघुनाथ मुर्मू यांना ही लिपी आविष्कृत करण्याचं श्रेय जातं. अर्थात झारखंडमधले सगळेच संथाली लेखक या लिपीतून लिहीत नाहीत. कुणी देवनागरीतही लिहितं. याशिवाय त्या त्या राज्यात राहणारे काही संथाली लेखक तिथल्या भाषेत लिहितात. पूर्व बिहार भागात राहणारे देवनागरीत लिहितात तर उडिया, बंगाली या भाषेतून लिहिणारे संथालीही आहेतच. झारखंडमधल्याच आदिवासी कवयित्री वंदना टेटे या हिंदीतून कविता लिहितात. खुद्द झारखंडमध्ये संथाल, मुंडा, खडिया, कुडूक असे समूह आहेत. या वर्षी ‘फिर उगना’ या कवितासंग्रहाला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेली कवयित्री ही झारखंडमधल्या कुडूक या समूहाशी संबंधित आहे. ब्रिटिश सत्ताकाळापासून ते वर्तमानापर्यंत इथल्या आदिवासींवर होणारा अन्याय आणि या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या असंख्य कथा आजही नव्याने लिहिल्या जातात. या भाषेत योगदान दिलेले काही ज्येष्ठ लेखकही आहेतच पण गेल्या दोन दशकांत जे धुमारे फुटले ते आणखी कितीतरी पिळदार आहेत. इथल्या लोकनृत्यापासून ते भिंतीवरील चित्रांपर्यंत असलेला कलेचा वारसा हा साहित्यातूनही झिरपताना दिसतो. अनुकरण अथवा प्रभावापासून पूर्णपणे मुक्त तरीही स्वत:चा ठसठशीत असा चेहरा असणारं साहित्य ही आता संथाल परगण्याची ओळख होऊ लागली आहे.

निर्मला पुतुल यांच्याबरोबरच जसींता केरकेट्टा हे झारखंडमधलंच कवितेतलं अतिशय महत्त्वाचं नाव. ईश्वर और बाजार, जडों की जमीन यासारखे त्यांचे कवितासंग्रह. निसर्गाशी घट्ट रुतून असलेलं नातं, वर्तमानाचं विश्वभान, सर्वसंचारी बाजाराने ग्रासलेले नातेसंबंध या गोष्टी जसींता यांच्या कवितेत प्रकर्षाने येतात. कवितेची भाषा अतिशय थेट, जराही कृत्रिमतेचा वारा न लागलेली. ‘वे पेडों को बर्दाश्त नही करते क्योंकि उनकी जडे जमीन मांगती है’ असं अवघ्या दोन ओळींत निसर्गावरचं अतिक्रमण जोरकसपणे सांगण्याचं सामर्थ्य या कवितेत आहे. ‘अ से अनार लिखा, उन्होने कहा आह! कितना सुंदर/ आ से आम लिखा, उन्होने आम के गुण गाए/ जब अ से अधिकार लिखा/ वे भडक गए’ असा ठाम आत्मस्वर असणारी ही कविता आहे. केवळ आदिवासी जीवनाची स्थिती ही कविता सांगत नाही तर व्यवस्थेशी डोळा भिडवत सातत्याने काही प्रश्न उपस्थित करते.

हौसदा सौभेद्र शेखर हा तरुण संथाली लेखक. तो इंग्रजीत कथात्म साहित्य लिहितो. ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ हा त्याचा कथासंग्रह. ‘आदिवासी नही नाचेंगे’ या नावाने हिंदीत आणि ‘नाही नाचणार आदिवासी आता’ या नावाने तो मराठीतही उपलब्ध आहे. या कथा प्रसिद्ध झाल्या तेव्हा हौसदा यांच्यावर झारखंडमध्ये जोरदार टीका झाली. या पुस्तकावर बंदीही घातली गेली. संथाली समाजातल्या स्त्रियांची बदनामी यातल्या एका कथेतून होते असा आरोप या लेखकावर लावण्यात आला होता. ‘नोव्हेंबर इज फॉर मायग्रेशन’ असं मूळ इंग्रजी कथेचं नाव. शहरातून गेलेल्या अनेकांकडून अनेक प्रकारची आमिषं दाखवली जातात. त्यातल्याच लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या एका असहाय संथाली आदिवासी तरुणीचं चित्रण या कथेत येतं. या कथेने संथाल समूहाचीच बदनामी होत असल्याचा वाद त्या वेळी उपस्थित करण्यात आला होता.

अनुज लुगून हा तरुण कवी झारखंडमधल्याच सिमडेगा या जिल्ह्यातला. ‘बाघ और सुगना मुंडा की बेटी’ या कवितासंग्रहासाठी त्याला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. ‘बाज़ार भी बहुत बड़ा हो गया है/ मगर कोई अपना सगा दिखाई नहीं देता/ यहाँ से सबका रुख/ शहर की ओर कर दिया गया है/ कल एक पहाड़ को ट्रक पर जाते हुए देखा/ उससे पहले नदी गई/अब ़खबर फैल रही है कि/मेरा गाँव भी यहाँ से जाने वाला है’ अशी अनुज लुगूनची कविता आहे. सत्ता आपली रूपं बदलते तेव्हा या सत्तेचा प्रतिकार करण्यासाठी साहित्यालाही प्रतीकं बदलावी लागतात. अनुज लुगून यांची शैली नवी भाषा घडवणारी आहे. आदिवासींचा संघर्षशील वारसा पचवून त्यांचे लढे आणि त्यांची आयुधं यांना हा कवी नव्याने धार लावू पाहतो.

हे सारे लेखक झारखंडमधले आणि त्यातले बहुतांश संथाल परगण्यातले. संथाल परगण्यातून उमटलेला उच्चार आता प्रतिध्वनीच्या रूपात सर्वदूर जाऊन पोहोचला आहे, त्याचे पडसाद जगभरातल्या सर्वच भाषांमध्ये उमटत आहेत.