राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षणविषयक दृष्टिकोन मांडताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘ज्या जगात आपणास कर्तबगारीने जगायचे आहे, दु:खी लोकांनाही हातभार लावायचा आहे, त्या जगात येणाऱ्या अडीअडचणींचे व जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचे ज्ञान प्रत्येक मनुष्याला झालेच पाहिजे. याचेच नाव शिक्षण! अर्थात् त्यात जीवनात आवश्यक नसलेल्या गोष्टींपेक्षा आवश्यक अशा गोष्टींचा प्रामुख्याने समावेश केला गेला पाहिजे. परंतु अलीकडे आयुष्यभर ज्या गोष्टींची आवश्यकता लागणार नाही, अशा कित्येक विषयांचे ज्ञान मुलांच्या डोक्यात कोंबण्यात येते व आवश्यक गोष्टींत ‘बारा गाडे बोंब’ असल्याने, परीक्षा उत्तीर्ण होताच नोकरी न मिळाल्यास, ‘पुढे काय?’ हा प्रश्न उभा राहतो. शिक्षणपद्धतीमुळे साधे धंदे करण्याची, शेती करण्याची लाज वाटते आणि उपासमार किंवा चोरी-चहाटीशिवाय मार्गच उरत नाही. असे शिक्षण काय उपयोगाचे. मग त्याला देण्यात येणारे महत्त्व अनाठायीच नाही काय?’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : विजयादशमीला नवा इतिहास घडवू या!

‘‘खरे शिक्षण तेच, जे मनुष्याला स्वावलंबी बनवेल, सेवाप्रवृत्त करेल. परंतु आज महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थीही यापासून दूर गेला आहे. बाहेर पडल्यावर स्वतंत्रपणे काही करण्याची धमक नाही. तसे उपयुक्त ज्ञानही त्याच्याकडे नाही. उत्तम नागरिक होण्याऐवजी बिलंदरपणा, माणुसकीऐवजी पद, जीवनदृष्टीऐवजी उथळपणा, संस्कृतीऐवजी स्वच्छंदवृत्ती व कामातील स्फूर्तीऐवजी आरामाने सुख मिळविण्याची प्रवृत्ती या गोष्टीच वाढलेल्या दिसतात. हे शिक्षण कितीही उच्च समजले गेले तरी ते जीवनाच्या दृष्टीने कुचकामीच नाही का? खरे शिक्षण तेच जे उत्तम गुणांचा व उपयुक्त कलाकौशल्याचा विकास करून लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची धमक निर्माण करेल. त्याला सर्वगुणसंपन्न करेल. स्वत:ची बॅग नेण्यासाठीही कुलीच्या नावाने कंठशोष करणारा तरुण आदर्श कसा ठरेल?’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: भारताच्या नवनिर्माणासाठी ‘समयदानयज्ञ’

‘‘साधा शेतकरी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून मजेने खातो आणि आमचा विद्वान मात्र काहीही करू शकत नाही किती लाजिरवाणी गोष्ट! त्याला पोहता येत नाही, झाडावर चढता येत नाही, स्वत:चे कपडे धुता येत नाही आणि भोवताली केर साचला तरी झाडझूड करता येत नाही; अशा माणसाच्या पदव्या काय कामाच्या? परावलंबी माणसाची पदोपदी फजिती होते. जीवनात नकाशा आखून चालता येत नाही; अनेक प्रसंग ओढावतात. त्याला अनुसरून सावधपणे पावले टाकता आले पाहिजेत. मनुष्य टप्प्याटप्प्याने नव्हे, तर एकदम वर जाऊ इच्छितो पण त्यात अर्थ नसतो. व्यवहारात उतरवता येईल, असलेल्या साधनांवर पुढे जाता येईल व स्वावलंबनाने जगता येईल तेच खरे शिक्षण! स्वावलंबी मनुष्यच खरी राष्ट्रसेवा करू शकेल. स्वत:ला पोहता येत नाही तो दुसऱ्याला काय तारून नेणार? परावलंबी मनुष्य कसली राष्ट्रसेवा करणार? त्याला आदर्श नागरिक तरी म्हणता येईल काय? आमचा प्रत्येक विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने आदर्श नागरिक ठरला पाहिजे. प्रत्येक प्रचारक हा स्वावलंबनाने चमकून उठला पाहिजे.

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj views on education zws