स्लोअर शहाणेला बाकी आळस आणि कंटाळा आवडत असला, तरी तो वरवरचा, शारीरिक. स्लोअरने वैचारिक कंटाळा कधी केला नाही. नाही नाही, वैचारिक म्हणजे विचारवंत करतात तसा रूढार्थानं ‘वैचारिक’ नाही. न थकता सतत कशावर तरी विचार करत बसणं, अशा अर्थानं ‘वैचारिक’ कंटाळा त्यानं कधी केला नाही. सभोवतालाबद्दल मनात विचार आणणं, त्याला वेगवेगळे कंगोरे जोडून बघणं, त्यातून उमटणारे अर्थांचे मजले एकेक करत बांधून विचार इमारती उभारणं, एकेक मजला बांधत कितीही मजल्यांपर्यंत वरपर्यंत जाणं आणि मग अशा उंच इमारतीच्या गच्चीवरून मूळ केलेल्या विचाराकडे, खाली तळमजल्याकडे येताना मधल्या कल्पनांच्या जिन्यांवर लपाछपी खेळणं हा त्याचा आवडता उद्योग होता.

या खेळात त्याला जो साथीदार लागे, तो त्याचा खास मित्र होता. अन्य कुणी तरी स्वतंत्र व्यक्ती किंवा माणूस नाही बरं का. पण, तरी मित्रच. अन्य कुठला तरी स्वतंत्र जीव निवडायचा, त्याला जीवलग वगैरे मानायचं आणि मग त्याच्यावर प्रेम करत बसायचं, हे स्लोअर शहाणेनं केलं नव्हतं असं नाही. पण, त्या खेळात तो कधीच पुरता रमला नाही, हे मात्र खरं. त्यापेक्षा या विचार खेळातला मित्र त्याचा अगदी जवळचा. जिवलग नाही, तर अगदी जिवातला, आतलाच म्हणा ना. कोण होता तो? म्हणजे आतला आवाज वगैरे म्हणतात तो होता का? का ती स्व-जाणीव होती? की नेणिवेतलं काही तरी होतं? या अशा प्रश्नांचा शोध घ्यायचे ‘कष्ट’ स्लोअरनं घेतले नाहीत असं नाही. पण, त्याला त्याचं त्याच्या अर्थानं ‘वैचारिक’ उत्तर कधी सापडलंच नाही. ते तसं सापडणार नव्हतंच, कारण हा मित्र यातलं काहीच नव्हता. स्लोअरला ही जाणीव झाली, तेव्हा त्यानं मित्राचं नामकरण केलं सोलीलुक्वी (soliloquy)! एकट्याचं एकट्यासाठीचं एकट्यानंच एकलगत!

तर, वैचारिक इमारतीच्या दोन विचार मजल्यांना जोडणाऱ्या कल्पनांच्या जिन्यांवर सोलीलुक्वीबरोबर लपाछपी खेळताना स्लोअरला भारी मौज वाटे. यादरम्यान त्यांच्यात होणारा वाद, संवाद, गप्पा असं सगळं अनेकदा स्लोअरच्या रोजदिनीत उमटत असे. स्लोअर आणि सोलीलुक्वीमध्ये जे बोलणं होत असे, त्याला ‘बरळणे’ या क्रियापदातल्या उपहासाची धार कुणी लावू शकत नसे, कारण ते अस्फुट असे. ते फार तर अॅब्सर्डिटीतल्या असंगततेशी मेळ साधणारं होतं, असं म्हणता आलं असतं. पण, गोदो आणि सोलीलुक्वी ही दोन वेगळी पात्रं आहेत, याचा ‘विचार’ स्लोअरनं आधीच करून ठेवलेला असल्यानं ‘या’ बोलण्याला ‘त्या’चं परिमाण साधणं अशक्य होतं.

या बोलण्यात स्लोअरच्या ‘सामान्य’ आयुष्यातल्या ‘सामान्य’च गोष्टींची ‘वैचारिक’ चर्चा व्हायची. मला जिज्ञासा का वाटते? मला असूया का वाटते? मला आकर्षण का वाटते? मला स्वप्नात रमावेसे का वाटते? मला काहीच करावेसे वाटत नाही, असे कधीकधी का वाटते? मला कधीकधी खूप काही करावेसे का वाटते? मी स्खलनशील आहे, असे का वाटते? मी नितांत प्रेमळ आहे, असे का वाटते? मी निष्ठुर कोरडा आहे, असे का वाटते? मी धूर्त, दुष्ट आहे, असे का वाटते? मी आहे, तरीही नाही आहे असे का वाटते?…

