सत्याग्रहांसाठी आपल्या जीवनाचा आत्मयज्ञ करणारा सेनापती म्हणजे पांडुरंग महादेव बापट. सेनापती बापटांचे मूळ पूर्ण नाव विचारले, तर अख्खा महाराष्ट्र नापास होण्याची शक्यता अधिक! आपल्या कार्याने लोकांनी उत्स्फूर्त दिलेली उपाधी हीच ज्यांची खरी ओळख झाली, त्या सेनापती बापटांबद्दल तर्कतीर्थांच्या मनात आदर असण्याचे मूळ कारण उभयतांचा क्रांती ते सत्याग्रह, हिंसा ते अहिंसा, शस्त्र ते शांतीचा प्रवास होय. तर्कतीर्थांनी सेनापतींवर जन्मशताब्दीप्रीत्यर्थ गौरव लेख लिहिला आहे. तर्कतीर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांनी ‘सेनापती बापट समग्र वाङ्मय’ (खंड – १ ते ४) प्रकाशित करण्याची योजना करून सेनापतींचे समग्र वाङ्मय वर्तमान वाचकांसाठी जतन करून ठेवले. त्या समग्र वाङ्मयाच्या दुसऱ्या खंडास तर्कतीर्थांची प्रस्तावना लाभली आहे. सेनापती बापट यांनी सामुदायिक आत्महत्येचे केलेले आवाहन लक्षात घेऊन तर्कतीर्थांनी साप्ताहिक ‘चित्रा’च्या जून, १९२९ च्या अंकात लिहिलेला लेख सेनापतींच्या आवाहनास प्रतिसाद व प्रोत्साहन देणारा आहे.
तर्कतीर्थांनी सेनापती बापट यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ पाक्षिकाच्या १ व १६ मार्च, १९८१ च्या अंकात लिहिलेल्या गौरव लेखात सेनापतींचे वर्णन ‘भारतीय आदर्शांचा नवा अवतार’ असे केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र आंदोलनापासून ते विश्वातील युद्धसंस्था समाप्त होण्याकरिता नि:शस्त्र, अहिंसक सामुदायिक आत्मयज्ञापर्यंत आंदोलन विचारात घेणारा भारतीय अध्यात्मवादी म्हणजे सेनापती बापट.’’ त्यांच्या जीवन व साहित्यात आपणास नव्या संस्कारांचे दर्शन घडते. या लेखात तर्कतीर्थांनी सेनापतींच्या समग्र जीवनाचा आढावा घेतला आहे. २८ जून, १९३१ मध्ये सेनापतींची महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, तेव्हा तर्कतीर्थ तिथे उपस्थित होते. क्रांतिकारी व सत्याग्रही दोन्ही विचारधारांच्या काँग्रेस सदस्यांनी सेनापती बापट यांना मतदान केल्यामुळे ते निवडून आल्याची नोंद तर्कतीर्थांनी केली आहे. या निवडीमुळे गांधीवादी गटात असंतोष पसरला होता, हे सांगण्यास तर्कतीर्थ विसरत नाहीत.
विदेशात जाऊन एकेकाळी बॉम्ब बनविण्याची विद्या शिकून आलेले सेनापती नंतरच्या काळात मुळशी खोऱ्यात धरणामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विस्थापनेचे नेतृत्व व सत्याग्रह करणारे जगातले पहिले संघटक, सेनापती होते. हा विचारविकास ‘‘स्वकीय-परकीय, हिंदू-मुसलमान, स्पृश्य-अस्पृश्य, स्वधर्मीय-परधर्मीय अशा तऱ्हेचे भेद न मानता मनुष्यमात्रांची एकात्मता हेच तत्त्व अंतिम सत्य होय. किंबहुना विश्व हेच परमेश्वराचे व्यक्त रूप असल्यामुळे कसलाही भेदभाव मनात येणे, हे आध्यात्मिक उन्नतीला हानिकारक आहे.’’ इथेपर्यंत येऊन ‘भारतीय प्राणयज्ञ दल’ उभारण्यापर्यंत मजल मारतो. या विचारसरणीच्या मुळाशी ‘भारतीय ब्रह्मवाद’ असल्याचे तर्कतीर्थांनी म्हटले आहे.
सेनापती बापट आणि महात्मा गांधी उभयता सत्याग्रही. सेनापती ‘शुद्ध सत्याग्रही’, तर महात्मा गांधी ‘साम सत्याग्रही’ होते, असे सामुदायिक आत्महत्येच्या संदर्भातील साप्ताहिक ‘चित्रा’च्या लेखात स्पष्ट करीत ते म्हणतात की, ‘‘साम सत्याग्रही म्हणजे अन्यायी शत्रूंच्या देहास पालट (परिवर्तन) घडवून आणण्याचा प्रयत्न, तर शुद्ध सत्याग्रही म्हणजे शत्रूला सगळ्या उपायांनी वठणीवर आणणे.’’ सत्याग्रही तत्त्वज्ञान व कृतिकार्यक्रम समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा लेख मार्गदर्शक ठरतो.
‘सेनापती बापट वाङ्मय समग्र ग्रंथ’ (खंड- २)ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विवेचक प्रस्तावना आहे. १ नोव्हेंबर, १९७७ मध्ये लिहिलेल्या प्रस्तावनेत सेनापती बापट यांच्या आत्मचरित्रास तर्कतीर्थांनी ‘चित्तशुद्धीचे प्रमाणपत्र’ बहाल केले आहे. सेनापती बापट यांनी आपले जीवन विविध सत्याग्रह आणि आंदोलनांचे नेतृत्व करण्यात खर्ची घातले. त्यात मुळशी सत्याग्रह, हैद्राबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, आत्मयज्ञ (सामुदायिक आत्महत्या), प्राणयज्ञ, जलसमाधी, थलसमाधी, हिंदू-मुसलमान ऐक्य, झाडू-प्रशस्ती (स्वच्छता आंदोलन) इत्यादींचा अंतर्भाव होतो. हे सर्व पाहता सेनापती बापट हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील असे एकमेव आत्मयज्ञी सत्याग्रही होते की, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर ते महात्मा गांधी असा शस्त्र ते शांतीचा प्रवास करत स्वत:ची वेगळी सत्याग्रही प्रतिमा कोरली होती.
drsklawate@gmail.com