विसरता काहीच येत नाही. हे वास्तव आधी नीट स्वीकारावे लागते आणि आपल्यासाठी आपणच अधिक महत्त्वाचे असतो, इतरांचे आपल्याबद्दलचे मत नाही, याची जाणीव जागृत ठेवावी लागते, हा मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला स्लोअरने नेमका लक्षात ठेवला…
गोष्टी लक्षात राहणे हा रोग असू शकतो, याची जाणीव स्लोअर शहाणेला तेव्हा झाली, जेव्हा त्याने एकदा वर्तमानपत्रात आलेल्या लेखात वाचले, की आपण डोक्यात खूप कचरा साठवतो, ज्याची वेळोवेळी साफसफाई केली नाही, तर तो कुजून मेंदूला पोखरू शकतो. एकविसाव्या शतकाची पहाट उजाडल्यापासून ज्या नव्या संकल्पनांचे वारे वाहायला सुरू झाले, त्याचाच भाग असलेला, हा ‘विस्मृतीचे लाभ’ या शीर्षकाचा लेख स्लोअर शहाणेने काळजीपूर्वक कात्रण करून ‘जपून’ ठेवला. विस्मृतीवर असूनही तो का जपून ठेवला, याची एक छोटी गोष्ट आहे, ती अशी…
‘‘नको’ असलेल्या अनेक वस्तू आपण घरात जमा केलेल्या असतात, ज्यांचे गाठोडे बोजड झाले, तरी आपल्याला सोडवत नाही. मनावरही न विसरलेल्या अनेक गोष्टींचे आपण ओझे करून ठेवतो, ज्यामुळे आपले मन नवे विचार, नव्या संकल्पना चटकन स्वीकारत नाही,’ असे त्या लेखात म्हटले होते. यात असेही म्हटले होते, की जुन्या वस्तू साठवल्याने आपण नव्या वस्तू खरेदी करण्यापासून परावृत्त होत राहतो, जो जागतिकीकरण काळातील अर्थचक्राला चालना देण्यातील एक अडथळा आहे. स्लोअर शहाणे त्या वेळी कॉलेजातून नुकताच समाजवाद, भांडवलशाही आदी संकल्पना शिकून बाहेर पडलेला असल्याने, त्याला हे वाक्य बाजारपेठीय रेटा या प्रवर्गात घालावेसे वाटले. तसे ते त्यात कायमचेही गेले असते आणि त्याचा पुढे आठव अजिबात आलाही नसता; पण ‘मध्यमवर्ग, त्याचे कप्पे आणि समृद्धीचे नवे पर्व’ यावर झालेले एक उद्बोधक व्याख्यानही त्याने नेमके त्याच वेळी ऐकल्याने त्याने या लेखाचा साकल्याने विचार करण्याचे ठरवले आणि विचार करायचा आहे, हे ‘विसरू’ नये म्हणून त्याचे कात्रण जपून ठेवले!
व्याख्यानाचा परिणाम असल्याने या लेखाचा विचार करताना स्लोअर शहाणेने दोन कप्पे केले. एक मानसिक पातळीवरचा आणि दुसरा भौतिक. या दोन्ही बाबी आपण स्वतंत्रपणे पाहिल्या, तर काही उलगडे व्यवस्थित होतील, असे त्याला वाटले. आधी त्याने मानसिक पातळीवर झालेली अडगळ तपासायचे ठरवले. लेखात म्हटल्याप्रमाणे, न विसरलेल्या जुन्या गोष्टींचे ओझे काय आहे, हे त्याने ‘आठवायला’ सुरुवात केली. मित्राने चिडवले होते, तेव्हाच्या प्रसंगाचा तुकडा त्याला स्मृतींच्या एका कप्प्यात सापडला.
आपण त्या वेळी खूप चिडलो होतो, हे स्लोअरला आठवले. कारण काय? तर मित्रांमित्रांतील चिडवाचिडवीच्या वेळी एक मित्र त्याला ‘वेडा’ म्हटला होता आणि त्याचा राग अजून स्लोअरच्या मनातून गेला नव्हता. असे का झाले असावे, याचा स्लोअरने आता विचार सुरू केला. वेडा ही काही रूढार्थाने शिवी नाही, मित्रांतही चालू नये, इतकेही ते निंदनीय विशेषण नाही, ते काही उगारलेले शस्त्र नाही किंवा ते डागलेले दूषणही नाही. मग तरी ते दोन अक्षरी – पाहायला गेले, तर क्षुल्लक – विशेषण आपल्याला का इतके टोचत आहे? त्या मित्राशी आताही बोलताना, वागताना त्याची अढी राहिल्यासारखे का मनात रुतून बसले आहे? ते मनावरचे ओझेच; ते आपल्याला का उतरवता येत नाहीये? …स्लोअरला एकामागोमाग एक असे तीन प्रश्न पडले. अशी तिहाई साधली, की प्रश्न उत्तराच्या पूर्णत्वाकडे जातो, असे स्लोअरला माहीत असल्याने तो आता आपल्याला आपले मन काय उत्तर देते, याची वाट पाहू लागला.
