राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महात्मा गांधींनी सर्वोदय कार्याविषयी सेवाग्राम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत विचारविनिमय केला. त्या अनुषंगाने गांधीहत्येनंतरच्या काळात महाराज म्हणतात  : गांधीजींनी त्यांची विचारसरणी प्रसृत करण्याची जबाबदारी त्यांच्याजवळ तयार झालेल्या कार्यकर्त्यांवर टाकली व सर्व तऱ्हेची जबाबदारी संघटितपणे पार पाडता यावी म्हणून, त्यांच्या विचाराला जे सज्जन काही अंशी जाणू शकले त्यांनी ‘सर्वोदय – समाज’ नावाची संस्था स्थापन करून या संस्थेतूनच बापूंचे कार्य त्यांच्या संकल्पाप्रमाणे पूर्ण करण्याचे ठरविले. प्रामुख्याने ग्रामीण जीवन आदर्श करणे हे सर्वोदय समाजाचे कार्य आहे. प्रत्येक खेडे स्वावलंबी बनून खेडय़ाचा सर्व कारभार तेथील लोकांनी सांभाळावा व दुसऱ्या खेडय़ांशी राष्ट्रीयतेने, मानव्यबुद्धीने सहकार्य करावे आणि जेव्हा भारतवर्षांच्या संरक्षणाचा प्रश्न येईल तेव्हा सर्वानी धावून जावे व आपल्या देशाचे सर्व तऱ्हेने रक्षण करावे, हाच त्यांचा सिद्धान्त मी समजू शकलो.

हेही वाचा >>> चिंतनधारा : नामस्मरण कुणाचे व कशासाठी?

आमच्या देशावर कुणालाही शत्रुत्वबुद्धीने पाहण्याची दृष्टी असू नये व आमच्या मानवी स्वातंत्र्याला कुणीही गुलाम करू नये, ही वृत्ती देशात वा परदेशातही राहू नये, म्हणूनच राजकारणाकडे देशाने पाहावे; पण त्याखेरीज सर्व कार्य देशाच्या खेडय़ांनी सहकार्याने उचलावे हाच त्यांच्यापुढे विचार असावा असे महाराजांचे मत आहे. ते म्हणतात : सर्वोदयी म्हणवणाऱ्यांनी नि:स्वार्थ बुद्धीने, त्यागाने, सत्तेचा आव न आणता, अधिकाराच्या जागेला बळी न पडता, लोकांच्या हृदयाचे मणी व्हावे व सर्वोदय समाजाच्या सिद्धान्ताचा प्रचार करावा आणि लोकांनीही हाच आजच्या युगाचा धर्म समजून मनात कोणतीही जातीयता, सांप्रदायिकत्व, कार्याचा अवास्तव अभिमान न ठेवता, मानव्यतेच्या अधिष्ठानावरून ज्यांना जो धर्म प्रिय त्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे आदरयुक्त वागावे. खेडय़ाची सर्व चिंता राजकारणाला नको व राजकारणाची काळजी सर्वोदयाच्या समाजकारणी लोकांना नको. सेवेच्या दृष्टीने सर्वानी सर्वाशी सहकार्य करीत असावे व प्रसंगी सर्वाच्या कार्यात मदत करावी व लाचलुचपत न देताघेता जे राष्ट्रसेवेला लायक असतील, ज्यांना जनता बहुमान देत असेल व फंदफितुरी न करता जे निवडून येत असतील, त्यांना जनतेकडून राजकारणाचा मान देता यावा, हेच कार्य गांधीयुगाचे आहे, या कार्याला लायक जनता तयार करणे आजच्या सर्वोदय समाजाचे महत्त्वाचे कार्य आहे.

हेही वाचा >>> चिंतनधारा : जग कसे चालले आहे?

सर्वोदय समाजाची पूर्णता, गरीब व श्रीमंत सारखे ठेवण्यात, खेडे व शहर समान करण्यात, देवता व मनुष्याच्या बुद्धीची समानता आणण्यात व शेतातील कामगार आणि राज्यतंत्र चालवणाऱ्यांच्या बुद्धितंत्राचे ध्येय सारखेपणाने समजण्यात आहे. आम्ही आमच्या शक्तीने कसे लायक वा किती कमी पडतो, हे आपल्या कर्माने समजण्याएवढे समाजशिक्षण जनतेला करून देणे, यातच सर्वोदयाच्या कार्याची फलनिश्चिती आहे.

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj explained importance of gandhi ideology zws