पत्रकाराला शोभणारा उत्साह वयाच्या नव्वदीतही लिहिते राहून टिकवणारे, इंग्रजीखेरीज मल्याळम भाषेतही भरपूर पुस्तके लिहिणारे टी. जे. एस. जॉर्ज ३ ऑक्टोबर रोजी निवर्तले. त्यांच्या ‘टी. जे. एस.’ या केरळी नावाचे दीर्घरूप ‘थायिल जेकब सोनी’ असे होते म्हणताच कुणाला आजचे कवी-कादंबरीकार जीत थायिल आठवतील, ते जॉर्ज यांचे चिरंजीव. कन्या शीबा थायिल याही पत्रकार, पत्नी अम्मू जॉर्ज शिक्षणतज्ज्ञ. अशा बुद्धिजीवी कुटुंबात निव्वळ नातवंडांमध्ये न रमता जॉर्ज अगदी अलीकडेपर्यंत ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’चे सल्लागार संपादक होते. ‘एशियावीक’ या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक ही त्यांची विशेष ओळख. त्याआधी सिंगापूरमध्ये ‘फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू’चे संपादक, ‘इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट’मध्ये संकलन-संपादनाचे काम, ‘द सर्चलाइट’ या दैनिकाचे संपादक अशा त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात मुंबईत, ‘फ्री प्रेस जर्नल’मधून झाली होती. ‘पद्माभूषण’ या किताबाने त्यांना २०११ मध्ये गौरवण्यात आले.

जॉर्ज यांच्या ‘पद्मा’ पुरस्काराचे साल पाहून, किंवा एकूणच ‘नेहरूयुगा’त बहरलेली त्यांची कारकीर्द लक्षात घेता ज्या कुणाला ते ‘काँग्रेसवाले’ वगैरे वाटतील, त्यांच्यासाठी अर्थातच ‘पत्रकाराला पक्ष नसतो’ एवढाच खुलासा पुरणार नाही… पण कदाचित जॉर्ज हे १९६५ मध्ये तीन आठवडे कोठडीत होते, हा किस्सा त्यांच्या निष्पक्षपातीपणाची, निडरपणाची खूण पटवणारा ठरेल. ही अटक झाली पाटण्यात. बिर्ला समूहानेच ‘हिंदुस्तान टाइम्स’ खेरीज ‘द सर्चलाइट’ हे दुसरे इंग्रजी दैनिक बिहारमधून सुरू केले, त्याचे पहिले संपादक म्हणून वयाच्या तिशीतल्या जॉर्ज यांना नेमले आणि (हिंदुस्तान टाइम्सच्या बी. जी. व्हर्गीस यांच्यासारख्या संपादकांशी जरी के. के. बिर्लांचे मतभेद झाले होते तरी), पाटण्यातील या नव्या दैनिकाच्या तरुण संपादकाला ‘पूर्ण स्वातंत्र्य’ दिले. कोणत्याही नव्या संपादकाने नेमणुकीनंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांची ‘सदिच्छा भेट’ घेण्याचा तत्कालीन शिरस्ता जॉर्ज यांनी पाळला नाहीच, पण बिहारमधल्या १९६५ च्या (राममनोहर लोहियाप्रणीत) जनआंदोलनाच्या बातम्या निव्वळ ‘अधिकृत’ म्हणजे पोलीस व प्रशासनानेच – दिलेल्या माहितीपुरत्या न ठेवता आंदोलकांचीही बाजू ‘द सर्चलाइट’मधून मांडली गेली. या कारणाने, भारतीय दंडसंहितेच्या ‘कलम १२४ अ’खाली त्यांना अटक झाली.

त्यामुळे, स्वतंत्र भारतात ‘सेडिशन’ अर्थात राजद्रोहाच्या आरोपाखाली ‘आत टाकले गेलेले’ जॉर्ज हे पहिले संपादक ठरले! त्यांच्या अटकेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटलेच, पण तीन आठवड्यांच्या काळात पाटण्याच्या बांकीपूर तुरुंगातून त्यांची रवानगी हजारीबाग तुरुंगात झाल्याने, तेथे आधीच डांबले गेलेल्या राममनोहर लोहियांशी भरपूर बातचीत होत राहिली. जामिनावर जॉर्ज सुटले तेव्हा, तुरुंगापासून ‘सर्चलाइट’ कार्यालयापर्यंत त्यांची मिरवणूकच काढण्यात आली.

जे सांगितले जाते, त्याच्या पलीकडचे पत्रकाराने पाहिले पाहिजे, हा वस्तुपाठ केवळ या किश्शातून नव्हे तर त्यांच्या लिखाणातूनही मिळतो. जॉर्ज यांचे बरेच लिखाण चरित्रपर, व्यक्तिचित्रणपर असले तरीसुद्धा ते व्यक्तिस्तोमाकडे जात नाही. व्यक्तीचा खऱ्या अर्थाने ‘वेध’ घेते. उदाहरणार्थ लोहियांबद्दल लिहिताना, ‘समाजवादासाठी जीवन वाहणाऱ्या या नेत्याचे वडील त्या काळच्या कलकत्त्यातील ३५ हजार रिक्षांचे मालक होते’ हेही जॉर्ज नाकारत नाहीत! त्यांच्या लिखाणातून पुढील पिढ्यांनी प्रेरणा घेणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.