जखमेवर चढलेली खपली काढताच सल भळभळून वाहू लागली. स्लोअरच्या लक्षात आले, की त्यात रागापेक्षाही विषादाचा प्रवाह अधिक वेगवान आहे. रूढार्थाने वेडा असण्याला नसलेली मान्यता आणि ‘शहाणे’ असूनही किमान जवळच्यांनी, तरी वेडेपणा स्वीकारण्याची आग्रही तोशीस यांतील संघर्षात धारातीर्थी पडलेल्या समंजस स्वीकाराच्या ठिकऱ्या आपल्याला टोचत आहेत, अधूनमधून सारख्या आठवत आहेत, असा निष्कर्ष स्लोअरने काढला. शालेय जीवनात कधी तरी घडलेली ही घटना किती तरी दिवस, महिने, वर्षं आपल्या मनात बिनभिंतींचे घर करून राहिली, असे त्याला वाटले. त्याला अचानक उमगले, की कंपास आणि कर्कटकाशिवाय वर्तुळ काढता येणारे जेव्हा रेषा मोडण्याचा प्रमाद करतात, तेव्हा त्यांना ‘वेडा’ म्हणतात. स्लोअरच्या या आकलनबिंदूपासून निघणारी सरळ रेषा खरे तर त्याला समंजस स्वीकारापर्यंत घेऊन गेली असती, पण तीही त्याने मोडून वाकडी केल्याने तो एकविसावे शतक उगवल्यानंतर शिरस्ता झालेल्या रस्त्याने मनोविकारतज्ज्ञाकडे गेला.
मनोविकारतज्ज्ञाच्या खोलीबाहेरील प्रतीक्षा कक्षात बसलेला असताना त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक सर्वसाधारण होते. त्यांना पाहून, ‘मनोरंजनपटांत अशांना उगाच ‘वेगळे’ दाखवले जाते,’ हा विचार स्लोअरच्या मनाला स्पर्शून गेलाच. त्यांच्या मनाला नेमक्या कोणत्या जखमा आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून तरी कळत नव्हते. त्यातील एकाने स्लोअरकडे स्मितहास्याची एक हलकी लकेर भिरकावली. स्लोअरनेही त्याला प्रतिसाद दिला. बाकी सगळे शांत होते, पण विचित्र कोणीच वाटले नाही. मित्र आपल्याला ‘वेडा’ म्हटल्यामुळे ते तपासायला आपण इथे आलो का, हा क्लिनिकमध्ये शिरताना मनाला चाटून गेलेला त्याचा प्रश्न या समजेच्या बिंदूपाशी गळून पडला. सगळे तसे ठीकच सुरू होते.
अशा ठीकपणामुळे स्लोअरला आपण मनोविकारतज्ज्ञाच्या प्रतीक्षा कक्षात बसूनही ‘नॉर्मल’ विचार करत असल्याचे समाधान वाटले. तेवढ्यात त्याला मनोविकारतज्ज्ञाने आत बोलावले. तो त्यांच्यासमोर बसल्यावर त्याला असे उगाच वाटून गेले, की त्या मनोविकारतज्ज्ञाने आपण आत कसे आलो ते कसे बसलो, इथपर्यंतच्या सर्व हालचालींचा त्याच्या नजरेने ‘एक्स-रे’ काढून आपल्याबद्दल काही आडाखे बांधून ठेवले आहेत. जेव्हा मनोविकारतज्ज्ञाने स्लोअरला त्याचा ‘प्रॉब्लेम’ सांगायला सांगितले, तेव्हा तो कथन करताना स्लोअरच्या मनात हा बारीक पूर्वग्रह मेंदूच्या मागे कुठे तरी चिकटून राहिलाच. पण, तरी त्याने मित्र, त्याचे आपल्याला ‘वेडा’ म्हणणे, त्यामुळे आपल्याला विषाद वाटणे वगैरे कथा व्यवस्थित सांगितली.
