एका बाजूला कुंभमेळ्यात स्नान करून मोक्षप्राप्तीसाठी गंगेकाठी येणाऱ्यांची संख्या कोटींची उड्डाणे घेत आहे. दुसरीकडे शकराचार्यांनी मांसाहाराची भलामण केली आहे. या दोन बातम्या अलीकडच्या. यातील मोक्षप्राप्तीचे मार्ग या मुद्द्यावर खूप सारे वाद आहेत. त्यामुळे धर्मरचनांमधील चौकटी घडल्या आणि बिघडल्या आहेत. मांसाहाराला न स्वीकारता ‘हिंदू’ धर्म विस्ताराचे प्रश्न शकराचार्यांसमोरही असणार. त्यामुळेच आपण सारे समाज म्हणून आहोत कसे, हेही समजून घ्यायला हवे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिजिटल युगात काळभैरव मंदिराच्या पायऱ्या चढताना देवीच्या क्षेत्रपालाच्या दर्शनाची जाणीव करून देणारे मंदिराचे दगडी बांधकाम. आत गाभाऱ्यात पुजारी अभिषेक करत होते. आधी पाण्याचा, मग दह्या-दुधाचा, मग तेलाचा. वस्त्र चढवले गेले मूर्तीच्या अंगावर. मस्तकी चंदनाचा लेप लावला. मग उडीदवड्याची एक माळ मूर्तीच्या अंगावर घालण्यात आली. महाराष्ट्रात पुजारी त्याला खोंडबळ्याची माळ असे म्हणतात. यातील खोंड आणि त्याचे बळ अशी फोड केल्यानंतर किती ताकदीची माळ गळ्यात मिरविणारी सैनिकी देवता आहे, हे लक्षात येते. आभूषणे चढविण्यात आली. धुपारती झाली आणि मग नैवेद्या आला. यात आधी दही-भात. जिलेबी, भाजी – भाकरी. तत्पूर्वी एका बाटलीतून मदिरा वाटीत काढून ती देवासमोर धरण्यात आली. पुन्हा नैवेद्या मटणाचा. मूर्तीच्या हातातील वाडग्यासारख्या पात्रात नैवेद्या ठेवण्यात आला. या पात्राला खप्पर म्हटले जाते. संध्याकाळी प्राक्षाळ पूजेनंतर पुन्हा सारी पूजा आणि शेवटी चिलीम आणि त्यात गांजा. या पूजेदरम्यान एकही मंत्र नाही. आरतीला एकही शब्द नाही. नुसतीच एक प्रकारची आरोळी किंवा हुंकार… धर्म उपभोगाची संस्कृती नाही तर मग काळभैरवाला नैवेद्या असा कसा?

आपण आपले बहुतांश देव माणूस जसा वागतो तसे विभागून ठेवले आहेत. समाजजीवनात मांसाहार न करणारी मंडळी तशी कमी. त्यामुळे आपल्याकडे नवसाला कोंबडे, बोकड याचा बळी दिला जातोच जातो. खरे तर मेंढा हे अहंकाराचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेकदा होमहवनात मेंढाच बळी म्हणून वापरला जातो. अशा नवसासाठी होणाऱ्या पशुहत्येच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेकदा आंदोलने केली. पण या वर्तनात फारसे फरक पडत नाहीत. कारण काय असावे त्याचे?

