अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण एका कुटुंबात राहतो त्या व्यवस्थेत प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. तसे चित्र आजूबाजूला दिसते देखील आणि बहुतेकांना ते मान्यही असते. मग कुटुंबांच्या विकासाचा हा मार्ग समाजात का आणू नये? इतके साधे परंतु सखोल तत्त्वज्ञान घेऊन सर्वोदय समाज उभा राहिला.

गीताई चिंतनिकेच्या विवरणात विनोबांनी ही गोष्ट मोठय़ा खुबीने सांगितली आहे. तिथे पाचव्या अध्यायात ही चर्चा येते. ज्या श्लोकांवर हे विवेचन आहे तिथे ‘साम्य’ हा शब्द नाही. गीता प्रवचनांमध्ये सारे भेद विसरा आणि उन्नत व्हा हीच शिकवण अनेक प्रकारे सांगितली आहे.

साम्ययोगाच्या मार्गावरून सर्वोदयाकडे जाताना प्रत्येकाने आपली चिंता वहावी आणि हा चिंता मिटवण्याचा मार्ग दुसऱ्यासाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यावी. याचा अर्थ कुणा एकाचा नव्हे तर सर्वाचा समग्र विकास याचे नाव सर्वोदय. सत्य आणि अहिंसेच्या आधारावर विनोबांनी सर्वोदय समाज प्रत्यक्षात आणण्याचा प्रयोग हाती घेतला. सत्य, अहिंसा आणि समन्वय या तिवईवर सर्वोदय समाज निर्माण होऊ पहात होता.

ज्या कालखंडात विनोबांनी हे कार्य हाती घेतले तो अत्यंत आव्हानात्मक होता.

विनोबांची भूमिका साम्यवाद्यांना मान्य झाली नाही, ही गोष्ट एकवेळ समजून घेता येते. हे सर्व शब्दांचे खेळ असून असा समाज केवळ स्वप्नरंजन आहे, अशी त्यांची टीका होती. समाजवादीदेखील याच प्रकारची टीका करत होते.

तथापि साने गुरुजी काही गंभीर मुद्दे घेऊन विनोबांच्या मांडणीला विरोध करत होते. सर्वोदयाची पक्षीय राजकारणाबत आणि आर्थिक प्रश्नांवर ठोस भूमिका काय असा त्यांचा मुद्दे होते.

सर्वोदय समाज पक्षीय राजकारणापासून दूर राहून काम करेल ही विनोबा आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भूमिका होती. तथापि शंकरराव देव यांच्यासारखे नेते दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर होते. सर्वोदय समाजाचे कार्य काँग्रेसमार्फत अशी त्यांची उघड भूमिका होती. साने गुरुजी हा प्रश्न घेऊन उभे राहिले. त्याहीपेक्षा काँग्रेस पक्षाचा सर्वोदय समाजावर प्रभाव राहणार अशी त्यांना रास्त शंका होती.

त्यांचा दुसरा मुद्दा आणखी महत्त्वाचा होता. स्वराज्याचे सुराज्य करा आणि तेही लवकर करा ही त्यांची मागणी होती. सर्व प्रकारची विषमता दूर करणारे उपक्रम लवकरात लवकर हाती घ्या आणि ते तडीस न्या, जमीनदारी रद्द करा, सर्व उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करा अशी त्यांची मागणी होती. असे केले नाही तर सर्वोदयाचे तत्त्वज्ञान व्यर्थ ठरेल अशी त्यांची मांडणी होती. त्यांच्या समोर विनोबांचे नाव होते. विनोबांची क्षमता आणि उभयतांचा स्नेह यातून ही अपेक्षा निर्माण झाली. विनोबा ऐकत नाही हे पाहून व्यथित होऊन गुरुजींनी त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

विनोबांनी हे प्रश्न मुळाशी जाऊन हाती घेतले. त्यांची तड लावली. पण गुरुजी हे पहायला नव्हते आणि त्यांना ठेवून घेतले असते तर बरे झाले असते असे विनोबा म्हणाले. अशा रीतीने सर्वोदय समाजाला आरंभीच एक आध्यात्मिक राजकारणी गमवावा लागला.

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyog acharya vinoba bhave role in sarvodaya samaj formation zws
First published on: 27-09-2022 at 02:51 IST