या संपूर्ण कथनाच्या वेळी मनोविकारतज्ज्ञ आपल्या डोळ्यांत डोळे घालून आपल्याकडे बघतो आहे आणि त्याच्या डोळ्यांत दिलाशाची एक हलकी झाक आहे, याचे मात्र स्लोअरला बरे वाटले. ‘रुग्णाला डॉक्टर औषधापेक्षाही दिलाशाचे चार शब्द ऐकवून बरे करतो,’ या वचनाची त्याला आठवण झाली आणि ‘मनोविकारतज्ज्ञ समोरच्याचे चार शब्द ऐकून घेऊन त्याला मोकळे करतो,’ असे नवीन वचन तयार करायला हवे, असे त्याला वाटून गेले. तेवढ्यात इतका वेळ ऐकणारा मनोविकारतज्ज्ञ बोलू लागला. त्याने दोन वाक्ये फार महत्त्वाची सांगितली. तो म्हणाला, ‘गोष्टी विसरायच्या, मनातून पुसून टाकायच्या असे काही मुळात करताच येत नाही. पण, त्या विसरता येत नाहीत, तर त्याबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे न विसरता येणाऱ्या गोष्टी आपण विसरू शकत नाही, हे आधी नीट स्वीकारणे आणि आपल्यासाठी आपणच अधिक महत्त्वाचे असतो, इतरांचे आपल्याबद्दलचे मत नाही, याची जाणीव जागृत ठेवणे.’ स्लोअर शहाणेला हे समारोपाचे वाक्य फारच पटले आणि ते नेमके लक्षात ठेवून तो क्लिनिकमधून बाहेर पडला.
घरी परतताना त्याला हलके वाटू लागले होते. वाटेत पावसाची मोठी सर आल्याने तर त्याला मनावरचे मळभ सरल्यासारखे वाटले. इतके, की बंगल्यातील आपल्या पहिल्या मजल्यावरील भाड्याच्या घराच्या पायऱ्या चढताना पायऱ्यांच्या कोपऱ्यांत उगवलेले शेवाळही त्याला हिरवी मखमली झालर वाटून गेले. घरात शिरताना मात्र त्याच्या लक्षात आले, की घर जुने झाले आहे, तरी आपण ते बदललेले नाही. ही आयुष्यातून न सुटलेली गोष्ट आहे. पण, त्याला ओझे कसे म्हणायचे? ते तर घर आहे, फक्त बांधकाम नाही. पण, बांधकामाला अवकळा आली आहे, हे खरे. पावसाने भिंती ओलसर झाल्या आहेत, काही ठिकाणी त्यांचे पोपडे उडून गेले आहेत, काही ठिकाणी त्या गळू लागल्या आहेत… छपरातून फरशीवर ठिबकणारे थेंब टपोरे व्हायला लागल्यावर ते पुसावे लागतात. त्यासाठी आजीच्या मऊसूत साडीची केलेली फडकी उपयोगी पडतात.
तेवढीच आजीची ‘आठवण’. स्लोअरची ही ‘आठवण’ इतकी ताजी होती, की त्याला आजीसारखा स्मृतिभ्रंशासारखा आजार आनुवंशिकतेने आला असता, तरच ती पुसली गेली असती. विस्मृतीत माणसाला आपण विसरलो आहोत, हे नंतर आठवते तरी; स्मृतिभ्रंशात तीही सोय नाही. स्लोअरला एकदम हलायला झाले आणि मनोविकारतज्ज्ञाकडून निघताना आलेला हलकेपणा घरात शिरताना जड झाला. आजीचा स्मृतिभ्रंश आपल्याला कळलादेखील नाही आणि आपण त्या वागण्याला वेडेपणा म्हणत गेलो, हे आठवून तो ओशाळला. ही अपराधी भावना का मनातून जात नाही, असा विचार करता, त्याला मनोविकारतज्ज्ञाचे वाक्य आठवले, ‘विसरता काहीच येत नाही…’ मग ते स्वीकारण्यासाठी स्लोअरने रोजनिशी काढली आणि त्यात लिहिले, ‘आजी, तुझी आठवण येते!’
ता.क. स्मृतीच्या समंजस स्वीकारापुढचे, ‘आपल्यासाठी आपणच महत्त्वाचे’ या मनोविकारतज्ज्ञाच्या वाक्याचा अन्वयार्थ अशा वेळी कसा लावायचा, हे स्लोअर शहाणेला अजूनही न कळल्याने ते जाणून घेण्यासाठी तो नियमित मनोविकारतज्ज्ञाकडे जायला लागला. एकविसाव्या शतकाचा हाच शिरस्ता होता…
siddharth.kelkar@expressindia.com