खरे तर ज्या परमेश्वराने चराचर निर्माण केले तो ईश्वर आहे त्या ठिकाणी बसून जगावर नियंत्रण करतो, अशीही आपली श्रद्धा आहे. मग तीच देवता मनुष्यरूपात येऊन अवतार का धारण करते? – जगून दाखविणे हेच खरे तर असामान्यत्व आहे. समाजजीवनात हे असामान्यत्व दिसलेच नाही तर देवपण कसे येणार, या जाणिवेतून अवतार आणि त्या भोवतीच्या श्रद्धा गुंफलेल्या. एकबाणी, एकपत्नी, एकवचनी हे प्रभू श्रीरामाचे वर्णन अवतारी पुरुष म्हणून देवानेसुद्धा जगून दाखवल्याशिवाय स्पष्ट होऊ शकते. नीती चौकटी घालून देणाऱ्या व्यक्तीला त्या आधी पाळव्या लागतात. विदेशात सुटाबुटात वावरणारे मोहनदास करमचंद गांधी तेव्हा महात्मा होतात, जेव्हा त्यांच्या अंगावर केवळ एक पंचा असतो. त्यांचे मोठेपणही विद्वत्तेपेक्षाही जगून दाखविण्यात अधिक आहे. त्याग जगून दाखविल्याशिवाय लोक लौकिकास पात्र होत नाही. कृष्णाभोवतीच्या साऱ्या कथा नव्या नैतिक चौकटीच्या मांडणीसाठी त्या काळात आवश्यक होत्या. त्या-त्या काळातील समाजरचनेतील आवश्यकतेनुसार आपले अध्यात्म हे मन:शांतीशी जोडलेले होते, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे जेवढा भूतकाळ खोल खणत जाल तेवढा उपभोग वाढताना दिसेल. काळभैरव हे त्याचे एक रूप. आपल्या इष्ट देवतांचा इतिहास मोठ्या रंजकतेने मांडताना त्यात चमत्कार असणे अपरिहार्य असते. तसे केले नाही तर त्या देवतेच्या असामान्यत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्यामुळेच प्रत्येक गावात एखादीच देवता जागृत असते. अमुक एका गावाचा मारुती जागृत असतो तर अमुक एका गावाच्या दत्ताच्या देवस्थानाचे महात्म्य जपले गेलेले असते. त्याभोवती चमत्काराची एक लड असते समाज मनात. काळोबा, भैरोबा, म्हसोबा, असे शेवटी बा असणाऱ्या देवतांची मंदिरे जराशी गावाबाहेर असण्यामागे धर्मातील विषमता होती, हे सत्य अजूनही धर्ममार्तंडांना पचेल का, असा प्रश्न आहेच. पण एकुणात आपली मन:शांती उपभोगात आहे, असे मानणारा मोठा संप्रदाय विविध धर्मात-पंथात आहे. शाक्त, कपालिकांचे हे पंथ कधी तंत्रपूजेत नाना प्रकार करतात. त्यातील काही प्रकार प्रयागराजला जाऊन आताही बघता येतील. कुंभमध्ये स्नानासाठी येणाऱ्या, अंगाला राख चोपडणाऱ्या बहुतांश साधूंना लागणारा गांजा या काळात त्या शहरांमध्ये उपलब्ध होतो. मंदिरावर कामशिल्प हाही त्याच उपभोग्य उपासना संप्रदायाचा भाग. हे सारे उपभोगाचे तत्त्वज्ञान शिवतत्त्वापर्यंत पोहोचविते असे मानणाऱ्यांच्या काळात खरे जगणे त्यागात आहे, असे मानणारा मोठा संप्रदाय आजही आहे.

सर्वसंग परित्याग करून निघालेल्या सिद्धार्थाला दु:ख निवारणाच्या कारणात प्रमुख्याने तृष्णा असते, हे तत्त्व समजल्यानंतरच बुद्ध निर्माण होतो, हे तत्त्वज्ञान माहीत असल्याशिवाय वेरुळच्या लेणींतील मूर्ती तयार झाल्या असतील? वेरुळच्या लेणींमध्ये उभे ठाकल्यानंतर छिन्नी-हातोड्यांच्या आघाताची कंपने कधी जाणवली तरच मूर्ती नसलेल्या विहारात संन्यस्त आयुष्याचे अस्तित्व मन भरून राहते. ही अनुभूती प्रत्येकाला जाणवेल असे काही नाही. त्या वास्तूशी, त्या तत्त्वज्ञानाशी तादात्म्य पावण्यासाठी त्याची गोष्ट कळावी लागते. ती सांगितलीच जात नाही, ही खरी अडचण आहे. लहानपणी ध्यान करणाऱ्या सिद्धार्थाला जर, व्याधी आणि मृत्यूसारखे प्रसंगच दिसू द्यायचे नाहीत, अशी रचना करण्यात आली होती. त्याच्यासाठी राजप्रासाद बनविण्यात आले. त्याच्या सोबत सुंदर तरुण नृत्यांगना होत्या. गीत, संगीत, नृत्य-वादन यात त्याचे मन रमावे, असे प्रयत्न झाले. पुढे सिद्धार्थाचा विवाह झाला. अनेक दिवस जी बाब दिसू नये यासाठी प्रयत्न केले ते सारे दिसले आणि विरक्तीच्या त्या प्रेरणेतून सिद्धार्थ जेव्हा राजप्रासादातून बाहेर पडत होता तेव्हा मध्यरात्री सौंदर्य पायाशी पडले होते. दिवसा अतिशय सुंदर दिसणाऱ्या बहुतांशी ललनांच्या अंगावरची वस्त्रे नीट राहिली नव्हती. झोपेेत काही जणींच्या तोंडातून लाळ गळत होती. सौंदर्य अस्ताव्यस्त पसरले होते. ते विरक्तीच्या आड येणार नाही, हे सांगणारा प्रसंग बुद्ध होण्याच्या मार्गातील एक पुढचे पाऊल होते.

