ऑपरेशन सिंदूरमधील आत्मघाती ड्रोन्सपासून गाझा युद्धातील स्वयंचलित गॉस्पेलपर्यंत अभ्यासलेल्या उदाहरणानंतर एक गोष्ट नक्की आहे की तंत्रज्ञानाच्या अद्यायावतीकरणानंतर युद्धाचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. ‘किमान खर्चामध्ये कमाल नुकसान’ हे युद्धशास्त्राचे मूलभूत तत्त्व आहे. त्यातूनच शीतयुद्धाच्या काळात लष्करी कारवायांतील क्रांती (रिव्होल्युशन इन मिलिटरी अफेयर्स झ्र आरएमए) ही तंत्रकेंद्रित संकल्पना उदयास आली. जिच्यानुसार मानवतेच्या इतिहासात काही नवीन लष्करी सिद्धांत, धोरणे, युक्त्या आणि तंत्रज्ञान अस्तित्वात आले, ज्यामुळे युद्धप्रकारात अपरिवर्तनीय बदल घडून आले. बऱ्याच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तंत्रकेंद्रित युद्धपद्धतीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन, हल्ल्याची अचूकता वर्धित झाल्यामुळे युद्धाचा खर्च कमी झाला. दुसरीकडे विरोधकांचे म्हणणे आहे की कमी युद्धखर्च ही हूल असून भांडवलकेंद्रित युद्धपद्धती प्रचलित करण्याचा हा छुपा प्रयत्न आहे. वास्तवात, युद्ध स्वस्त होत आहे का? हा प्रश्नच युद्धाचे व्यापक स्वरूप मर्यादित करतो. महान लष्करी तज्ज्ञ कार्ल वॉन क्लॉसविट्झ यांच्या मते राजकारण निरंतर प्रक्रिया आहे. युद्ध हे त्याचेच एक वेगळे माध्यम आहे. तंत्रज्ञानात्मक बदल या माध्यमावर प्रभाव टाकतात, युद्धाच्या राजकीय उद्दिष्टावर नाही! ड्रोन क्रांती प्रत्यक्षात रणांगणावर ड्रोन आणि मानवरहित शस्त्रप्रणालीमुळे आर्थिक आणि मानवी जीवनाची गुंतवणूक बऱ्यापैकी कमी झाली आहे. कारगिल युद्धात दुर्गम आणि खडतर युद्धभूमीवर आधीच मोक्याच्या जागी कब्जा करून बसलेल्या घुसखोरांना हाकलण्यासाठी पुष्कळ प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. तसेच बोफोर्ससारख्या महागड्या तोफा, हवाईदलाचा वापर यांमुळे युद्धाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला होता. सध्याच्या काळात या सर्व मोहिमा आत्मघाती ड्रोन्समुळे प्रभावीपणे पार पडतात. युक्रेन युद्धामध्ये ५०० डॉलर्सपेक्षा कमी किमतीत उत्पादित होणाऱ्या ड्रोन्समुळे लक्षावधी डॉलरचे रणगाडे आणि दारूगोळा नष्ट केल्याची उदाहरणे आहेत. या प्रभावी वापरानंतर युक्रेनने २०२४ मध्ये एक दशलक्षहून अधिक ड्रोन्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मोठ्या प्रमाणावर होणारे या ड्रोन्सचे उत्पादन किमती आणखी कमी करू शकते. साध्या प्लॅस्टिकच्या क्वाडकॉप्टर ड्रोन्सनी (चार फिरत्या चकत्या असणारे) दुर्बल सैन्यबलांसाठी शक्तिवर्धकाची भूमिका पार पाडली आहे. शस्त्रसज्ज प्रतिस्पर्ध्यावर ड्रोन्सच्या समूहाने सलग हल्ले करून मोठ्या सैन्याशी स्पर्धा करता येणे शक्य झाले आहे.
