भाजी मंडईत जावे आणि पहिल्याच गाळ्यात दिसणाऱ्या शुभ्र फ्लॉवरने मन प्रसन्न होऊन तो खरेदी करण्यासाठी मन करावे आणि लगेचच शेजारच्या गाळ्यातील कोबीने चित्त आकृष्ट करून घ्यावे, असे काहीसे आपल्या शिक्षणाचे झाले आहे. काय खायचे आहे, हे कळत नाही आणि काय खायला आवडेल, ते सांगता येत नाही, अशा परिस्थितीत सगळे जण ज्या मार्गाकडे धावतात, तिकडेच पळत राहणे अधिक श्रेयस्कर अशी सगळ्या पालकांची भूमिका असते. गेल्या दोन दशकांत इंग्रजीतून शिकले, तरच ज्ञान मिळते, अशा समजातून महाराष्ट्रातील शिक्षणाचा बाजार भरवला जातो आहे. नर्सरीपासून त्या लहानग्यांवर इंग्रजीच्या संस्कारांचे जे काही आक्रमण सुरू होते, ते शेवटपर्यंत संपत नाही. इंग्रजी माध्यम हाच यापुढील काळातील यशाचा महामंत्र आहे, यावर आता मराठी कुटुंबांचे एकमत झाले आहे. जास्त पैसे दिले, की चांगले शिक्षण मिळते अशा आणखी एका समजाने सगळ्यांना ग्रस्त केलेले असल्याने, जास्त शुल्कवाल्या शाळा शोधण्याचे काम सुरू होते.  त्याचा परिणाम असा झाला, की महाराष्ट्रातील शिक्षणाच्या बाजारात इतके दिवस असलेल्या शिक्षण पद्धतींच्या पलीकडे नव्या पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या परदेशातील शाळांची संख्या वाढू लागली. महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने शाळा काढणे हे सर्वात सोपे आणि कष्टहीन. कदाचित त्यामुळेही महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीचा दर्जावर परिणाम होत गेला. त्यामुळे सीबीएसई या दिल्लीतील परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमांना हळूहळू महाराष्ट्रात स्थान मिळू लागले. निवडक शाळांमध्ये तो अभ्यासक्रम शिकवला जाऊ लागल्यानंतर, कालांतराने एसएससी आणि सीबीएसई अशी तुलना होऊ लागली आणि विशिष्ट घरातील मुलांसाठी सीबीएसईचा पर्याय स्वीकारला जाऊ लागला. हे कमी की काय म्हणून आता अन्य देशातील शिक्षण पद्धतींनुसार शिकवणाऱ्या शाळांचा शिरकाव शिक्षणाच्या बाजारात झाला असून, त्या शाळा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या आंतरराष्ट्रीय शाळांची संख्या गेल्या काहीच वर्षांत लक्षणीयरीत्या वाढते आहे. केम्ब्रिजमधील आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या आयजीसीएसईच्या (इंडियन जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) शाळांची संख्या गेल्या दोन वर्षांत पंधरा टक्क्यांनी वाढली आहे, हा त्याचा पुरावा. कोरिया, जपान, जर्मनी, फिनलंड यांसारख्या देशांतील शिक्षण पद्धती आता भारतीय शिक्षणाच्या बाजारात प्रवेश करू लागल्या आहेत. गेल्या सहा दशकांत देशातील प्राथामिक आणि माध्यमिक शिक्षणाबाबत र्सवकष विचार करून लवचीकता आणण्यात आपल्याला अपयश आले आहे. शिक्षणाचा रोजगाराशी असलेला संबंध या शिक्षण पद्धतीत आपल्याला दृढ करता आला नाही. शिक्षणाने सुसंस्कृतताही येईनाशी झाली आणि नोकरीही मिळेनाशी झाली, अशा कोंडीत सापडलेल्या भारतीय पालकांना नव्या कल्पनांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातील पहिला पर्याय इंग्रजी माध्यमाचा होता. तो चांगलाच रुजला. इतका की मराठी माध्यमांच्या शाळा आचके देऊ लागल्या. आता केवळ इंग्रजी माध्यमाच्याही पुढे जाऊन नव्या शिक्षण पद्धतींचे आकर्षण वाढू लागले आहे. ज्या शिक्षण पद्धती विशिष्ट देशात यशस्वी झाल्या, त्या भारतात तेवढय़ाच यशस्वी होतील, याबाबत खात्री देता येत नाही. मात्र सातत्याने वेगवेगळे बदल करून नवनवे प्रयोग करण्यास त्या पद्धती समर्थ ठरतात. आपण आपल्या शिक्षणात तातडीने बदल करून भारतीय संदर्भात बाजाराच्या गरजा आणि त्यासाठीचे शिक्षण यांची सांगड घातली नाही, तर काही काळाने भारतात परदेशी शिक्षण पद्धतींनाच प्राधान्य मिळत जाईल. केंद्र सरकारने हे आव्हान तातडीने पेलण्याची तयारी करायलाच हवी.