खरे तर ‘नौकर की कमीज’, ‘दीवार में एक खिडकी रहती थी..’ यांसारख्या अद्वितीय कलाकृतींची निर्मिती करण्याचे आणि भवतालाची स्पंदने आपल्या कवितेत अनोख्या शब्दकळेने टिपून घेता येण्याचे अंगभूत सामथ्र्य असणे यापेक्षा दुसरा मोठा पुरस्कार असू शकत नाही. त्यांच्या या एका पुरस्कारामागे साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार त्यांच्या मागे चालत आले आहेत. तसाच २०२३ चा अमेरिकेतील पेन नाकाबोव्ह पुरस्कार. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल विनोद शुक्ल यांना अमेरिकेत हा पुरस्कार दिला जाणार असून ते समकालीन हिंदी साहित्यातील महान साहित्यिकांपैकी आहेत, असे संबंधित संस्थेने त्यांच्याबद्दल म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांची ही ओळख जितक्या औपचारिक शब्दांत आहे, त्याच्या बरोबर विरोधाभासी त्यांचे साहित्य आहे. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ या त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या छोटेखानी कादंबरीतून त्यांच्या मांडणीमधल्या जादूई वास्तववादाचा अर्थात मॅजिकल रिअॅलिझमचा जो अनुभव येतो, तो शब्दातीत आहे. नवीन लग्न झालेले ते जोडपे, त्यांचे न बोलले गेलेले पण एकमेकांना ऐकू येणारे मनीचे बोल, जादूई खिडकीच्या पलीकडची बुढी माँ, महाविद्यालयात जायला उशीर होतो म्हणून नायकाला रोज न्यायला आणि सोडायला येणारा हत्तीवाला साधू आणि त्याचा हत्ती.. या सगळय़ामधून लेखक एक असे काही रसायन उभे करतो की ‘दीवार में..’ वाचणे हा एक अनुभव ठरतो. आनंदाच्या, सुखाच्या व्याख्या इतक्या अकृत्रिम, तरल आणि तरीही सहजसोप्या असू शकतात, याचा प्रत्यय लेखक या नात्याने विनोद शुक्ल देतात. या कादंबरीचा जवळपास सगळय़ा भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर तर प्रसिद्ध दिग्दर्शक मणि कौल यांनी चित्रपट निर्मितीही केली आहे. या कादंबरीत सरकारी नोकर असलेले संतू बाबू आणि त्यांची पत्नी यांच्या माध्यमातून एकाच वेळी समकालीन गृहस्थी जीवन आणि सरकारी व्यवस्था यांचे सूक्ष्म चित्रण संवेदनशीलतेने येते. ‘एक चुप्पी जगह’, ‘खिलेगा तो देखेंगे’ अशा कादंबऱ्या, ‘पेड पर कमरा’, ‘घोडा और अन्य कहानिया’सारखे कथासंग्रह, ‘लगभग जयहिंदू’ या पहिल्या कवितासंग्रहापासून ‘प्रतिनिधी कविताएँ’पर्यंतचे कवितासंग्रह या सगळय़ा त्यांच्या विपुल साहित्यामधून दिसणारे जग अद्भुत आहे. आपल्याही आसपास ते असते, आपणही त्याच जगात वावरत असतो, पण त्याच्या सूक्ष्म छटा विनोद शुक्ल लीलया उलगडून दाखवतात आणि मग वाचणाराही त्यात हरवून जातो. जगण्यातील शुद्धतेचा आग्रह आणि जादूई वास्तववाद यांची सांगड तर तेच घालू जाणे. त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, संवेदनशीलता, त्यांनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा, त्यातून मध्यमवर्गीय जगण्याची नस अचूक पकडण्याची त्यांची हातोटी, आणि मुख्य म्हणजे त्यांची भाषा या सगळय़ाने हिंदी साहित्याला एका वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod shukla inherent ability to capture the ambient vibes of artworks in your poetry with unique diction amy