– चैतन्य प्रेम
आसक्ती आणि स्नेहसूत्र, या दोन्हीमुळे माणूस दु:ख भोगतो, असं अवधूत सांगतो. ‘स्नेह’ म्हणजे दुसऱ्याबद्दलचा आत्मीय भाव आणि मग त्यानं दु:ख कसं होईल, असं आपल्याला वाटतं. पण इथं ‘स्नेहसूत्र’ म्हटलं आहे. इथं सूत्र म्हणजे पाश. तर आसक्ती आणि ममत्वाचा पाश हा दु:खदायकच असतो, असं अवधूत सांगत आहे. ते दु:खदायक का? तर, आसक्ती आणि स्नेहपाशानं माणूस परतंत्र होतो. म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय, हिताचं काय आणि अहिताचं काय, हे बुद्धीला समजत असूनही जे मनाला आवडतं तेच कृतीत येत असतं. म्हणजेच माणूस सद्बुद्धीच्या नव्हे, तर आसक्तीच्या अधीन होऊन वावरू लागतो. अवधूत म्हणतो, ‘‘आसक्ति आणि स्नेहसूत्र। या दोन्हींपासाव दु:ख विचित्र। पदोपदीं भोगिती नर। अस्वतंत्र होउनी।।५४९।।’’ म्हणून कुणी कुणाबाबतही आसक्तीयुक्त स्नेहभाव ठेवू नये. तो ठेवला, तर दु:खभोग वाटय़ाला येणं अटळ आहे (यालागीं भलतेनी भलते ठायीं। आसक्ति स्नेहो न करावा पाहीं। अतिस्नेहो मांडिजे जिंहीं। दु:ख तिंहीं भोगिजे।।५५०।।). आता दु:ख का भोगावं लागेल? कारण जिथे आसक्ती आहे, तिथे अपेक्षा आहेत, दुराग्रह आणि हट्टाग्रह आहे. जिथे अपेक्षा आहेत, तिथे अपेक्षाभंगाचीही शक्यता आहे. अपेक्षाभंगाइतकं माणसाला सलणारं दुसरं दु:खच नाही! श्रीगोंदवलेकर महाराज यांचं एक फार मार्मिक बोधवचन आहे. ते म्हणतात, ‘‘गोष्टी मनासारख्या होत नाहीत हे आमच्या दु:खाचं कारण आहे, की मुळात त्या गोष्टी आमच्या मनात आहेत हेच दु:खाचं कारण आहे?’’ याचाच अर्थ आमच्या अपेक्षा या बहुतेक वेळा अवास्तवच असतात. पण त्यांच्या शक्याशक्यतेचा विचारही आम्ही करीत नाही. त्यांच्या पूर्तीसाठी आम्ही अतिशय हळवे असतो, तळमळत असतो. त्यामुळे त्यांच्या पूर्ततेत अडथळे आले की, ‘‘न होता मनासारिखे दु:ख मोठे,’’ या न्यायानं मनावर आघात होऊन आम्ही दु:खाच्या खाईत कोसळतो. तर सर्वाबाबत स्नेहभाव राखण्यात अडचण नाही, पण आसक्तीयुक्त स्नेह असेल तर तो बाधकच आहे, असं अवधूत सांगतो. मग या सूत्राला अनुसरून कपोत-कपोतीची कथा अवधूत सांगतो. ती रूपकात्मकच आहे. कपोत पक्षी हा सर्वसामान्य माणसाचंच प्रतीक आहे. हा कपोत प्रियेच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला होता, की जणू जन्माचा उद्देश, जीवनाचा हेतू केवळ तोच आहे असं तो मानत होता. जीवनाच्या वास्तविक परमहेतूबद्दल त्याला सावध करावं, तर तो ते ऐकून न ऐकल्यासारखं करून पुन्हा आपल्या प्रियेच्या प्रेमगोडीतच वाहवत जात असे. अवधूत त्यासाठी माशीचं उदाहरण देत म्हणतो की, ‘‘बैसली साकरेवरी माशी। मारितांही नुडे जैशीं। तैसा भोगितां विषयांसी। जरामरणासी नाठवी।।५६७।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). साखरेवर, मिठाईवर माशी बसते. तिला कितीही हाकला; हाकलू तेवढय़ापुरती ती उडते आणि लगेच परत येऊन बसते. तसा विषयगोडीत गुंतलेल्या माणसाच्या मनात यौवनाचाच असा उन्माद असतो, की वृद्धत्व आणि मृत्यूचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. समजा तो शिवलाच, तरी तो वेगानं त्या विचारांना हाकलतो आणि स्वत:ला त्वरेनं विषयगोडीत अधिकच गुरफटवून घेतो. विषयसुखात वाईट काहीच नाही. पण जीवन तेवढंच नसतं. जीवनात अनेक अनपेक्षित वळणंही येतात, त्यांचं भान तरी माणसाला असावं, हा अवधूताच्या सांगण्यामागचा एक हेतू आहे.