विचार क्रमांक एक – ‘दादा, आपल्याही हॉटेलमध्ये आता ‘मल्हार’ मटण आणायचे का?’ कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देताना अचानक समोर आलेल्या मॅनेजरच्या प्रश्नाने संग्रामदादा चमकलेच. क्षणभर विचार करून ते म्हणाले. ‘नाही, हलालच. ग्राहक महत्त्वाचे’ मग पुन्हा त्यांनी उत्तराच्या मसुद्यात डोके खुपसले. त्यांना अलीकडच्या घडामोडी आठवू लागल्या. साहेबांना सोडून दादांबरोबर गेल्याने सत्तेत राहण्याचे समाधान मिळाले पण आपल्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याचे काय? त्यातून सुटका हवी असेल तर प्रखर धर्मवादाची कास धरायलाच हवी, तरच आपण भाजपच्या नजरेत भरू. असेच बोलत राहिलो तर एक दिवस त्या बंगळूरुच्या सूर्यासारखे आपलेही नाव देशपातळीवर चमकेल. मग काय सारे गुन्हे क्षणात माफ! साहेबांच्या सावलीत वाढलेल्या दादांना हे कळत नाही. ते धर्म विचारून मारू शकतात तर आपण सामान खरेदी केले तर त्यात चूक काय? नगरमध्ये राठोड गेल्यापासून आक्रमक धर्मवादी चेहरा कुणी उरला नाही. ही कसर भरून काढण्यात दुहेरी फायदा आहे. दोन्ही सेना माघारतील. हे दादांच्या लक्षात कसे येत नाही?

गेल्या निवडणुकीत ‘त्या’ धर्मांधांनी दगा दिला. ऐनवेळी उजवे मदतीला धावून आले म्हणून जमले. आजकाल याच कट्टरतावादाची चलती आहे. आज भाजपवाले या पक्षांतर्गत घडामोडींशी आमचा संबंध नाही असे म्हणत असले तरी आतून सारे बेहद्द खूश आहेत. फोन करून सांगतात ‘आगे बढो.’ आपला पक्ष वेगळा असेल, पण त्यात प्राण फुंकणारा भाजपला मदत केली तर बिघडले कुठे? ते काही नाही, थातूरमातूर उत्तर देऊन नोटिशीला बेदखल करायचे. काही झाले तर आहेतच की नागपूरचे भाऊ.

विचार क्रमांक दोन – भाजपसोबत सत्तेत राहूनही धर्मनिरपेक्षपण जोपासता येऊ शकते हे आपण वर्षभरात दाखवून दिले. त्याला छिद्र पाडण्याचा उद्याोग हा संग्राम कुणाच्या सांगण्यावरून करत असेल या प्रश्नाने दादांची झोप चाळवली. आपण उजव्यांपासून फटकून वागतो, रेशीमबागेतही जात नाही. याचा राग येऊन नक्कीच परिवारातील कुणी संग्रामला फितवले असणार. त्या नितेश आणि गोपीच्या नादाला लागायची गरजच काय? आता सत्तेतला हा घरभेदी कोण याचा छडा लावायलाच हवा. हे उजवे आधी नादाला लावतात व कह्यात आला की पार गिळंकृत करून टाकतात. हे त्या नादान संग्रामला कुणीतरी समजावून सांगायला हवे. मी इकडे फुले, शाहू, आंबेडकरांचा घोष करतो व हा तिकडे धर्मवेडेपण दाखवत फिरतो. हे खपवून घ्यायचे नाही म्हणजे नाही. माझ्यासोबत आहे म्हणून किंमत आहे. एकदा का तिकडच्या कळपात गेला तर कुणी विचारणारसुद्धा नाही. भाजपची भूमिका घेतली तर गुन्हे माफ होतील हा त्या संग्रामचा भ्रम आहे. हे उजवे लई हुशार. कारवाईची तलवार नेहमी टांगती ठेवतात. आपलीही प्रकरणे अजून नस्तीबद्ध झाली कुठे? आपण शिस्तीचे भोक्ते व हा त्यालाच भगदाड पाडतो. नोटिशीचे उत्तर काहीही येईल. एकदा त्याला बसवून समजावून सांगू अन्यथा नगरच्याच एखाद्या स्थानिकाला बळ देऊन याच्या विरोधात उभे करायचे. याला अडचणीत आणणारी खूप प्रकरणे आहेत आपल्याजवळ. एक मात्र खरे. या भाजपसोबत सत्तेत राहताना डोळ्यात तेल घालून राहावे लागते. कधी कुणाचा गेम करतील याचा भरवसा नाही. त्या संग्रामला हे आतले इंगित कळत नाही. आता त्याला करड्या आवाजात दम देऊनच मोकळे व्हायचे.