‘‘वयाचे ८१ वे वर्ष सुरू आहे. मनुष्याचा आयुर्दाय (जीवनकाळ) शंभर वर्षांचा असतो, असे गृहीत धरतात. परंतु नेम नाही. आयुष्याचा भरवसा नसतो. शंभर वर्षांचा आयुर्दाय गृहीत धरला, तर आता सुमारे २० वर्षे राहिली आहेत. आता आयुष्य थोडे राहिले म्हणून मनाचा विरस होत नाही. आयुष्याची ही संध्याकाळ असली तरी ती निरामय वाटते. मृत्यू कोठे व केव्हा आहे, हे कळत नाही, तोपर्यंत मृत्यूची तशी भीती वाटत नाही. मृत्यूची अजाण भीती जिवाच्या स्वभावातच भरलेली असते. त्याला मी अपवाद कसा असणार? परंतु आयुष्याच्या अंती चिरंतन शांती आहे हे निश्चित!
काळ फार वेगाने निघून जातो असे म्हणतात. परंतु माझी गेली ८० वर्षे खूप संथपणे निघून गेली आहेत, असे मला वाटते. कारण या माझ्या आयुष्याच्या छोट्याशा कालखंडात माझ्या खासगी जीवनाच्या, सार्वजनिक जीवनाच्या आणि जगाच्या फार मोठ्या घडामोडी मी पाहिल्या आहेत. विविध घटनांनी भरगच्च भरलेला इतिहास माझ्यासमोर घडला आहे. माझ्या भवतालच्या जगात अनेक सामाजिक व राजकीय स्थित्यंतरे झाली आणि खासगी आयुष्यही अशाच अनपेक्षित स्थित्यंतरांनी गजबजलेले मी अनुभवले आहे.
माझे आयुष्य आशा व उत्साहाने भरलेले दिसते. परंतु आर्थिक स्वास्थ्य कधीच लाभले नाही. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत उद्याचे काय, हा प्रश्न कायम राहिला, तरी मनाला विवंचनेने घेरले नाही. आयुष्यात आनंद टिकला, याचे कारण वात्सल्य, स्नेह आणि प्रेम यांनी भरलेल्या जगात मी जगलो आहे. माता, पिता, गुरू, बंधू, भगिनी, मित्र, नातेवाईक, पत्नी, मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे इ. स्वरूपात जी जी माणसे आयुष्यात आली, त्यांनी प्रेमाचे व स्नेहाचेच विश्व निर्माण केले. मतभेद वारंवार होत होते.
संघर्षाचेही प्रसंग अनेक आले; परंतु शिल्लक जे राहिले, ते सहानुभूतीने भरलेले खासगी व सार्वजनिक जीवन होय. लहानपणी जन्मगाव सोडले आणि वाई येथे शिक्षणाकरिता आलो व तेथेच जन्मभर स्थिरावलो. येथे गुरू, सहाध्यायी आणि सहकारी मित्र यांच्याशी चिरंतन स्नेहाचे नाते निर्माण झाले. वाईच्या नागरिकांनी अखंडपणे आदरानेच माझ्याकडे पाहिले. वाई हे मूळचे रूढीनिष्ठ मध्यमवर्गीयांचे गाव. माझी मूळची जीवनपद्धती सनातनी रूढीवरच आधारलेली होती. तरी माझ्यात लवकर बदल झाला. माझ्या सामाजिक क्रांतिकारक विचारांच्या उमेदीच्या कालखंडात सामाजिक संघर्षही उत्पन्न झाले. वाईतील तरुण पिढीने मला साथ दिली, त्यामुळे कालांतराने हे संघर्ष शमले.
माझ्या मनावर लहानपणापासूनच सार्वजनिक घडामोडींचे खोल ठसे उमटू लागले. त्यामुळे माझे सबंध खासगी जीवन सार्वजनिक जीवनाचाच एक अंश बनले. खासगी जीवन त्यातच बुडून गेले. त्यात खासगीपणा फार थोडा राहिला आहे. उदा. १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना दीर्घकालीन कारागृहवासाची शिक्षा झालेली आणि त्यामुळे जनमनावर दु:खाची छाया पसरलेली आठवते. त्यानंतरच्या गेल्या ७२ वर्षांतले ठळक सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रसंग आठवायचे म्हटल्यास ते सहज आठवतात आणि मन:चक्षूंपुढे सरकत जातात.
१९१४ चे जागतिक युद्ध अचानकपणे भडकलेले वाचनात आले आणि त्या वेळी ब्रिटिशांचे शत्रू असलेल्या जर्मनांच्या एकापाठीमागून एक सरसावणाऱ्या विजयी आक्रमणांच्या कथा रोज वाचू लागलो. पुणे येथे गुळगुळीत चमकदार कागदावर प्रसिद्ध होणाऱ्या मोठ्या आकाराच्या ‘चित्रमय जगत’ नावाच्या मासिकात एका प्रसिद्ध सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून उतरलेल्या त्या रोमहर्षक युद्धकथा अधाशीपणे वाचत होतो. दोस्त राष्ट्रांच्या पराभवाने व जर्मनांच्या विजयाने मन उल्हसित होत होते. ‘चित्रमय जगत’चे ते सिद्धहस्त लेखक म्हणजे महाराष्ट्राचे नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर होते. १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेहून सुटका झाली व त्यामुळे सबंध देश आनंदाने भरून गेला, याची कधीही न बुजणारी आठवण अजूनही ताजीच वाटते.
१९१५ मध्ये ‘गीतारहस्य’ची पहिली आवृत्ती निघाली. टिळकांच्या स्वाक्षरीने ‘गीतारहस्य’ची एक प्रत भेट म्हणून गुरुवर्य नारायणशास्त्री मराठे यांच्याकडे आलेली मी पाहिली. मी ‘गीतारहस्य’ची दोन पारायणे एका महिन्यात पुरी केली आणि पंडितांनी चालविलेल्या साधक-बाधक चर्चेत सामील झालो.’’
drsklawate@gmail.com