एकीकडे ही स्वस्ताई दिसत असली तरी या ड्रोन्सपासून संरक्षणासाठी सज्ज देखरेख यंत्रणा, दूरस्थ नियंत्रकांचे प्रशिक्षण, ड्रोनविरोधी रडार, जामर्स, वगैरे गोष्टींचा खर्च वाढतो. इस्रायलच्या बाबतीत, ‘आयर्न डोम’ ही यंत्रणा या तंत्रज्ञानाच्या देवघेवीचे उत्तम उदाहरण आहे. ते हमासच्या ज्या रॉकेट्सना अडवते, त्यांची किंमत फक्त काहीशे डॉलर्स असते, तर प्रत्येक अडथळ्यासाठी २० हजार ते एक लाख डॉलर्स इतका प्रचंड खर्च डोममधील मार्गदर्शित क्षेपणास्त्रासाठी केला जातो. इस्रायलच्या म्हणण्यानुसार ‘तंत्रसत्ता’ हे बिरुद मिरविण्यासाठी इस्रायलच्या वाळवंटावरसुद्धा हमासच्या रॉकेटचा स्पर्श होत कामा नये आणि या प्रतिमासंवर्धनासाठी केला जाणारा हा प्रचंड खर्च समर्थनीय आहे. म्हणजेच उच्च तंत्र युगात चार आण्याच्या आक्रमणासाठी बारा आण्याची संरक्षण व्यवस्था उभी करणे नाईलाज झाला आहे.
लढाऊ विमाने
मोठ्या शस्त्रांचा विचार करता पारंपरिक बॉम्ब्सना आजकाल मठ्ठ बॉम्ब असे हिणवले जाते. कारण एकदा डागल्यानंतर हे डोके नसल्याप्रमाणे स्थळकाळाचे भान न बाळगता फक्त फुटायचे काम करतात. (तंत्रयुगात बॉम्ब स्मार्ट झाले आणि जल्पकरूपी मनुष्य माठ झाला ही गोष्ट वेगळी!) आधुनिक बॉम्ब्स डागल्यानंतरदेखील त्यांना क्रूज क्षेपणास्त्रासारखे नियंत्रित करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची प्रचंड अचूकता! मठ्ठ बॉम्बचा अचूक-मार्गदर्शित बॉम्ब बनविण्यासाठी साधारण १० हजार डॉलर्स खर्च होतो. टॉमहॉकसारख्या प्रसिद्ध क्रूझ मिसाइलची किंमत १५ लाख डॉलरच्या आसपास असते. भारताने एमके ३ सारखी उपग्रह प्रक्षेपण करणारी प्रक्षेपके विकसित केली, मात्र तेजस सोडून लढाऊ विमानाच्या बाबतीत उल्लेखनीय यश मिळवले नाही, असे का? हा प्रश्न बरेच जण विचारतात. तांत्रिक कौशल्ये बाजूला ठेवून लढाऊ विमानाच्या प्रकल्पाच्या खर्चाचा आढावा जरी घेतला तरी डोळे गरगरल्याशिवाय राहणार नाहीत. अमेरिकेच्या प्रसिद्ध एफ-३५ या लढाऊ विमान प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे १.७ ट्रिलियन डॉलर्स एवढा आहे (महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा दुप्पट, जगाच्या एकूण वार्षिक संरक्षण खर्चाच्या अर्धा खर्च). ही विमाने कार्यरत असताना जास्त गरम होतात. त्यावर काम करण्यासाठी पेंटागॉन वेगळे काही अब्ज डॉलर्स खर्च करत आहे. विमानाच्या आवृत्तीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांच्या किमतीच नव्हे तर परिचालन खर्चदेखील वाढत आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत आपले संरक्षण बजेट ९.५ टक्क्यांनी वाढवले आहे, मात्र पगार आणि निवृत्तीवेतन या खर्चानंतर लष्कराच्या हातात नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करायला केवळ ३० टक्के निधी उरतो. शेजारील चीनच्या पाचपट अवाढव्य असणाऱ्या संरक्षण अर्थसंकल्पामुळे भारत अतिरिक्त खर्चासाठी दडपणाखाली येत आहे.
बहुआयामी युद्धे
युद्ध आता केवळ बंदूक आणि क्षेपणास्त्रे यांच्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. डिजिटल आणि बौद्धिक (कॉग्निटिव्ह) आयामांमुळे सायबर हल्ले वगैरे कमी गुंतवणुकीचे माध्यम वाटू शकते. मात्र अशा हल्ल्यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणावर संरक्षण व्यवस्था उभी करावी लागते. २०१० मध्ये इराणच्या अणू कार्यक्रमावर प्रसिद्ध ‘स्टक्सनेट’ हा सायबर हल्ला झाला ज्यामुळे इराणचा आण्विक कार्यक्रम दोन दशके पिछाडीवर गेला. प्रत्यक्ष हल्ल्यापेक्षा हा हल्ला कितीतरी किफायतशीर होता. त्याच वेळी अशा अपारंपरिक हल्ल्यांना पारंपरिक प्रत्युत्तर मिळाले तर होणाऱ्या परिणामांचा अंदाज बांधणे कठीण आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम, संप्रेषण उपग्रह, नागरी समाज लक्ष्यीकरण, रेलगन प्रकल्प (जिथे पारंपरिक क्षेपणास्त्राच्या तुलनेत विद्याुत तंत्राच्या साहाय्याने दारूगोळ्याला पाच हजार किमी प्रति तास एवढा वेग प्राप्त होतो) अशा नवीन आघाड्यांमुळे युद्धाचा खर्च उत्तरोत्तर वाढतच आहे.
