प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे शरीरातील वायुतत्त्वाचे पाच भाग मानले जातात. यांनाच पंचप्राण म्हणतात. यापैकी‘प्राण’ हा श्वसन आणि रक्ताभिसरणाचं मुख्य कार्य करतो. फुप्फुसं, हृदय, रक्तवाहिन्या यांना तो शक्तीपुरवठा करतो. देहधारणेचा प्रमुख आधार हा प्राणच असतो. ‘अपान’ हा जननेंद्रियं आणि गुदद्वारात कार्यरत असतो. शरीरातील विविध उत्सर्जनाच्या क्रिया याच्याद्वारे नियंत्रित असतात. उदाहरणार्थ मलमूत्रविसर्जन, पोटातील वायू बाहेर टाकणे, वीर्यस्खलन आदी. याचाच अर्थ शरीरातील दूषित घटक जे आहेत ते मलमूत्राच्या रूपानं शरीराबाहेर टाकायला हा वायू जसं साह्य करतो तसंच मानवी जन्माची साखळीही तो अबाधित राखतो. अन्नाचं पचन जसं माणसासाठी आवश्यक आहे, तसंच मल-मूत्राचं उत्सर्जनही आवश्यक आहे. ते कमी-जास्त प्रमाणात झालं तरी शरीर रोगग्रस्त होतं. ‘व्याना’चा संचार सर्व शरीरभर असतो. जिथे जिथे प्राणशक्ती कमी पडते तिथे तिथे हा तिचा पुरवठा करतो. त्याचबरोबर हा वायू आपल्या बुद्धीलाही शक्तीचा पुरवठा करतो. ‘उदान’ या शब्दातच ऊध्र्वगामी संकेत आहेत. देहाला जणू उन्नत उभं राहण्याची शक्ती हा वायू पुरवतो. हात, पाय आणि डोके यांचं कार्य हा उदान वायू नियंत्रित करतो. पंचेंद्रियांचं कार्य, मेंदूतील अनच्छिक संस्थेचे कार्य या उदान वायूमार्फत चालते. वांती, ढेकर या क्रियाही या वायूच्या योगानं होतात. ‘समान’ वायू हा प्राण आणि अपान यांच्यात समन्वय राखतो. नाभीलगत त्याचं स्थान असून पचनासाठी लागणारी प्राणशक्ती हा वायू पुरवतो. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक पाचकरस योग्य स्थानी प्रवाहित करण्यातही याच वायूचा वाटा आहे. शरीराला आवश्यक अशी पोषक द्रव्येही तो साठवतो. शरीराला आवश्यक ऊर्जा निर्माण करणं आणि शरीर क्रियाशील राखण्यात या वायूचा मोठा वाटा आहे. (संदर्भ पुस्तक : सर्वासाठी प्राणायाम, लेखिका – डॉ. विनिता जोशी). पण हे सारं सोडा आणि एक सोपी गोष्ट लक्षात घ्या. प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान ही नावंसुद्धा एखाद्याला माहीत नसली म्हणून त्याचं काही अडतं का? त्याच्या देहात हे वायू आणि त्यांचं कार्य थांबतं का? तर नाही! इतकंच नाही, तर ज्या देहात आपण जन्मापासून आहोत त्या देहातील रक्तनिर्मिती ते रक्ताभिसरण, पचन ते मलमूत्र विसर्जन इथपर्यंतच्या स्थूल क्रिया तसंच श्वसन, स्मरण, मनन, बोधन, चिंतन अशा सूक्ष्म क्रिया या कशा माझ्या कर्तृत्वाशिवाय अविरत सुरू असतात; हे तरी आपल्याला कळतं का? आपल्याला उमगत नसूनही या क्रिया अखंड होतच असतात ना? तर अशा या देहात हे वायू पंचप्राण बनून कार्यरत असले तरी सगळा मिळून प्राणवायू एकच आहे. त्याप्रमाणे योगी भिन्नत्वात अभिन्न असतो आणि अभिन्नत्वाचे संस्कार रुजवत असतो. समन्वयानं तो कार्यरत राहण्याची प्रेरणा देत असतो. दुसरी गोष्ट अशी की माणूस श्वासावाटे जो वायू आत घेतो तो वायू आणि वातावरणातला वायू यात काही भेद असतो का? आतला आणि बाहेरचा वायू परस्परांबाबत भेदबुद्धी राखतात का? अवधूत म्हणतो, ‘‘प्राणु असोनि देहाभीतरीं। बाह्य वायूसी भेद न धरी। तशी योगिया भावना करी। बाह्यांभ्यंतरी ऐक्यता॥४२१॥ ऐक्यता साधावी चतुरीं। ते वायूच्या ऐसी दोहींपरी। बाह्य आणि अंतरीं। ऐक्यकरीं वर्तावें॥४२२॥’’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). या ओव्यांतून एक गूढमधुर बोध नाथ साधकाला करीत आहेत. तो जाणून घेऊ.
– चैतन्य प्रेम