मागच्या लेखात आपण ‘क्षय मास’ या संकल्पनेचा ऊहापोह केला. पण समजा एखाद्या महिन्याचा क्षय झालाच तर त्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या सणांचं काय? का ते साजरे करायचेच नाहीत? उत्सवप्रिय भारतीयांना हे कसं रुचावं?

पण तसं नाही, कारण पंचांगकर्त्यांनी याही प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि तेही नियमबद्ध. म्हणजे एखाद्या महिन्याचा क्षय झाला तर त्यातल्या सणवारांचं काय करायचं याचाही नियम आहे. तो नियम असा की ज्या महिन्याचा क्षय होतो त्या महिन्यात साजरे करायचे सारे सण त्याआधीच्या महिन्यात साजरे करायचे. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा क्षय झाला तर मार्गशीर्ष महिन्यातले सारे सण कार्तिक महिन्यात साजरे करायचे, वगैरे.

सगळं कोष्टक कसं बसवलं आहे पाहा. एखादा महिना अधिक आला तर त्याच नावाचे दोन महिने असतात. पहिला अधिक आणि दुसरा निज. पण त्या महिन्यात साजरे करायचे सारे सण निज महिन्यात साजरे करायचे असा नियम आहे. आणि जर एखाद्या महिन्याचा क्षय झाला तर त्या महिन्यातले सण त्याच्या आधीच्या महिन्यात साजरे करायचे असा नियम आहे. थोडक्यात, अधिक किंवा क्षय मास आल्याने एखादा उत्सव किंवा सण साजरा करायचा नाही असं होऊच शकत नाही. पंचांगासाठी नियम बनवण्याचं स्वातंत्र्य घेतानादेखील भारतीयांची उत्सवप्रियता ध्यानात ठेवली आहे!

गणेशोत्सव, शारदीय नवरात्र वगैरे सणांचं ठीक आहे. या नियमाचं पालन केलं म्हणजे ते सण निर्विघ्नपणे पार पडतील. पण दिवाळीचं काय? तो मामला जरा किचकट आहे. कारण बाकी सारे सण एकाच महिन्यात येतात. दिवाळीचं तसं नाही. ती दोन महिन्यांत विभागून येते – आश्विन कृष्ण पक्षाचे शेवटचे काही दिवस आणि कार्तिक शुक्ल पक्षाचे पहिले काही दिवस. पंचांगकर्त्यांच्या दृष्टीने ही मोठी अवघड बाब आहे. कारण नियमांचं पालन तर केलंच पाहिजे आणि त्याच वेळी लोकांची विशेष गैरसोय होऊ नये, त्यांना एखाद्या चमत्कारिक, अवघड परिस्थितीला तोंड द्यायला लागू नये. हे कोडं कसं सुटावं?

या नियमांचं पालन केलं असता दिवाळीवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना याचा काही प्रमाणात परामर्श मागे एका लेखात घेतला आहे. पण आज ते विश्लेषण पूर्ण करू.

त्यासाठी आता चार पर्यायांचा विचार केला पाहिजे – आश्विन महिन्याचा क्षय झाला तर, कार्तिक महिन्याचा क्षय झाला तर, आश्विन महिना अधिक आला तर आणि कार्तिक महिना अधिक आला तर.

समजा, आश्विन महिन्याचा क्षय झाला, तर? तर नियमानुसार आश्विन महिन्यातले सगळे सण भाद्रपद महिन्यात साजरे करावे लागतील. शारदीय नवरात्र साजरा करत असतानाचा श्रीगणेशोत्सव साजरा करावा लागेल! सर्वपित्री अमावास्या (भाद्रपद अमावास्या) आणि लक्ष्मीपूजन (आश्विन अमावास्या) एकाच दिवशी येईल! मोठीच अडचणीची परिस्थिती.

हेही ठीक. पण जर कार्तिक महिन्याचा क्षय झाला तर? याहून अधिक बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. कारण आता नियमानुसार कार्तिक महिन्यातले सगळे सण आश्विन महिन्यात साजरे करावे लागणार. म्हणजे घटस्थापनेच्या (आश्विन शुक्ल प्रतिपदा) दिवशीच बलिप्रतिपदा (कार्तिक शुक्ल प्रतिपदा) साजरी करायची! त्यानंतर भाऊबीज साजरी करायची आणि मग महिनाअखेरीस दिवाळीचे उर्वरित दिवस साजरे करायचे असा चमत्कारिक प्रकार होईल.

पण हे संभवत नाही. कारण आश्विन किंवा कार्तिक महिन्यांचा क्षय होऊच शकत नाही. क्षय झालाच तर तो फक्त मार्गशीर्ष, पौष आणि माघ यांपैकी एखाद्या महिन्याचा होतो.

आता अधिक महिन्यांचा विचार करू. आश्विन महिना अधिक आला तर काहीच अडचण नाही. कारण आधी अधिक आश्विन येईल. या महिन्यात कोणते सणवार साजरे करायचा प्रश्नच नाही. मग निज आश्विन येईल. त्यात सगळे सणवार साजरे होतील. त्यानंतर लगेच कार्तिक महिना येईल. तेव्हा, दिवाळीवर काही परिणाम होणार नाही.

पण कार्तिक महिना अधिक आला तर? तर मात्र अडचण होऊ शकते. कारण तशा परिस्थितीत आधी आश्विन महिना येईल. लक्ष्मीपूजनापर्यंतचे सगळे दिवस या महिन्यात साजरे होतील. नंतर अधिक कार्तिक महिना येईल. या महिन्यात अर्थातच कोणतेही सणवार साजरे करायचे नाहीत. त्यानंतर निज कार्तिक महिना येईल. या महिन्यात सगळे सणवार साजरे करायचे. त्यामुळे बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दोन सण या महिन्यात साजरे होतील. थोडक्यात, दिवाळी दोन भागांत वाटली जाईल.

हे शक्य आहे का? तसं पाहिलं तर हो. पण हा योग अत्यंत दुर्मीळ. सुमारे ७०० वर्षांतून एकदा कार्तिक महिना अधिक येतो. यापुढे कार्तिक महिना अधिक आला अशी घटना २६६० साली घडेल. तेव्हा, तोपर्यंत दिवाळी अखंडित राहील हे नक्की. नियमबद्ध कालगणनेकरता एवढी किरकोळ गैरसोय सहन करावी लागली तरी काही हरकत नसावी.