देश आणि धर्माचे रक्षण या विचाराच्या पायावर गेली ९० वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संघटनेला विस्तारासाठी यापूर्वी कधीच नव्हते एवढे अनुकूल वातावरण सध्या देशात असतानाही, गणवेशबदलाचा विचार या संघटनेत पुढे यावा याचे बुजुर्ग स्वयंसेवकांना निश्चितच आश्चर्य वाटले असेल. देशभरात जवळपास ५१ हजार नियमित शाखा, सेवाकार्याचे राष्ट्रव्यापी जाळे आणि संघविचारांचा पगडा असलेले लाखो स्वयंसेवक ही गेल्या नव्वद वर्षांची भरभक्कम पुंजी जमा करताना केवळ संघविचार मनामनात रुजविणे हेच संघकार्याचे ध्येय होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्धी चड्डी, चामड्याचा पट्टा किंवा काळी टोपी या गणवेशाचा त्या काळात कार्यविस्तारासाठी विचारही केला गेला नव्हता. कारण राष्ट्रविचार या ध्येयाशी आणि त्या विचाराशी बांधिलकी मानणारे स्वयंसेवक घडविणे हे संघकार्य आहे, असे संघाचेच मानणे होते. यातूनच संघाचा विस्तार झाला. संघाकडे आकृष्ट होणाऱ्यांनी आणि संघाशी बांधिलकी मानणाऱ्यांनी त्या त्या वेळी संघाच्या विचारांचाच स्वीकार केला हा याचा स्पष्ट अर्थ आहे. गणवेश ही संघाची केवळ बाह्य ओळख आहे, तर विचार ही संघाची अंतर्बाह्य ओळख आहे, असे संघपरिवाराचे धुरिण आग्रहाने मांडत असतात. असे असताना, अचानक, तरुण पिढीला आकृष्ट करण्यासाठी गणवेशात बदल करण्याचा आणि अर्ध्या चड्डीएेवजी पूर्ण पायजमा लागू करण्याचा विचार संघाच्या बुजुर्गांना निश्चितच बुचकळ्यात टाकणारा ठरला असावा. त्यामुळेच, रांची येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत गणवेशसंहिता बदलण्याच्या चर्चेत नापसंतीचे सूरही उमटलेच असणार यातही शंका नाही.

गणवेशात बदल करून तरुणांना आकृष्ट करण्याची वेळ येणार असेल, तर गेली नव्वद वर्षे सुमारे चार पिढ्यांना आकृष्ट करणारे विचार आता कालबाह्य होत आहेत की काय, अशी शंकाही यावेळी व्यक्त झाली असणार. काही वर्षांपूर्वी, राज्याच्या सुरक्षा यंत्रणेची सरकारी व्यवस्था असलेल्या पोलीस दलातील शिपायांनाही अर्ध्या चड्डीचाच गणवेश होता. मात्र, त्यामुळे पोलीस दलात भरती होण्यास तरुण फारसे राजी होत नसत हे लक्षात आल्यानंतर, पोलीस शिपायांच्या अर्ध्या चड्डीची जागा पूर्ण पायजम्याने घेतली. यामागे निव्वळ व्यावहारिक हेतू होता, हे स्पष्टच आहे. पूर्ण पायजम्यानिशी गणवेशाचा अाधुनिक जामानिमा, आकर्षक पगार अशा काही बाबी या पगारी नोकरांसाठी आकर्षणाच्या बाजू असू शकतात.

संघात सामील होणाऱ्यांना पगारी नोकरासारखी प्रलोभने नाहीत, तर विचार हे एकमेव आकर्षण असले पाहिजे, असाही एक सूर आता संघात उमटत असेल. मध्यंतरी संघाच्या गणवेशातील चामडी पट्ट्याएेवजी कृत्रिम चामड्याचे पट्टे वापरण्यावर खल झाला होता. त्यामागे अहिंसावादासारख्या धार्मिक भावनांचा विचार होता. अर्ध्या चड्डीवरून पूर्ण पायजम्याच्या नवविचारांमागे केवळ व्यवहारवादाचा विचार असेल, तर संघालाही विस्तारासाठी विचारांशी तडजोड करावी लागल्याचा आक्षेप पुढे आल्यास नवल राहणार नाही. तसेही, आजकाल आकर्षणाची अनेक केंद्रे आसपास फोफावलेली असताना, केवळ पूर्ण पायजमा घालावयास मिळतो म्हणून संघाकडे तरुणांचा ओघ सुरू होईल, हा विचारही गंमतीदारच आहे. तरीही, विचाराकडून व्यवहाराकडे जाण्याची एक प्रक्रिया संघातही सुरू झाली असावी असा याचा प्राथमिक अर्थ असू शकतो.

मराठीतील सर्व ई-एडिट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tailored for youth rss shorts may be replaced by trousers