– चैतन्य प्रेम

प्रिया आणि पिल्लांच्या मृत्यूनं कपोताला जीवनातलं कामसुख, प्रेमसुख आणि वात्सल्यसुख हरपल्याची जाणीव झाली. या सुखाचे आधार स्थूल असले तरी त्या सुखासाठी या आधारांची मनात असलेली ओढ, त्यांच्यावरील भावनिक अवलंबणं हे अतिशय सूक्ष्म असतं. जे सूक्ष्म असतं त्याचा प्रभाव फार व्यापक, सखोल आणि मोठा असतो..

कपोत हा सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. या कपोताच्या निमित्तानं अवधूत यदुराजाला काही बोध करीत आहे. पण प्रत्यक्षात योगी अवधूत आणि विरक्त यदुराजा यांच्या निमित्तानं ‘श्रीमद् भागवत’ साधकालाचं बोध करीत आहे. साखरेचं आवरण असलेलं औषध असावं तशी आमची ही पुराणं आहेत. त्यातील कथा सर्वसामान्य माणसाचं चित्त वेधून घेत होत्या, पण त्या वेष्टनातून खरा बोधही सूक्ष्मपणे रुजत होता. तेव्हा कपोताच्या निमित्तानं हा बोध जे साधन मार्गावर प्रामाणिक वाटचाल करू इच्छितात त्यांच्याचसाठी आहे. काय आहे हा बोध? तर कोणत्याही वासना मनात उद्भवणं स्वाभाविक आहे, पण त्यांच्या पूर्तीला मर्यादा आहेत. कामवासना स्वाभाविक आहे, हे समाजही मान्य करतो, मात्र म्हणून ती कशीही उपभोगायला समाजाचे कायदे मान्यता देत नाहीत. तेव्हा स्वाभाविक, नैसर्गिक वासना, ऊर्मी यांनाही मर्यादा आहेत. त्यात मोठी मर्यादा काळाची आहे. कारण या जगात वावरण्याचं, ‘सुख’ अनुभवासाठीचं माध्यम असलेला देह हा काळाच्याच पकडीत आहे. हा देह स्थूल आहे, पण मन सूक्ष्म आहे. ‘सुख’  अनुभवण्यासाठी स्थूल देह माध्यम असला तरी प्रत्यक्ष सुखानुभव वा दु:खानुभव घेणारं मन सूक्ष्म आहे. जे सूक्ष्म आहे ते अधिक प्रभावी आणि टिकणारं आहे. त्यामुळे मृत्यूनं देह नष्ट झाला तरी अनंत संस्कारांनी भरलेला मनाचा वासनापुंज कायम असतो! या वर्षांचं खातं पुढील वर्षी सुरू राहावं तसा हा वासनापुंज पुढील जन्मी सोबत असतो. त्यामुळेच स्वामी यतीश्वरानंद यांची जी दोन विधानं आपण पाहिली होती ती जाणणं फार महत्त्वाचं आहे. ती जाणून घेण्यासाठीची ही पार्श्वभूमी आहे! कारण गृहासक्ती-देहासक्ती वरवर पाहता स्थूल आहे, दृश्य आहे. कारण घर आणि देह या दोन्ही गोष्टी स्थूल, दृश्य जगातल्या आहेत. पण त्यांच्या आसक्तीच्या मुळाशी असलेली कामनासक्ती आणि कामासक्ती अत्यंत सूक्ष्म आहे. अहंभावाचं पोषण ती करत असते. साधकाचा सात्त्विक भाव वाढू लागताच तीच कामनासक्ती अलगद सत् भावाचा मुखवटा धारण करीत करुणा, प्रेम, संवेदना, सद्भाव, वात्सल्यभाव धारण करते. या भावांचा आधार घेत साधक जगावर प्रेम करू लागतो. पण खरंच तो जगावर प्रेम करतो का? की त्याला सुखाचा आधार भासणाऱ्या निवडक जगावरच प्रेम करतो? त्या प्रेमाला सात्त्विकतेचा मुलामा देत आपल्या सूक्ष्म कामनांचीच पूर्ती करीत राहतो? अंतर्मुख करणारा हा प्रश्न आहे!

chaitanyprem@gmail.com