सध्या इसिस व इतर अतिरेकी संघटनांच्या छुप्या कारवायांना ऊत आलेला असताना देशाच्या गुप्तवार्ता विभागाच्या (आयबी) प्रमुखपदी केरळ केडरचे आयपीएस अधिकारी दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जानेवारी महिन्यात सूत्रे हाती घेणार आहेत. असे असले तरी आताच त्यांची गुप्तचर विभागात विशेष कामकाज अधिकारी (ऑफिसर ऑन स्पेशल डय़ूटी) म्हणून हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या काळात ते गुप्तचरांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत, ज्याचा त्यांना पुढील मोहिमांत अधिकाऱ्यांची निवड करताना फायदाच होणार आहे.
एक उत्तम गुप्तचर माहिती विश्लेषक म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेकदा दहशतवादी हल्ले होतात, त्यानंतर गुप्तचर खाते व सरकार यांच्यात सतर्कतेचे आदेश होते की नव्हते याबाबत जुंपते, त्यामुळे सरकार आणि गुप्तचर खाते यांच्यात ताळमेळ घालण्यात शर्मा यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. शर्मा यांच्यापुढे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून बराक ओबामा यांच्या होणाऱ्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने पहिलीच कसोटी लागणार आहे, कारण त्या वेळी गुप्त माहिती चोख ठेवावी लागेल. पाकिस्तानने काश्मीरमध्ये १९८ कि.मी.च्या आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीच्या माध्यमातून डोके वर काढले आहे. पाकिस्तानकडून वेळोवेळी गोळीबार होत आहे. ७४९ कि.मी.च्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपेक्षा आंतरराष्ट्रीय सीमेवर त्याचे प्रमाण जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या मदतीने संभाव्य हल्ले टाळणे हे एक आव्हान आहेच. शिवाय गुप्तवार्ता विभागात तीस टक्केजागा रिकाम्या आहेत त्या भरण्यासाठी त्यांना आग्रह धरावा लागेल. इसिस व देशांतर्गत दहशतवादाचा मुकाबला या गोष्टींचा सामना त्यांना करावा लागेल. त्यांची कार्यशैली भडक नाही, स्वभावानेही ते शांत आहेत. गुप्तचर अधिकारी नेहमी सतर्क असावा लागतो. त्यासाठी लागणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत. राजकीय गुप्तचर विभागापासून देशाच्या एक्स ब्रँच या विशेष गुप्तचर विभागातही त्यांनी काम केले आहे. इतर अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची संघवृत्ती त्यांच्याकडे आहे. शर्मा हे मूळ बिहारचे असून त्यांनी त्यांच्या राज्यात मात्र काम केलेले नाही. देशपातळीवर त्यांनी अनेक गुप्तचर मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यांचे शिक्षण बिहारमधील पाली खेडय़ात झाले व नंतर पदवीचे शिक्षण गया येथे झाले. भारतीय वन सेवेतही ते पात्र ठरले व नंतर आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. गुप्तचर अधिकारी असले तरी ते मितभाषी, नम्र व जमिनीवर पाय असलेले अधिकारी आहेत. प्रसिद्धीपासून सतत दूर राहिले आहेत. त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळाला असला तरी तो काही कमी नाही. या काळात त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे.