ब्रिटिशांनी उभारलेल्या मुघल गार्डनचे अमृत उद्यान असे नामकरण करण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतल्यानंतर देशभरात यावर उमटलेल्या प्रतिक्रया अजमावण्यासाठी एका चमूला भारत भ्रमणावर पाठवण्यात आले. या साधकबाधक प्रतिक्रियांच्या संकलनातून मुघल साम्राज्याच्या लहानातल्या लहान पाऊलखुणा पुसण्यासाठी आणखी कशाकशाची नावे बदलता येतील हे जाणून घेणे हा एकमेव हेतू यामागे होता. सुमारे महिनाभर देश पालथा घातल्यावर या चमूने आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर केला. त्यातल्या ठळक नोंदी व लक्षवेधी वाक्ये पुढीलप्रमाणे :  ‘मुघलकाळात प्रचलित झालेले बयाण, जामीन, पंचनामा यांसारखे अनेक शब्द अजून भारतीय न्यायव्यवस्थेत टिकून आहेत. ते बदलावेत यासाठी सध्या फटकून वागणारी न्यायव्यवस्था कधीही आग्रही राहिली नाही. न्यायालयीन व्यवस्थेत महत्त्वाचा दस्तऐवज अशी ओळख असलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘वल्द’ हा शब्द बदलून त्याऐवजी वडील, किंवा जनक असा शब्द वापरावा अशी जनभावना दिसली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभर मोगलाई पद्धतीच्या खाद्यपदार्थाची रेलचेल सर्वत्र आढळली. त्यात मोगलाई चिकन, मुघल पराठा, कोरमा, कबाब या मांसाहारी पदार्थासोबत फिरणी, फालुदा, सरबत, कुल्फी, बर्फी, जिलेबी, गुलाबजामुन यांसारख्या गोड पदार्थाचा समावेश आहे. या सर्वाना कोणती पर्यायी नावे द्यावीत यावरून ठिकठिकाणी वाद झडत असल्याचे पाहायला मिळाले. यावरून देशभरातील हॉटेल मालकांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. राष्ट्रीय विचारांच्या मालकांनी ‘कृपया मोगलाई चिकन मागून स्वत:ला अपमानित करून घेऊ नका’, ‘फिरणीला टाका बरणीत’, ‘आता फिरणी नव्या वैदिक स्वरूपात’, ‘येथे अमृत चिकन मिळेल’ अशा स्वरूपाचे फलक ठळकपणे लावल्याचे आढळून आले तर धर्मनिरपेक्ष गटातील मालकांनी ‘युगल खाये मुघल’, ‘मुघल चिकन न खाणे ही काही मोगलाई आहे का?’, ‘जीवनात चालेल पण जेवणात धर्म नको’ अशा स्वरूपाचे फलक लावल्याचे चित्र अनेक शहरांत दिसले. सरकारच्या या निर्णयानंतर अनेक शहरांतील ‘मुघल’शी संबंधित उद्यानांची नावे पटापट बदलण्यात आली पण बहुतेकांनी अमृत हेच नाव स्वीकारले. त्यामुळे भविष्यात नामसाधम्र्याचा दोष टाळण्यासाठी खाद्यपदार्थ तसेच इतर अनेक ठिकाणांना भारतीय संस्कृतीशी संबंधित नवी नावे उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. नाव बदलाने देशभर वेग घेतला असला तरी प्रामुख्याने उद्यानांची रचनाही बदलून ती भारतीय पद्धतीची कशी करता येईल यावरही विचार होणे गरजेचे. काही शहरांत ‘ओम’ व ‘स्वस्तिक’च्या आकाराची उद्याने तयार होत असल्याचे पाहायला मिळाले. ‘एक देश, एक पक्ष, एक नेता या धोरणानुसार उद्यान रचना तसेच मुघलांशी संबंधित सर्व नावे बदलण्यासंबंधी देशभर एकच सूत्र असावे, अशी आमची शिफारस आहे.’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government renaming british designed sham mughal gardens as amrit udyan zws
First published on: 31-01-2023 at 03:01 IST