एकनाथ महाराज यांच्या ‘एकनाथी भागवता’च्या आधारानं आपलं हे सदर सुरू आहे. सद्गुरूशी एकात्मभाव कसा स्थापित होऊ शकतो, याबाबत नाथांनी केलेला बोध जाणून घेणं, हा या सदराचा हेतू आहे. सदर सुरू असताना बाह्य परिस्थितीच्या प्रभावात चिंतनाला जुंपायचं नाही, हा दंडक आपण आजवर पाळत आलो आहोत. याचं कारण बाहेरची परिस्थिती सतत पालटणारी असते. आध्यात्मिक चिंतन हे अनेक वर्षांनीही वाचलं जाऊ शकतं. त्यामुळे, ते माणसाचं जे चिरंतन सुख आणि चिरंतन दु:ख आहे त्यांचाच विचार करतं. त्यातला बोध हा कोणत्याही काळात तितकाच सुसंगत आणि मार्गदर्शक असतो. पण तरीही आजच्या परिस्थितीचं गांभीर्य आणि व्याप्ती, तसंच या संकटाला सामोरं जाताना मनाची धारणा कशी टिकवायची हा साधकाच्याही मनात उमटणारा प्रश्न लक्षात घेता, या वळणावर मुख्य प्रतिपाद्य विषयाला स्वल्पविराम* देत आपण आजच्या परिस्थितीत साधनारत व्यक्तीनं कोणत्या धारणेवर मन स्थिर करावं, याचा विचार करणार आहोत.
आज विषाणुसंसर्गामुळे मृत्यूची भीती कमालीची वाढली आहे. मृत्यूच्या वास्तवाला साधनापथावरील माणूस धीरानं सामोरं जायला शिकत असतोच. पण या वेळी मृत्यू हा एकटय़ादुकटय़ाच्या परिघापुरता नाही. कुणा एकाचा हलगर्जीपणा हजारोंच्या जीविताला धोकादायक ठरू शकतो, हे जाणून आपण आपल्या बाजूनं सार्वजनिक आरोग्यासाठीच्या कर्तव्यांचं काटेकोर पालन केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, श्रीगोंदवलेकर महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘काळजी घ्या, पण काळजी करू नका!’ हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण धीरानं परिस्थितीला सामोरं जावं आणि त्याच वेळी इतरांचा धीरही खचू देऊ नये. भीतीजनक ‘बातम्या’ पसरवू नयेत. शक्यतो एकांतवासात राहावं.
या एकांतवासाचा उपयोग आत्मबळ, शरीरबळ, मनोबळ वाढविण्यासाठी करावा. सकारात्मक वाचावं, सकारात्मक विचारांवर चिंतन आणि मनन करावं. अनेक आध्यात्मिक ग्रंथ घरात पडून असतात. ते निवडून वाचावेत, त्यातील प्रेरक प्रसंग आणि काही उद्बोधक वाक्ये लिहून काढावीत. त्यावर चिंतन करावं. बरं आध्यात्मिकच कशाला? अनेक कर्तृत्ववंतांची चरित्रं, आत्मचरित्रं किंवा त्यांनी लिहिलेली वैचारिक पुस्तकं, यातूनही अध्यात्मसाधनेला पूरक आणि पोषक असं बरंच काही गवसू शकतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुणी आपलं मनोधैर्य कसं टिकवलं, आशेचा एकही किरण दिसत नसताना निराशेच्या गर्तेत कोण कसं गेलं नाही, याही गोष्टी अशा ग्रंथांतून साधकाला टिपता येतील. याचबरोबर संतांचे काही अभंग वाचून त्यावर मनन करावं. हे अभंग म्हणजे मनाला आधार, ऊर्जा, नवसंजीवनी देणारे अमृतबिंदूच असतात. या सर्व चिंतनाच्या आधारे जगण्याकडे नव्यानं पाहावं. मृत्यूची भीती मनातून काढून टाकावी. प्रारब्धाच्या सिद्धांतावर विश्वास असेल, तर आपला मृत्यू कधी होणार, कसा होणार, हे पूर्वीच ठरलं असतं, हे पटेल. त्यामुळे मृत्यूची भीती बाळगत जगण्याऐवजी माणूस म्हणून जगण्याची जी अनमोल संधी लाभली आहे ती अधिक सार्थकी लावायची, हाच निर्धार या घडीला केला पाहिजे. आणि या संकटातून बाहेर पडल्यावरही तो निर्धार कायम राहिला पाहिजे!
– चैतन्य प्रेम
* या स्वल्पविरामाच्या काळात, चैतन्य प्रेम यांचेच ‘तत्त्वबोध’ हे सदर बुधवारपासून काही दिवस सुरू राहील