वेरुळ आणि अजिंठ्याच्या लेणींमध्ये बुद्धमूर्तीचा भोवताल सुंदर उन्नत उरोज आणि कमनीय बांधा असणाऱ्या नृत्यांगनांचा का आहे, याची ही गोष्ट. प्रलंबपादासनातील बुद्धमूर्तीला किंवा डोळे मिटून बसलेल्या ध्यानस्थ मुद्रेतील बुद्धाला बाहेरचा कोलाहल जाणवत नाही आणि तो जाणवू नये अशी अवस्था म्हणजेच बुद्धत्व. ध्यानधारणा ही परंपरा अनेक धर्म- पंथांतील. हिंदू- जैन परंपरेतही हे सारे जशास तसे. नाथ संप्रदायात ते होतेच. अशी ध्यानधारणा करायची कशासाठी, तर दु:ख निवारण्यासाठी. म्हणजे काय तर सुखासाठी. पण धर्मातील साऱ्या सुखाच्या व्याख्या पारलौकिक. सध्याचे जीवनातील आनंद परिपूर्ण नाहीत. मृत्यूनंतर खरा आनंद. कारण तिथे मन:शांती आहे, असे सांगणारे तत्त्वज्ञान बहुतांश धर्मांत असते. त्याला छेद देणारा अजित केसकम्बली यांनी मांडलेला उच्छेदवाद किंवा चर्वाकाचे तत्त्वज्ञानही आपण जपतच असतो. कारण योग किंवा भोग यापैकी एका आणि एकाच मार्गावर चालणे सर्वसामान्य व्यक्तीला शक्य नसते. त्याला हे सारे एकाच आयुष्यात करून पाहायचे असते. काय केल्याने आनंद मिळतो, या प्रश्नाच्या उत्तरात निघालेले समूहमन आता गंगेच्या पाण्यात पवित्र स्नान करून मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करू लागले आहे. लाखो लोक एकाच दिवशी नदीमध्ये स्नान करतात तेव्हा गंगा नदी किती पापांचा प्रवाह आपल्या अंगाखांद्यावर खेळवत असेल, ते तिलाच माहीत. पण जलक्षेत्रात काम करणारी मंडळी म्हणतात, धर्माच्या नावाने पाण्याच्या प्रदूषणाचा विचार करायचा नसेल, तर ही कृतीही उपभोगवादीच. अगदी काळभैरवाला नैवेद्या म्हणून चिलीम देण्याच्या कृतीसारखीच म्हणावी लागेल. वृत्ती आणि वर्तन याला नैतिक चौकटी देताना कधी या टोकावर किंवा त्या टोकावर राहून जगता येत नाही, हे खरे, पण योग आणि भोगातील कोणत्या बाबी स्वीकारायच्या वा नाकारायच्या हे कळायला हवे. अन्यथा नुसते शाही स्नानात गंगेत डुबकी मारून मोक्ष मिळत नसतो. आपण कोठून आलो आणि कोठे जाणार या कमालीच्या उत्सुकतेपोटी आपली पुण्याची चौकट वर्तमानात कशी ठेवायची याचा विचार करण्याऐवजी कधी योग तर कधी भोग अशी नवी रचना आपण स्वीकारली आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankaracharya abhinav shankar bharti statement that meat consumption is permitted in religious rituals amy