Pahili baju River conservation through public participation protection campaign to implement ysh 95 | Loksatta

पहिली बाजू : लोकसहभागातून नदी संवर्धन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध विभागांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

lekh river pollution

राज्यात नदी संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘चला जाणू या नदीला’ हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ७५हून अधिक नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. लोकसहभागातून नद्यांचा अभ्यास करणे, आराखडे व नकाशे तयार करणे, नद्यांना अतिक्रमण आणि प्रदूषणातून मुक्त करणे, पाणी अडवून भूजलस्तर उंचावणे ही उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत..

सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात विविध विभागांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २ ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ७५ नद्यांच्या परिक्रमेस आरंभ करण्यात आला. २ ऑक्टोबर २०२२ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ही यात्रा होत असून राज्यातील ७५ हून अधिक नद्यांची परिक्रमा करण्यात येत आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी १५ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘चला जाणू या’ अभियानाला सुरुवात करण्यात आली.

जगातील सर्व संस्कृती नदीच्या काठावरच निर्माण झाल्या आणि बहरल्या. जेव्हा या नद्या नष्ट झाल्या तेव्हा संस्कृतीही नष्ट झाल्या. नदी आपली माता आहे, हे लक्षात ठेवून सर्वानी नद्यांचे माहात्म्य जाणून घेणे आणि त्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. नद्या प्रवाही, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ७५ नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमामुळे नद्यांशी असलेले आपले नाते पुनरुज्जीवित होईल. जलसंधारण आणि जलसाक्षरता या दोन्ही संकल्पनांची सांगड घालणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. आजच्या काळात पाणी हेच अमृत आहे. नद्यांना अतिक्रमण, अस्वच्छतेसारख्या विविध समस्यांतून मुक्त करणे गरजेचे आहे. या संदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. उत्सवांना लोककल्याणकारी योजनांशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे. मला विश्वास वाटतो की, नदी संरक्षण आणि संवर्धनात लोकसहभाग मिळेल आणि यातून नद्यांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

नदी हा माणसासाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे, मात्र हा स्रोतच दूषित झाला आहे. महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत हे आपण मान्य करायला हवे. या नद्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे, हे ओळखून गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण ७५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर हे काम नियोजनबद्धरीत्या पूर्ण व्हावे यासाठी आमच्या विभागाने काही समित्या स्थापन केल्या आहेत. या अभियानाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

महाराष्ट्राला वारंवार भेडसावणाऱ्या पूर आणि दुष्काळासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळावी यासाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, अभियानाअंतर्गत जनसामान्यांना नदीसाक्षर करणे, त्या संदर्भातील उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, नद्या अमृतवाहिनी व्हाव्यात यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी रूपरेषा आखणे, नदीच्या तटावरील आणि प्रवाहातील जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार व नियोजन करणे, नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून त्याचा अहवाल संबंधितांना सादर करणे, पावसाचे पाणी अडवून भूजल स्तर उंचावणे, अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन समस्यांचा अभ्यास करणे आणि त्याचा नदी व मानवी जीवनावर होणारा परिणाम अभ्यासणे, महाराष्ट्रातील सुमारे ७५ नदी खोऱ्यांतून नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करणे, शासनाबरोबर समाज आणि नदीविषयक काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जलव्यवस्थापन तपासणे अशी या समितीची ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

राज्यातील ७५ नद्यांचे संवर्धन करताना जलबिरादरी संस्थेच्या विशेष नैपुण्याची मदत घेतली जात आहे. तर राज्य शासनाचे जलसंपदा, जलसंधारण, वन इत्यादी विभाग यामध्ये जोडले जाणार आहेत. नदी संरक्षण आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग काम करणार आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याची उपयुक्तता घटत आहे. त्यावर उपाय म्हणून नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडविणे हे या अभियानातून अभिप्रेत आहे. लोकसहभागातून हे अभियान निश्चित यशस्वी होईल व प्रत्येक समिती त्या दृष्टीने काम करेल.

केवळ निधी देऊन नद्या स्वच्छ होणार नाहीत. आपला नदीशी असलेला व्यवहार आणि आपल्यावरील संस्कार यात परिवर्तन होणे आवश्यक आहे. नदीला समजून घेताना नदीवर प्रेम करणे गरजेचे आहे. नदी संवर्धन करण्यासाठी निधीचे नियोजन किंवा आराखडा आवश्यक आहेच, पण त्याला लोकसहभागाचीही जोड मिळायला हवी. मुळातच नदी यात्रा किंवा नदी परिक्रमा आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश हा राज्यातील नद्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेणे हा आहे. लोकसहभागातून नदीचे आरोग्य चांगले कसे राखावे, तिचे संवर्धन कसे करावे, याविषयी माहिती देण्यात येईल. पारंपरिक माहिती देत असताना आधुनिक विज्ञानाची जोड देऊन नदी संवर्धन आराखडा तयार करण्यात येणार असून त्या आराखडय़ाची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नदी संवर्धन अभियानाअंतर्गत नदीचा तट, प्रवाह आणि परिसरातील जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार प्रसार करण्यात येईल. नदी खोऱ्यांचे नकाशे, नदीची पूररेषा व पाणलोट क्षेत्रांचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षांतील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याबाबतची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे यावर भर दिला जाईल. याचबरोबर अभियानाबाबत जनजागृती करणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे ही कामेही या समित्या करतील. नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासही प्राधान्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ७५ नदी खोऱ्यांतून नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करणे, शासनाबरोबर समाज आणि नदीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुसूत्रता आणणे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जलव्यवस्थापन तपासणे अशी या समितीची ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. मला खात्री वाटते की येत्या वर्षभरात आपण नदी यात्रेच्या माध्यमातून नदीच्या संवर्धनास हातभार लावू.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 00:04 IST
Next Story
लोकमानस : ठराव नाकारण्याचा निर्णय लोकशाहीनेच!