महाराष्ट्र तसेच अन्य प्रांतांतील संतपरंपरेविषयी चिंतन मांडताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : गुरू नानकांनी त्याकाळची परिस्थिती पाहिली. सर्व साधुसंतांना आपल्यात मिळवून घेण्याकरिता व समाजावर उत्तम परिणाम व्हावा म्हणून संतांची प्रमाण भजने, अमरवाणी एक केली ‘हे सर्व शब्द ज्ञानरूपच आहेत. त्यांचे बोधोद्गार वाचणे म्हणजेच त्यांची पूजा करणे’ असा गंभीरपाठ लोकांना देऊन पंजाबचा सारा विस्कटलेला समाज एका मार्गावर आणला. जसा हिंदूंना धडा दिला तसाच अन्य धर्मीयांनाही इशारा दिला की ‘याच्या पलीकडे जाल तर परिणाम भोगाल’; आणि गुरू गोविंदसिंगांनीच याची आठवण करून दिली. तुलसीदासांनी अनेक दु:खद परिस्थितीतून लोकांचे समाधान करून त्यांना रामाची महाविद्या शिकविली आणि त्याचा बाणा लोकात जागृत करून समाजाची इभ्रत वाचविली. इकडे रामदासांनी धर्माकरिता काय मदत केली तीही सर्वाच्या निदर्शनास आलेलीच आहे. तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाचा एककल्लीपणा काढून, कर्मठ रूढीला आळा घालून ‘सामुदायिकत्व काय असते, मी आपल्याकरिता की विश्वाकरिता?’ याचा पाठ पंढरपूरचे पीठ स्थापन करून दिला; त्याच ठिकाणी संतांचे संमेलन निर्माण करून लोकांच्या भावना जागृत केल्या. असे किती तरी आदर्श आहेत ज्यांनी लोकांकरिता आपले प्राण खर्ची घातले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा बुवा म्हणविणारा अथवा वैदिक म्हणविणारा धर्मोपदेशक समाज ‘आम्ही जुनेच करीत असतो’ म्हणताना दिसतो, तर त्यांनाही या बाबतीत स्वस्थ कसे राहावेसे वाटते? आणि असे दिसल्यावरून कोणी असे का म्हणू नये की ‘आजच्या बुवालोकांची संस्थाने वा संप्रदाय, ‘चकाचक’ खाण्यात, मानमरातब राखण्यात व आशीर्वाद देण्यात धुंद असणाऱ्या संस्था होत! पुत्राचे वरदान देण्यातच त्यांची तपश्चर्या खर्च होते!’ महाराज म्हणतात, त्यापेक्षा आहे त्या पुत्रांचीच सुसंस्कारमय स्थिती होण्याकरिता तुम्ही का काळजी घेत नाही? आणि ज्यांची तुम्ही काळजी घेता ते पुत्र आशीर्वादाने होऊ लागले तर जोड पाहून लग्न न लावताच किंवा झाडाझुडांतूनच तुम्ही अशी संताने निर्माण का करीत नाही, की ‘लोकांना जे त्रास देत असतील, सज्जनांना जे छळीत असतील त्यांच्याकरिता हे भस्मासुर काढले आहेत’ म्हणून? उगीच धर्मभोळय़ा लोकांना असा विपरीत अर्थ भासवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा स्पष्ट असे म्हटलेले काय वाईट की ‘बाबा, हे सर्व निसर्गाच्या आणि तुमच्या कर्तृत्वाच्याच अधीन आहे. आम्ही लोक फक्त समजूत करून देणारे आहोत,’ म्हणून? महाराजांना येथे हे सांगावयाचे आहे की, संत-सामर्थ्यांचा हा मार्ग नव्हे! कारण जुनी चरित्रे पाहिल्यानंतर आणि आताच्या बुवांच्या कृत्याकडे पाहिल्यावर जमीन-अस्मानचा फरक दिसून येईल. महाराज ग्रामगीतेत लिहितात,

साधू, संतचि मूल देती तरी।
का वांझ जगी राहती।
संत धन, वैभव अर्पिती।
तरी भिकारी न दिसावे।।

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj is the divine role model of ancient amy
Show comments