ईश्वरविषयक श्रद्धेविषयी आजचा सुशिक्षित गोंधळलेल्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येते. विज्ञान व बुद्धिप्रामाण्यवाद यांच्या प्रभावामुळे आजचा सुशिक्षित प्रगल्भ होणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्ष परिस्थिती विपरीत दिसून येते. ‘किर्लोस्कर’ मासिकाने आपल्या १९५६ च्या दिवाळी अंकात याबद्दल परिसंवाद योजला होता. यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशिवाय डॉ. र. पु. परांजपे, मुंबईचे तत्कालीन बिशप लॅश, य. गो. नित्सुरे यांनी आपले विचार मांडले होते. त्यातील तर्कतीर्थ विचार आजही सात दशके उलटली तरी प्रस्तुत ठरतात, हे आपल्या वैचारिक विकासाचे अपयश मानून अंतर्मुख करते. तर्कतीर्थ यात म्हणतात की, महाराष्ट्रीय सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार-विचार कमी पाळतो. त्याच्या मनातील ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही. त्यांचे मन देववादी व दैववादी आहे. त्याच्यात देवावरील भावना उत्कट रूपाने प्रकट होतात. देवादिकांची चरित्रे याबद्दल त्याला ओढा आहे. त्याच्यात कर्मकांडाबद्दल जी अनास्था आहे, ती काही अंशी बुद्धिवादी आहे. कर्मकांडाने पुण्य मिळते, याबद्दलचा त्याचा विश्वास ढळला असला तरी नष्ट झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर्कतीर्थ म्हणतात, नास्तिकता आणि बुद्धिवादीपणा शिक्षणाचे फळ आहे. म्हणून शिक्षितांना त्याबद्दल अभिमानाने बोलावेसे वाटते; पण ‘मी नास्तिक आहे’, असे रोखठोक प्रतिपादन करणे अपवाद. बुद्धिवादाने ईश्वर सिद्ध होत नाही, यामुळे अज्ञेयवाद आणि अनिश्वरवाद (जडवाद) असे विचारप्रवाह तयार होतात. अनिश्वरवादी व पाखंडी सुशिक्षितात अल्प असतात. याचे कारण बालपणापासून होणारे परंपरेचे संस्कार होत. त्यामुळे सुशिक्षितात भावनात्मक श्रद्धा खोल रुजलेल्या असतात. बुद्धीने सिद्ध होते तेच खरे, अशी विवेकवादी वृत्ती अजून, आपल्या देशात परंपरा म्हणून विकसित झालेली नाही. त्यामुळे बुद्धीने सिद्ध होईल तेच खरे मानण्याचा संस्कार पालक आपल्या पाल्यावर करीत नाहीत. पाश्चात्त्य देशांतील बुद्धिवादाची नवी परंपरा आपल्या सुशिक्षितांत दृढमूल झालेली नाही, ‘ईश्वर आहे का नाही?’, असा प्रश्न ते पाल्यात निर्माण करीत नाहीत. आपल्या शिक्षण पद्धतीचे स्वरूप माहिती देणारे आहे. संशोधन करणे, साधकबाधक विचार करणे, तशी शक्ती, वृत्ती निर्माण, हे आपल्या शिक्षण पद्धतीचे ध्येय नाही. तसे तंत्रही त्यात नाही. त्यामुळे ईश्वरच काय परंतु जीवनाशी निगडित ऐहिक व्यवहाराला बळकटी देणारे विषय बुद्धीच्या निकषावर तावूनसुलाखून तपासण्याची शक्ती सुशिक्षितांत उत्पन्न होत नाही. बौद्धिक सकसपणा निर्माण करणे आपल्या शिक्षण पद्धतीचे ध्येय नाही. नास्तिक वाद हा शिक्षणाचा विषय होऊ शकतो; पण तेवढ्याने विद्यार्थ्यांत बुद्धिवादाची शक्ती येईल असे नाही. बुद्धिवाद ही ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांना आणि विषयांना व्यापणारी तार्किक विचार पद्धती आहे. म्हणून खरे तर ती मूलभूत शिक्षण पद्धती आहे. अशा मूलभूत शिक्षण पद्धतीचा प्रवेश भारतीय शिक्षणात व्हायला हवा.

चांगले व वाईट असे प्रसंग मी माझ्या जीवनात अनुभवत आलो आहे. त्यांचा संबंध देवाशी जोडण्याची भावना माझ्या मनात स्वाभाविक रीतीने उत्पन्न होते. देव आणि दैव यांच्या योगायोगसंबंधी त्याचा अन्वय न लावता कार्यकारणभावाने असे प्रसंग घडतात, ते बुद्धिवादाने शोधून निश्चित करता येतात. आज आपणास ज्या गोष्टी कार्यकारणभावाने अज्ञात आहेत, त्या कालांतराने ज्ञात होत जातील. गुण वा वैगुण्याच्या गोष्टी पाप-पुण्य वा ईश्वरकृपेशी जोडाव्यात असे मला वाटत नाही. वंशशास्त्र, गर्भधारणशास्त्र (गर्भसंस्कार नव्हे) इत्यादींद्वारे शारीरिक व मानसिक वैशिष्ट्ये व वैगुण्य यांची उपपत्ती (रिझनिंग) उमजते. त्यासाठी पूर्वकर्म किंवा अधिजैविक (एपिबोलिक) संबंध गृहीत धरण्याची गरज नाही. नैतिक विवेकबुद्धी व इंद्रिय संयमन या धर्मापेक्षा निराळ्या बाबी आहेत. त्यांचा श्रद्धेशी संबंध धर्माने जुळविला आहे. नीतीचा महिमा किंवा संयमित जीवन महत्त्व स्वतंत्र रीतीने मनुष्यास पटू शकते; पण आजवर त्यासाठी धर्माचा वापर केला आहे. ईश्वर आहे की नाही याचा स्वत: शोध घेऊन स्वत:च्या श्रद्धेची शुद्धी व रचना सुशिक्षितांनी करावी, असे तर्कतीर्थांनी या विचारांती जे सुचविले आहेत, ते सुशिक्षितांसाठी सदसद्विवेकावर जगण्याचेच सूचन होय.
drsklawate@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does god lies among educated persons tarkteerth lakshmanshastri joshi article css