आयुष्यातल्या रोजच्या प्रसंगांत हे आणि असे पडणारे अनेक प्रश्न स्लोअर सोलीलुक्वीला विचारत असे. तरीही, ते विचारून झाल्यावरही हे आवश्यक आहे का? असतं का? असेल, तर इतरांना तसं ते का वाटत नाही? का इतरांना वाटत नाही आणि तरी आपल्याला वाटतं, म्हणजे आपणच त्याचं अवडंबर वगैरे माजवतोय का? का इतक्या क्षुल्लक गोष्टी ‘विचार’ करण्यासारख्या नसतात याचीच उमज आपल्याला नाही?… हे आणि असे प्रश्नही नंतर स्लोअरला छळत. मग प्रत्येक संवादात प्रश्नांचं हे परिशिष्ट तो एकदा तरी सोलीलुक्वीला फेकून मारी. पण, त्यावर सोलीलुक्वीची उत्तरं ऐकून स्लोअर शहाणे पुन्हा ‘विचार’ करायला लागे आणि त्याच्या मनात ‘वैचारिक’ इमारतींचे पीक येत राही!

मघाशी म्हटल्याप्रमाणे स्लोअर शहाणेच्या रोजदिनीत हे सगळं उमटत असे. हा संवाद नेमका कोणत्या दिशेनं जाई किंवा कोणत्याच दिशेनं जात नसे, हे उमगणं काही महत्त्वाचं नाही, पण स्लोअर शहाणेच्या गोष्टीला या संवादाशिवाय पूर्णत्व येणं अवघड म्हणून त्याचे काही मासले देणं औचित्याचं. सर्वांत आधी ही चर्चा का करायची वगैरेपासून नेहमी होणारा संवाद असा असे…

स्लोअर : का करायचा विचार आणि त्यावर ही असली चर्चा?

सोलीलुक्वी : कारण तुला प्रश्न पडतात.

स्लोअर : का पडतात प्रश्न मला?

सोलीलुक्वी : कारण तुला उत्तरं हवी असतात.

स्लोअर : का हवी असतात मला उत्तरं?

सोलीलुक्वी : कारण, प्रत्येकच सामान्य माणसाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात.

स्लोअर : पण इतक्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करावाच कशासाठी?

सोलीलुक्वी : कारण त्याशिवाय प्रश्नच पडणार नाहीत…

प्रश्न पडणार नाहीत, असं म्हटल्यावर स्लोअर काही काळ बोलतच नसे. कारण, ते पडले नाहीत, तर त्याची वैचारिक इमारत उभी राहणार नाही, हे त्याला समजत असे. यापुढे मग जगण्यातल्याच एखाद्या प्रसंगावर किंवा पेचावर दोघं बोलत आणि त्या संवादाला कधीच तार्किक पूर्णविराम न मिळताही चर्चा केल्याचं समाधान मिळतं आहे, यावर दोघं दमून बोलणं थांबवत असत.

एकदा मात्र स्लोअर इरेलाच पेटला आणि दमल्यानंतरही त्यानं सोलीलुक्वीला प्रश्न फेकून मारले. त्या वेळी झालेला संवाद स्लोअरनं रोजदिनीत अक्षरश: खरडून काढला, कारण तो लिहिताना पेनातली शाईही उमटायला आढेवेढे घेत राहिली. तर, तो संवाद असा…

स्लोअर : प्रश्न फार क्लेशकारक असतात, अत्यंत वेदनादायी. तरी, ते का पडतात?

सोलीलुक्वी : कारण, ते सच्चे असतात आणि क्रिएटिव्हही!

स्लोअर : ते आपला पराभव असतात आणि प्रसंगी अतार्किकही!

सोलीलुक्वी : पण, अतार्किक गोष्टच अधिक क्रिएटिव्ह असते.

स्लोअर : म्हणूनच तिला ‘फिक्शन’ म्हणतात आणि ती वस्तुस्थिती नसते.

सोलीलुक्वी : आहेस तू गोष्टीवेल्हाळ, मग?

स्लोअर : आता तूच मला प्रश्न विचारतोयस, मी तुला प्रश्न विचारून उत्तरापर्यंत जाऊ पाहत असूनही.

सोलीलुक्वी : कारण तेच आत्ताच्या क्षणी क्रिएटिव्ह आहे, आपल्या संवादात अतार्किक असूनही

स्लोअर : तू तुझी भूमिका सोडतो आहेस.

सोलीलुक्वी : मी फक्त तुला वेगळी भूमिका घेता येते आहे का पडताळून पाहतो आहे.

स्लोअर : का?

सोलीलुक्वी : गम्मत!

स्लोअर : ती तर प्रश्नांनी यायला हवी.

सोलीलुक्वी : कधी उत्तरांतून करून पाहता यायला हवी.

स्लोअर : मग प्रश्नांचं काय होईल?

सोलीलुक्वी : त्याचं उत्तर शोधूच ना कधी तरी…
siddharth.kelkar@expressindia.com