पॅलेस्टिनींना हक्काच्या भूमीचा काही वाटा तरी देणे, त्यांच्या अस्तित्वाचा हक्क मान्य करणे हाच त्या परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचा खरा मार्ग आहे…
गाझा पट्ट्यात इस्रायलकडून सुरू असलेला वंशच्छेद थांबवणे ही मानवतेची गरज होती. ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे का असेना पूर्ण होत असेल तर त्याबाबत समाधान. जगभरातले ‘हरी’ पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर अडलेले असताना गाढवाचे पाय धरण्यामुळे का होईना पण हिंसाचार थांबणार असेल तर त्याचे स्वागत करण्याखेरीज पर्याय नाही. सद्या:स्थितीत ट्रम्प हे अशा नेत्यांचे प्रतिनिधित्व करतात ज्यांना कोणत्याही प्रक्रियेमध्ये काडीचाही रस नसतो. त्यांचे लक्ष असते तत्कालिकता. म्हणजे मथळा व्यवस्थापन. त्या त्या दिवशीच्या वृत्तशीर्षकांची बेगमी झाली की अशा नेत्यांची स्वारी पुढील घोषणा व्यवस्थापनात मग्न. पुढचे पाठ मागचे सपाट. पश्चिम आशियातील शांततेबाबत असे होण्याचा धोका स्पष्ट दिसतो. त्याबाबत भाष्य आणि भाकीत करण्याआधी हमास आणि इस्रायल यांतील शस्रासंधीच्या निमित्ताने आदिम भावभावनांचे जे नग्न, हिडीस प्रदर्शन ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून झाले त्यावर टिप्पणी आवश्यक ठरते. उत्क्रांतीच्या टप्प्यावर मानव प्रगत झाला असे सरसकट मानले जात असताना त्याच्यातील हिंसक, पुरुषी, वर्णद्वेषी प्रवृत्ती अजूनही काहींच्या जनुकांत किती प्रबळ असतात आणि निर्णय प्रक्रियेत किती महत्त्वाची भूमिका निभावत असतात हे इस्रायलच्या प्रतिनिधीसभेत—क्नेसेट—जे घडले त्यावरून दिसून येते. स्वातंत्र्यलढ्यात जनरल डायरने आपल्याकडे जालियनवाला बाग हत्याकांडात बेछूट गोळीबारात शेकड्यांनी माणसे मारली. तथापि तो गोळीबार थांबवल्यानंतर त्यापेक्षा अधिकांचे जीव वाचले; म्हणून त्याने स्वत:स शांततावादी म्हणवून घेतल्यास ज्या विकृततेचे दर्शन घडेल तिची तुलना इस्रायलमधील कालच्या समारंभाशी करता येईल.
त्यात ट्रम्प यांचे भाषण म्हणजे तर विकृततेचा अर्क. नेतान्याहू माझ्याकडे कशी एकापेक्षा एक शस्त्रे मागत होते, त्यातील काहींची नावेही मला माहीत नव्हती, नेतान्याहू हट्ट करतात म्हणून ती शस्त्रे मी त्यांना दिली आणि त्यांनी त्यांचा ‘चांगला’ उपयोग केला, हे ट्रम्प यांचे विधान. जालियनवाला बागेत नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार करणारा जनरल डायर आणि गाझात महिला /बालके /रुग्णालये यांवर एकापेक्षा एक संहारक शस्त्रे डागून हजारोंचे प्राण घेणारे नेतान्याहू यांत फरक करणे अवघड. नेतान्याहू यांच्या या ‘‘चांगल्या’’ शस्त्र वापरात ६४-६५ हजारांचे प्राण गेले आणि त्यात २० हजार बालके आहेत. दुसरी बाब या उभयतांच्या भाषा वापराची. इस्रायलच्या ताब्यात जे कोणी पॅलेस्टिनी नागरिक होते त्यांचा सरसकट उल्लेख कैदी असा केला गेला. आणि त्याच वेळी हमासने ज्या इस्रायलींना डांबून ठेवले होते ते मात्र सरसकट ओलीस म्हणून संबोधले गेले. हा फरक वरकरणी सूक्ष्म वाटेल. परंतु त्यातून या उभय देशप्रमुखांच्या मानसिकतेचे दर्शन होते. इस्रायलने पकडलेल्या सर्व पॅलेस्टिनींना कैदी असे संबोधल्याने ते जणू सर्व गुन्हेगार आहेत असे ठसवण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच वेळी हमासच्या ताब्यातील इस्रायलींना ओलीस असे ठरवून त्यांच्या निरपराधित्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. हमासने दोन वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात ज्या इस्रायलींना ओलीस ठेवले ते गुन्हेगार नव्हते हे खरे. पण म्हणून इस्रायली सुरक्षारक्षकांनी पकडलेला प्रत्येक पॅलेस्टिनी हा गुन्हेगार नव्हता, हेही तितकेच खरे. या अशा शब्दप्रयोगांतून इस्रायली— त्यातही श्वेतवर्णीय —यहुदी आणि श्वेतवर्णीयांचा अग्रहक्क मान्य करणाऱ्यांच्या पक्षातले ट्रम्प यांची खरी मानसिकता आणि वृत्ती दिसून येते. केवळ लष्करी बळाचा अभिमान एखाद्या देशाने किती बाळगावा हाही प्रश्न. इतरांचे भले करण्यापेक्षा वाईट करू शकणाऱ्याचे वृत्तमूल्य अधिक असते. परंतु म्हणून वाईट करण्याच्या क्षमतेचाच उदो उदो करणे अयोग्य. ते सारे क्नेसेटमध्ये घडले.
