‘त्यांनी आत्मचरित्र लिहिले असते, तर ते तीन खंडांत असते : जाझ संगीत, दृश्यकला आणि फोटोग्राफी हा पहिला, सिनेमॅटोग्राफी (छायालेखन) हा दुसरा आणि वाहनांच्या त्यांनी शालीनपणे जोपासलेल्या छंदाचा तिसरा खंड’ असे ज्यांच्या निधनानंतर विख्यात समीक्षक शांता गोखले यांनी लिहिले, ते नवरोझ कॉन्ट्रॅक्टर!
‘२२ जून १८९७’, ‘लिमिटेड माणुसकी’, सदाशिव अमरापूरकर- शबाना आज़्मी यांच्या भूमिका असलेला २००२ सालचा ‘देवी अहिल्याबाई’ या नचिकेत व जयू पटवर्धन दिग्दर्शित चित्रपटांचे छायालेखक म्हणून मराठीजनांना नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांचे नाव माहीत हवे होते. तसे ते माहीत नाही, हे उघडच आहे. छायालेखकांना स्वतंत्र ओळख देण्याइतकी प्रगल्भता भारतीय प्रेक्षकांत येण्याच्या आतच डिजिटल जमाना सुरू झाला हेही खरे. पण ‘मणि कौल यांच्या ‘दुविधा’चे छायालेखक’ ही ख्याती मात्र त्यांना १९७३ मध्येच मिळाली होती. त्यानंतर अगदी कमी चित्रपट त्यांनी स्वीकारले, त्यापैकी ‘पर्सी’ आणि कन्नड भाषेतील ‘देवर कडु’ हे भारतातील मोठय़ा पडद्यांपर्यंत गेले. बाकी ‘ल बलाद दे पाबूजी’ हा राजस्थानातील ‘पड’ लोककलेवर चित्रित झालेला लघुपट फ्रेंच होता किंवा पिएर हॉफमन यांच्यासाठी नवरोझ यांनी १९८४ सालच्या चीनमध्ये एक लघुपट चित्रित केला होता. पुढे या चिनी दौऱ्यावर आधारित, ‘ड्रीम्स ऑफ द ड्रॅगन्स चिल्ड्रन’ नावाचे छायाचित्र-पुस्तकही निघाले.
नवरोझ हे बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दृश्यकला विभागाचे विद्यार्थी. छायाचित्रणात विशेष प्रावीण्य मिळवून चित्रकलेचा अभ्यासक्रम त्यांनी साठच्या दशकाच्या पूर्वार्धात पूर्ण केला. मणि कौल यांच्याशी त्यांची भेट १९६९ मध्ये झाली. ‘उसकी रोटी’साठी त्यांनी स्थिर-छायाचित्रण केले. पण कौल यांच्यामुळे ते छायालेखनाच्या क्षेत्रात आले. चित्रकलेतले समकालीन गुलाम मोहम्मद शेख, भूपेन खक्कर वगैरे.. यापैकी भूपेन यांची नवरोझ यांनी टिपलेली छायाचित्रे लंडनच्या ‘टेट गॅलरी’च्या संग्रहात आहेत. ‘भारत परिक्रमा’ त्यांनी ‘घडवलेला’ लघुपट. त्यासाठी ते स्वत: मोटरसायकलवरून भारत फिरले, स्वत:सह साथीदारांचे अनुभव त्यांनी टिपले. त्यांचा दुसरा चित्रपट ‘झाडू कथा’ .. केरसुणी आणि आपल्या देशात दिसणारी तिची अनेक रूपे, तिचे सांस्कृतिक महत्त्व यांना वाहिलेल्या या लघुपटानंतर बऱ्याच वर्षांनी आयेषा धारकर यांनी ‘बीबीसी’साठी त्याच विषयावरला श्रवणपट तयार केला.
‘कार इंडिया/ बाइक इंडिया’, ‘झिगव्हील्स’, ‘ओव्हरड्राइव्ह’ आदी नियतकालिकांसाठी त्यांनी लेखन आणि छायाचित्रण केले. वेग तर हवा, पण सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व हवे, जबाबदारीनेच वाहन चालवले पाहिजे, हा आग्रह अगदी ‘पारशीपणे’ ते मांडत. त्यामुळे या रगेल छंदातसुद्धा त्यांना फक्त सुसंस्कृतांचीच साथ मिळे.. बाकीचे त्यांच्या वाटेला जात नसत. पण १५ जून रोजी बेंगळूरुत मोटरसायकल चालवत असतानाच दुसऱ्या वाहनाने ठोकरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आत्मचरित्र त्यांनी कधीच लिहिले नाही; पण त्यांच्याइतक्याच रगेल- अभ्यासू- आणि आधुनिकतेची ‘संस्कृती’ जाणणाऱ्या सिनेमॅटोग्राफरला त्यांच्यावर लघुपट करावासा वाटेल, इतका चरित्र-ऐवज ते मागे सोडून गेले.