बलप्रयोगाच्या सिद्धांतानुसार जेव्हा संघर्षात लष्कराच्या जीवितहानीची शक्यता दुरापास्त असते तेव्हा राजकीय नेतृत्व लष्करी हल्ल्यांसाठी उत्सुक असते. त्यामुळेच अफगाणिस्तानमध्ये सुरुवातीला अमेरिकेच्या लष्कराची जीवितहानी झाल्यानंतर युद्धविरोधी वातावरण झाले आणि नंतर हवाई आणि ड्रोन हल्ल्यांना प्राधान्य देण्यात आले. त्याच वेळी या स्वयंचलित प्रणालींच्या चुका सीमेपलीकडील शत्रूच्या वेदनांना नैतिक बळ पुरवून सहानुभूती मिळवून देण्याची शक्यता असते. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा हल्ला राजकीय जोखीम कमी करत असला तरी त्याच्या कायदेशीर, नैतिक आणि रणनीतिक परिणामांमुळे आंतरराष्ट्रीय आघाड्यांपासून प्रतिस्पर्ध्याच्या मानसिक शक्तीपर्यंत बरेच काही अवलंबून असते.
आधुनिक शस्त्रास्त्रांचे काम फक्त युद्ध जिंकण्यापुरते मर्यादित नसून त्याद्वारे राज्यव्यवस्थेला आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यास आणि प्रतिस्पर्ध्यावर जरब बसवण्यास मदत होते. उत्तर कोरियातील किम घराण्याने आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांच्या बळावर आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली पत उंचावून ठेवली आहे. चीनचा विचार करता महागडे असूनदेखील स्टील्थ फायटर, विमानवाहू नौका इत्यादींचा समावेश आपल्या ताफ्यात करण्यामागे – जग हे सामर्थ्याचे पूजन करते- हेच तत्त्व आहे. क्षेपणास्त्र चाचण्या, संयुक्त लष्करी सराव, सायबर हल्ले करण्याची क्षमता हे तंत्रकेंद्रित जगात मित्र आणि शत्रूंसाठी संकेत म्हणून वापरले जाऊ लागले आहेत. तंत्रज्ञान हे केवळ शस्त्र नाही, तर एक राजकीय भाषा झाली आहे. अमेरिका आणि सोव्हियतमधील शीतयुद्धादरम्यानच्या शस्त्रस्पर्धेत कोट्यवधी डॉलर्स खर्च झाल्याचे जगाने अनुभवले. त्यातून निर्माण होणारी जरब हे शांततेचे कारण असेल तर समकालीन शांतता ही मौल्यवान गोष्ट झाली आहे.
तंत्रज्ञान युद्धाचे स्वरूप बदलते, पण त्याचे मूलभूत राजकीय अर्थशास्त्र कायम असते. स्वस्त ड्रोन्स, अधिक स्मार्ट क्षेपणास्त्रे आणि एआयचलित सेन्सर्स यामुळे रणनीतीत मोठा बदल होऊन मनुष्यहानीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, संरक्षणाचा वाढता खर्च, स्थावर मालमत्तेच्या हानीचे वाढलेले प्रमाण आणि बहुआयामी संघर्षामुळे युद्धाच्या आर्थिक मूल्याबरोबर राजकीय मूल्य प्रभावित झाले आहे. तंत्रज्ञानवर्धन युद्धमूल्याच्या धारेला अनेक वाहिन्यांमध्ये विभागते. जेणेकरून त्याचा प्रत्यक्ष परिणाम सुखद दिसतो. मात्र अंतर्गत रक्तस्रावाप्रमाणे हजारो वाहिन्यांमधून त्याची किंमत निरंतर चुकविणे चालूच असते.
हे दर बुधवारचे सदर केवळ या आठवड्यात गुरुवारच्या अंकात.
phanasepankaj@gmail.com