‘‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना १९ नोव्हेंबर, १९६० रोजी झाली. तत्पूर्वी १ मे, १९६० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली, यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या कार्याची उपेक्षा होणार नाही, एवढेच नव्हे तर या कार्याची प्रगती होईल, या दृष्टीने निश्चितपणे पावले टाकण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. यानुसार ज्या ज्या योजना माझ्या अध्यक्षतेखाली या मंडळाने आखल्या. यातील एक – दोन सोडल्यास सबंध कार्यवाहीत आल्या आहेत.
(१९८१). मराठी भाषा इतर भारतीय साक्षर भाषांपैकी चांगल्या विकसित झालेल्या भाषांच्या श्रेणीत अत्यंत उच्च स्थानी असलेली भाषा म्हणून मान्यता पावलेली आहे. हे जरी खरे असले तरी आधुनिक ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या अभिव्यक्तीचे उत्कृष्ट सामर्थ्य तिला अजून प्राप्त व्हावयाचे आहे. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, इटालियन इत्यादी पश्चिमी भाषांच्या तुलनेने मराठी भाषा अजून मागासलेलीच आहे. तिचे अभिव्यक्ती सामर्थ्य अपरंपार आहे असे मान्य केले, तरी या सामर्थ्याला कार्यक्षम करण्याकरिता ज्या योजना आखण्यात आल्या आहेत. त्या योजनांच्या मागे अद्यायावत भाषिक तत्त्वज्ञान व विज्ञान आहे. मी या मंडळावर जोवर होतो (१९८० पर्यंत) तोपर्यंत शासन नियंत्रणाचा अडसर क्वचित निर्माण होत असे.
मुख्यमंत्र्यांना नावडणाऱ्या गोष्टीसुद्धा माझ्या अध्यक्षतेखाली घडल्या आहेत. कारागृहामध्ये बद्ध असलेल्या एका साम्यवाद्याच्या अणु- विद्योवरील पुस्तकाला मंडळाने अनुदान दिले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या एका मित्राने त्यांच्यावर लिहिलेल्या ‘वसंतराव नाईक : बहुजन समाजाचे थोर नेते’ या चरित्राला अनुदान नाकारले, परंतु त्यामुळे वसंतराव नाईकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यसक्ष रीतीने केव्हाही नाखुशी दाखविली नाही.
हे मंडळ स्वायत्त केले, तर शासनाच्या नियंत्रणाने आलेली बंधने वा अडसर उत्पन्न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु मंडळाच्या अधिकारपदावर व सदस्य पदावर असलेल्या मंडळींची बौद्धिक पात्रता आणि ध्येयधोरणांचा आवाका किती आहे. यावरच कामकाज प्रभावी व परिणामकारक होणे न होणे अवलंबून असणार. साहित्य संस्कृती मंडळातर्फे नवोदित लेखकांसाठी शिबिरे भरविण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. अन्यही काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
लेखक नवोदित असोत अथवा जुने नाणावलेले असोत, त्यांची शिबिरे घेणे, त्यांच्या चर्चा घडवून आणणे, चर्चा होत असताना गरमागरमी होणार नाही, याची दक्षता घेणे आणि एकंदरीत परिचयाचा व स्नेहाचा सोहळा साजरा करणे, असे शिबिराचे स्वरूप राहिल्यास ते स्वागतार्हच आहे, परंतु त्याच्या योगाने नवी दिशा मंडळाच्या कार्याला प्राप्त होईल की नाही, हे सांगता येणार नाही. कारण, माझ्या अध्यक्षतेखाली २० वर्षे चाललेल्या मंडळाने उद्देश व निश्चित योजना यांच्या या प्रकारच्या शिबिरांशी कसलाही अन्वय लागणे शक्य नाही.
या नव्या मंडळाचे काही निराळेच उद्देश व योजना असाव्यात; किंबहुना पूर्वीपेक्षा अत्यंत व्यापक, धाडसी व धडाडीच्या योजना कार्यवाहीत आणण्याचा मनोदय असावा असे दिसते. त्यांना जिल्हानिहाय सांस्कृतिक केंद्रे स्थापावयाची आहेत. हा उद्देश अतिशय स्तुत्य आहे, परंतु सांस्कृतिक केंद्रांचा कार्यक्रम काय हे मात्र ठरवावे लागेल. प्रत्येक जिल्ह्यात अद्यायावत रंगमंच, संगीतकारकक्षा, चित्रकारकक्षा, पदार्थ संग्रहालय, इतिहास संशोधनकक्षा, काव्यादी वाङ्मय निर्मिती-कक्षा, ऐतिहासिक स्थानांचे उत्खनन, ऐतिहासिक कागदपत्रांचे व अप्रकाशित पुस्तकांचे संग्रहालय वगैरे कितीतरी वैविध्यपूर्ण कार्यक्रम या सांस्कृतिक केंद्रातर्फे आखता येतील.
या संबंधाची त्या त्या जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक तयारी काय आहे, याचाही शोध घेतला पाहिजे. हे सर्वकाही करता येईल, परंतु कल्पनेमध्ये अत्यंत भव्य चित्र निर्माण करणे फार सोपे आहे. परंतु कार्यवाहीत आणण्याकरिता लागणारे मनुष्यबळ व अर्थबळ निर्माण करणे फार कठीण आहे. जिल्हावार अनेक सांस्कृतिक केंद्रे निर्माण करण्याची योजना फार महत्त्वाकांक्षी आहे. महत्त्वाकांक्षा प्रशंसनीय नाही असे कोण म्हणेल?’’
drsklawate@gmail.com