झेमिन यांच्या काळातही पाश्चिमात्य नेते चीनकडे संशयाने पाहात, पण बाजारकेंद्री अर्थव्यवस्था सरकारी नियंत्रणातही फुलवता येते हे झेमिन यांनी दाखवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे अध्यक्षपद प्रदीर्घकाळ भूषवलेल्या जियांग झेमिन यांचे नुकतेच ९६ व्या वर्षी निधन झाले. काही महिन्यांपूर्वी सोव्हिएत महासंघाचे माजी अध्यक्ष मिखाइल गोर्बाचेव्ह निवर्तले, ९० व्या वर्षी. निव्वळ वयाचा विचार केल्यास दोघांचेही मृत्यू म्हणजे युगसमाप्तीच. परंतु दोघांचीही कारकीर्द अधिक लक्षात राहील, ती युगपरिवर्तनाचे साक्षीदार आणि सहभागीदार म्हणून. दोघेही सर्वगुणसंपन्न अजिबातच नव्हते. परंतु परिवर्तनाची आवश्यकता का असते आणि तसे घडू देण्यातच वैयक्तिक, संकुचित स्वार्थापलीकडे वैश्विक प्रतलातले सामूहिक हित कसे साधले जाऊ शकते, नव्हे, ते साधले गेलेच पाहिजे याचे किमान भान या दोघांकडे होते. दोघांना मिळालेले यश सारखे नव्हते. गोर्बाचेव्ह यांच्या पश्चातला रशिया अधिक विस्कटण्याच्या मार्गावर आहे. झेमिन यांच्या पश्चातला चीन तुलनेने अधिक समृद्ध, स्थिर बनला. परंतु आज या दोन्ही देशांचे सत्ताधीश जगाला अधिक अस्थिर, असुरक्षित बनवायला निघाले आहेत. व्लादिमिर पुतिन आणि क्षी जिनपिंग यांच्यामुळे सध्याच्या जगाला जितका धोका आहे, तितका तो बहुधा करोनासारख्या महासाथी आणि वातावरण बदलामुळेही उद्भवत नसेल! रशिया खरे तर पृथ्वीतलावरील मोजक्या खनिजसंपन्न देशांपैकी एक. परंतु गोर्बाचेव्ह यांच्यासारख्याकडून मिळालेला लोकशाहीचा आणि नैसर्गिक समृद्धीचा वारसा जपण्याची परिपक्वता पुतिन यांच्यात अजिबात दिसत नाही. चीनला जागतिक व्यापारप्रवाहाशी जोडले झेमिन यांनी. यातूनच चीन हे उत्पादन आणि संपत्तीनिर्मितीचे मोठे केंद्र बनले. परंतु झेमिन यांचा हा वैश्विक दृष्टिकोन जिनपिंग यांच्या ठायी नसावा, हा संशय आता खरा ठरू लागलेला दिसतो. भ्रष्ट साम्यवाद झुगारून देणारा लोकशाही पाया गोर्बाचेव्ह यांच्या परिवर्तन आणि खुलेपणाच्या धोरणांनी रचला. पुतिन यांनी त्याच्या गाभ्यालाच धक्का पोहोचवला. स्पर्धाभिमुख व्यापारी धोरणाच्या प्रवाहात झेमिन यांनी चीनला आणले. जिनपिंग यांचा चीन हा बाजार अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्ष्यात अधिक भांडखोर, बचाववादी आणि संकुचित बनलेला दिसून येतो. थोडक्यात दोघांनीही वारशातून मिळालेली चौकट उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधलेला दिसतो. पण यातून निर्माण झालेली गुंतागुंत सोडवण्याची क्षमता दोन्ही नेत्यांमध्ये नाही, कारण दृष्टिकोनाचा अभाव! या अभावाचा उद्भव आत्मकेंद्री वृत्तीत आणि तारणहार मानसिकतेत असतो.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on former chinese president jiang zemin and xi jinping approach zws
First published on: 03-12-2022 at 03:15 IST