बृहन्महाराष्ट्राने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनात विसाव्या शतकात मोलाची भर घातल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर बडोदा संस्थानच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेली मराठी संमेलन आयोजने, मराठी ग्रंथालय विकास, मराठी ग्रंथ प्रकाशन कार्य डोळ्यांत भरण्यासारखे आहे. त्यातही तेथील मराठी वाङ्मय परिषद जी साहित्य संमेलने योजत असे, त्यात साहित्य प्रकारानुसार चर्चा होत नि प्रत्येक साहित्य प्रकार संमेलनाचे स्वतंत्र शाखा अध्यक्ष असत. (मूळ मुख्य संमेलन अध्यक्षाशिवाय!) १९३४च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अशा मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर) अशी तब्बल नऊ शाखा संमेलने न्यू ईरा हायस्कूल, बडोदे येथे झाल्याची नोंद आढळते. ‘एकत्र कुटुंब पद्धतीचे एवढे मोठे प्रात्यक्षिक साहित्य संमेलनाच्या प्रांगणात यापूर्वी कधी दिसले नव्हते व पुढे कधी दिसणार नाही,’ अशी आठवण वि. स. खांडेकरांनी आपल्या ‘अभिषेक’ (१९६४) या भाषण संग्रहात करून ठेवली आहे, तर जया दडकर यांनी आपल्या ‘वि. स. खांडेकर : सचित्र चरित्रपट’ (२००१)मध्ये या नऊ साहित्य शाखा प्रकार व त्यांचे अध्यक्ष नोंदले आहेत- वर्तमान, अ.भा. मराठी साहित्य संमेलने अशा व्यापक व बहुअंगी साहित्य विचाराचा प्रदेश आक्रसत ती राज्याश्रयी व उत्सवी झाली आहेत. त्यांचा लंबक लोकप्रबोधनाकडून लोकरंजनाकडे झुकत असल्याचे लक्षात येते, तेव्हा तर्कतीर्थांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे.

मराठी वाङ्मय परिषद, बडोदेच्या १९ नोहेंबर, १९५३ रोजी संपन्न मुख्य संमेलनाचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कलात्मक वाङ्मयाचे श्रेष्ठत्व अधोरेखित करीत म्हटले होते की, ‘‘वास्तव आणि सत्य हेच कलेचे अंतिम लक्ष्य असल्यामुळे शास्त्र आणि काव्य हे दोन्ही वाङ्मय प्रकार कलात्मकच मानले पाहिजेत. वास्तवाला आणि सत्याला आत्मवश करणे हीच कला होय. विश्वशक्तीला आत्मवश करणे, हेच कलेचे साफल्य आहे. माणसाचे असामर्थ्य आणि क्लैब्य (भय) हरण करणे, त्याची दृष्टी विश्वाच्या परिघाला वळसा घालील इतकी क्रांतदर्शी करणे, हेच कलेचे स्वरूप आहे.

शास्त्र आणि काव्य यांची जे फारकत करतात, ते वाङ्मयातील सत्याचा, विवेकाचा, प्रकाशच नष्ट करीत असतात, हे त्यांस कळत नाही. वास्तवानुसारी व ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पोसलेला समग्र अनुभव जर साहित्याचे सार नसेल, तर आंधळ्या भावनांचा आणि उन्मत्त वासनांचा तो नाच होय, असेच म्हणावे लागेल. असे वाङ्मय मानवाला दीर्घ अंधतमात नेऊन सोडेल. याकरिता साहित्य समीक्षक व टीकाकार यांनी आपली एकांगी टीकाशास्त्रे व मागासलेली साहित्यशास्त्रे सुधारून घ्यावीत. कमी पल्ल्याची तोटकी हत्यारे पराभवाची साधने बनतात, तशी ही साहित्यशास्त्रे व टीकाशास्त्रे बनत आहेत.

जीवनास वाङ्मयातून सत्यानुसारी शुभ प्रेरणा प्रकट व्हावयास पाहिजे व अशा प्रेरणेतूनच वाङ्मय निर्माण व्हावयास पाहिजे. वाङ्मयाने मनुष्याची मानसिक व भौतिक सामर्थ्ये वाढली तरच ते वाङ्मय सरस्वतीचे खरे रूप होय, असे म्हणता येईल. नियतीच्या बंधनांतून आणि जीवनातील पारतंत्र्यातून मनुष्याला मुक्त करणारे वाङ्मयच सरस्वतीचे वास्तव रूप होय, असे म्हणता येईल. वाङ्मयाच्या श्रेष्ठतेचा अंतिम निकष नैतिक आहे. त्याकरिता राजशेखराने म्हटले आहे, ‘वाङ्मयं द्विविधं, शास्त्रं काव्यं च’ हा सिद्धांत साहित्य परिषदांनी आणि संमेलनांनी उपेक्षिला, तर त्यांच्या साहित्याची काळ उपेक्षा केल्याशिवाय राहणार नाही. कालावर स्वार होणारे वाङ्मय हे माणसाला त्रिभुवनावर विजय मिळविणारा वीर बनविते. तुकारामांनी म्हटले आहे की, ‘‘आम्ही विठ्ठलाचे गाढे वीर। कळिकाळासी दरारा॥’’ विठ्ठल हा चैतन्यघन आहे.

वरील सर्व विवेचनातून लक्षात येणारी गोष्ट अशी की, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात साहित्य म्हणजे शास्त्र (विज्ञान) संगीत, तत्त्वज्ञान, प्रकाशन, नाट्य, कथा, काव्य, इतिहास, समाजशास्त्र असा साकल्याचा प्रदेश होता, तो आज आक्रसला आहे खरा! म्हणूनच भाषण वाङ्मयाचे सत्य स्वरूप विशद करणारे असल्याने गांभीर्याने घ्यावे लागते. त्यामुळेच तर्कतीर्थांची भाषणे ही मराठी सारस्वतात नित्य नवे वैचारिक योगदान देणारी ठरतात.

– डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com