हे देवा, आता या संकटातून तूच मला वाचव. मी जशी तुझी उपासक तशी लोकशाहीचीसुद्धा आहे. त्याच निर्मळ व पवित्र भावनेतून मी ईव्हीएमची पूजा केली. त्यामागे प्रसिद्धीचा कोणताही स्टंट नव्हता. तसे असते तर मी माझा चेहरा दिसेल अशा पद्धतीने छायाचित्र ‘पोष्टले’ असते. मतदान यंत्र असा मजकूर लिहिलेला खर्डा, पूजेचे तबक दिसावे हाच हेतू यामागे होता. तरीही माझ्यावर नाहक गुन्हा नोंदवला गेला. देश अतिशय वेगाने सश्रद्धतेकडे वाटचाल करीत असताना अजूनही मनात धर्मनिरपेक्षतेची जळमटे बाळगणाऱ्या काही अधिकाऱ्यांमुळे हे घडले. विश्वगुरूंपासून सर्वच महनियांनी संसद हे लोकशाहीचे मंदिर असा उल्लेख वारंवार केला आहे. त्या मंदिरात जाण्याचा मार्ग याच यंत्राच्या कुशीतून जातो. त्याचे हेच पावित्र्य लक्षात घेऊन मी पूजेचा घाट घातला. हे यंत्र ज्याच्यावर प्रसन्न होईल त्याचा मंदिर प्रवेश पक्का अशी समजूत आहे. तुला अथवा तुझी उंची गाठलेल्या कुणालाही प्रसन्न करायचे असेल तर त्याची पूजा करावी लागते. शुद्ध मन ठेवून मी हे कार्य केले. या यंत्राची कृपा झाली तर ते यशाचे दान पदरात घालते अशी सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे मी हे पाऊल उचलले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणताही उत्सव साजरा करताना आधी आपण पूजेचे तबक हाती घेतो. सार्वत्रिक निवडणुका या सण आहेत असेच सांगितले जाते. त्यामुळे मी हे कृत्य करून गुन्हा केला नाही अशी माझी ठाम धारणा झाली आहे. कुठल्याही चांगल्या कामाचा शुभारंभ पूजाअर्चेेने करावा असे भारतीय परंपरा सांगते. शासकीय कामांचे भूमिपूजन वा उद्घाटन करतानासुद्धा विधिवत पूजा केली जातेच. मग पवित्र अशा मतदानाचा प्रारंभ होण्याआधी यंत्राची पूजा केली तर त्यात गैर काय? तशीही या यंत्राची ओळख सत्ताधाऱ्यांचा आधुनिक देव अशीच निर्माण झाली आहे. मग त्याचे पावित्र्य जपणे हा गुन्हा कसा ठरू शकतो? संविधानाने उपासनेचा अधिकार सर्वांना दिला आहे. त्याचे पालन मी केले, तर त्यावरून एवढे काहूर माजविण्याची गरज काय? भविष्यात मलाही आमदार व्हायचे आहे. त्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून मी सध्या रोज गायींना हिरवा चारा खाऊ घालते. याची शेकडो छायाचित्रे मी जपून ठेवली आहेत. उद्या ती व्हायरल झाली तर या श्रद्धेवरसुद्धा आक्षेप घेतला जाईल. एक ‘सुशिक्षित’ स्त्री म्हणून हा माझ्यावर अन्यायच ठरेल ना!

माझ्यासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्तीसाठी हे यंत्र मातेसमान आहे. लोकशाहीची जननी म्हणूनच आम्ही त्याकडे बघतो. त्याच भावनेतून त्याचे पूजन केले. इतक्या श्रद्धेने केलेल्या कृतीला अपराध समजण्याची चूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. एखाद्याच्या भक्तीचा अपमान करण्याचा कोणताही अधिकार या लोकांना नाही. तेव्हा देवा, आता तूच पुढाकार घे व या सगळ्यांच्या डोक्यात श्रद्धेचा प्रकाश टाकण्याचे कार्य हाती घे. एवढीच तुला माझी नम्र विनंती.

(रुपालीताईंनी ‘देवाचा धावा’ या शीर्षकाखाली लिहिलेला हा मजकूर अजून पोष्टलेला नाही.)

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma voting machine evm voting amy
Show comments