विदा हा विषय गुंतागुंतीचा होत चालला असून वापरकर्त्यांची किती माहिती योग्य आणि किती अनावश्यक आणि संवेदनशील, हे ठरवण्याचा कोणताही वैधानिक साचा उपलब्ध नाही.
युरोपीय महासंघाच्या नियामकांकडून फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीला, वापरकर्त्यांची खासगी माहिती अवैधरीत्या वळती केल्याबद्दल १.२ अब्ज युरोंचा विक्रमी दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकास्थित बडय़ा खासगी तंत्रज्ञान व समाजमाध्यम कंपन्या आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये माहिती किंवा विदा वापरावरून गेली काही वर्षे सुरू असलेल्या वादाने यामुळे नवे वळण घेतले आहे खास. एकीकडे माहिती किंवा विदा म्हणजे अत्याधुनिक युगातील सोने असे म्हटले जात असताना, या माहितीचा वापर कोणी, किती व कशा प्रकारे करायचा, याविषयी नियमन व नियंत्रणाचे नवे आयाम प्रस्थापित होत आहेत. प्रस्तुत प्रकरणात अमेरिका व युरोपीय महासंघ हे बहुतांश लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य पुरस्कर्ते, तसेच श्रीमंत वादी आणि प्रतिवादी या तिढय़ात गुंतलेले असल्यामुळे युरोपीय नियामकाच्या निर्णयाचे पडसाद जगभर उमटले. जगभर डिजिटलीकरणाचे पडघम वाजू लागले आहेत. औद्योगिक आणि संगणक क्रांतीनंतर आता डिजिटलीकरणाच्या रूपाने नवी संपर्क क्रांती आपल्या सर्वाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. पण डिजिटलीकरणासाठी अत्यावश्यक बाब म्हणजे विदा. वापरकर्त्यांचा अवाढव्य विदा साठवण्यासाठी तितकेच अजस्र आदेशिकावाहक (सव्र्हर) बाळगावे लागतात. पण बहुतेक प्रमुख समाजमाध्यम कंपन्यांचे वापरकर्ते जगभर पसरलेले आणि आदेशिकावाहक मात्र अमेरिकेत अशी स्थिती. या वाहकांमध्ये बंदिस्त असलेली माहिती गोपनीय राहील, अशी हमी मेटा, गूगलसारख्या कंपन्या देत असल्या तरी ती अमेरिकी सरकारच्या हातात पडणारच नाही याची खात्री कोण देईल? टिक-टॉकसारख्या कंपन्या चिनी आहेत. तेथील वाहकांवर असलेली माहिती चिनी सरकार गिळंकृत करणारच नाही कशावरून? हे प्रश्न विविध स्तरांवर उपस्थित होऊ लागले आहेत. एकीकडे हे घडत असताना, नियमन आणि नियंत्रणाचा अतिरेक झाला तर बडय़ा तंत्रज्ञान कंपन्या तुमच्याकडे फिरकणारच नाहीत अशीही शक्यता. यातून सुवर्णमध्य कसा साधायचा, या प्रश्नाचे नेमके उत्तर अजून तरी मिळू शकलेले नाही. या मूलभूत प्रश्नाकडे वळण्यापूर्वी प्रथम युरोपीय महासंघ आणि मेटा यांच्यातील वादाविषयी.
मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: European union fine meta for violation of data protection ysh