त्या मानाने त्यानंतर इजिप्तमधील पश्चिम आशिया शांतता परिषदेचे आयोजन अधिक गांभीर्यपूर्वक होते. या परिषदेसही युद्धखोर नेतान्याहू यांस ट्रम्प यांचे बोट धरून हजर राहावयाचे होते. तशी घोषणाही झाली होती. परंतु टर्कीचे एर्दोगान यांनी प्राणपणाने विरोध करून नेतान्याहू यांच्या या परिषदेतील उपस्थितीला विरोध केला. त्यामुळे नेतान्याहू यांचे एक मिरवणे टळले. एर्दोगान यांच्या राजकारणाबाबत एरवी बरे म्हणावे असे काही नाही. तथापि त्यांनी ज्या पद्धतीने नेतान्याहू यांस रोखले ती बाब कौतुकास्पद. काही अरब देशांनीही एर्दोगान यांस पाठिंबा दिला, तो योग्यच. कारण हमासच्या नि:पातासाठी काहीही गरज नसताना इस्रायलने कतारची राजधानी दोहा शहरावर हल्ला केला. कतार हा अमेरिकेचा मित्रदेश. त्यालाही नेतान्याहू यांनी हात घातल्यानंतर ट्रम्प यांना भान आले आणि मग त्यांनी गाझातील वंशसंहार थांबवण्यासाठी हालचाल सुरू केली. गाझातील हिंसाचार असाच सुरू ठेवणे यापुढे अमेरिकेसाठी घातक असेल हा मुद्दा ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे इजिप्तमधील परिषदेत नेतान्याहू यांना झालेला विरोध रास्तच ठरतो. पश्चिम आशियातील अशांततेचे एक कारण खुद्द नेतान्याहू हेच आहेत. आपल्यावरील भ्रष्टाचाराचा खटला अधिकाधिक लांबणीवर पडावा या हेतूने त्यांनी स्वत:च्या देशास युद्धस्थितीत ठेवले. ट्रम्प यांच्या भाषणातही याचा उल्लेख झाला. हे अमेरिकी अध्यक्ष इतके बेमुर्वतखोर की त्यांनी इस्रायलच्या अध्यक्षांस आवाहन करून नेतान्याहू यांस माफ करा असे सुचवले. इतका हुच्चपणा हा ट्रम्पादी नेत्यांचे वैशिष्ट्य. तेव्हा या असल्या नेत्यांनी एकत्र येण्यास भले शांतता परिषद म्हटले गेले असेल. पण त्या परिसरात शांतता नांदावी यासाठी ना त्या परिषदेत काही घडले ना त्याआधी इस्रायलमध्ये. जे काही झाले त्याची तुलना एखाद्या सम्राटास त्याच्या मनसबदारांनी मानवंदना देण्यास एकत्र येण्याशी करता येईल. तो केवळ ट्रम्पारती सोहळा होता.
त्या वातावरणात दखलपात्र ठरते ते एकाच व्यक्तीचे वक्तव्य. ती व्यक्ती म्हणजे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (दुसरे). इजिप्तमधील कथित शांतता परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीस विस्तृत मुलाखत दिली. ‘‘जोपर्यंत पॅलेस्टिनींसाठी त्यांच्या हक्काच्या भूमीचा विचार होत नाही तोपर्यंत या परिसरात शांतता नांदणे अशक्य’’ असे मत राजे अब्दुल्ला या मुलाखतीत स्पष्ट मांडतात. ते अत्यंत वास्तववादी ठरते. याचे कारण गाझा, वेस्टबँक, गोलन टेकड्या आदी परिसरांत इस्रायली करत असलेली घुसखोरी हे तेथील अशांततेचे खरे आणि मूळ कारण आहे. आताही ‘हमास’च्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा दाखला अनेक जण देतात. हा हल्ला अजिबात समर्थनीय नाही. तो निंदनीयच. तथापि त्याआधी हमासने चर्चा, वाद/ संवाद अशा अनेक सनदशीर मार्गांनी आपल्या मायभूमीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. वास्तविक या परिसराचे मूळ नाव पॅलेस्टाईन हेच आहे. इस्रायल तिथे नंतर आला. एक इमारत उभारण्यास परवानगी मिळाल्यावर वखवखलेल्या विकासकाने साऱ्या जंगलालाच चूड लावावी तसे इस्रायलने पॅलेस्टाईनचे चालवले आहे. सर्व पॅलेस्टिनींना हुसकावून साऱ्या प्रांतावर यहुदी ध्वज फडकावणे हे त्या देशाचे ध्येय. त्यामुळे जॉर्डनचे राजे म्हणतात त्याप्रमाणे पॅलेस्टिनींना हक्काच्या भूमीचा काही वाटा तरी देणे, त्यांच्या अस्तित्वाचा हक्क मान्य करणे हाच त्या परिसरात शांतता प्रस्थापित करण्याचा खरा मार्ग आहे.
त्यास हात न घालता अमानुष हिंसाचार इस्रायलने थांबवला म्हणून शांतता निर्माण होईल असे मानणे मूर्खपणाचेच. बारमाही रक्तपिपासूने सटीसहामाशी रक्तदान केले म्हणून त्याच्या दातृत्वाचे किती कौतुक करायचे याचा विवेक हरवून कसे चालेल?