स्वरूपाचं भान प्राथमिक पायरीवर मला जपता येणार नाही, पण माझ्या जीवनाकडे तटस्थपणे पाहण्याचा अभ्यास मला बरेच साह्य़ करील. या तटस्थपणातून जे मनन साधेल, जे चिंतन साधेल त्यातून कर्मातील आसक्ती आणि भ्रमही सुटू लागेल. ही र्कमही कशी होणार आहेत? तर ती निपजणार आहेत! ती आपोआप होणार आहेत. पण त्या वेळी हे साधका तू कसा असला पाहिजेस, तर ‘स्व’भावात तन्मय! ‘स्व’चा जो मूळ शुद्ध भाव आहे त्याच भावात ‘स्व’स्थ राहून तू तुझ्याकडून होणारी कर्मे पाहणार आहेस. मग कर्म पूर्ण झाल्यावर त्या कर्मावर तू माझ्या भावनेचा शिक्का उमटवणार आहेस. अर्थात हा शिक्का ‘कृष्णार्पर्णमस्तु’ हाच आहे. विनोबांचं एक विलक्षण वाक्य आहे. ते म्हणतात, ‘‘फुलाला वजन नाही. परंतु त्यातील भक्तीला ब्रह्मांडाचे वजन आहे.’’ अगदी त्याचप्रमाणे कर्म मग ते लहानसं का असेना, ते भगवद्भावानंच केलं गेलं असेल तर त्यातील भावामुळेच ते कर्म कुसुमांत रूपांतरित होतं आणि त्यानंच भगवंताची खरी पूजा घडते! ‘गीता-प्रवचने’मध्ये विनोबा सांगतात : कर्म हे नोटेप्रमाणे आहे. भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे, कर्माच्या कपटय़ाला नाही.. कर्म एकच. परंतु भावनाभेदामुळे अंतर पडते. संसारी मनुष्याचे कर्म आत्मबंधक ठरते. परमार्थी मनुष्याचे कर्म आत्मविकासक होते (पृ. २४, २५). कर्म कुणालाही सुटत नाही. संसारी माणूसही र्कम करतो आणि साधनारत माणूसही कर्म करतोच. पण विनोबांच्या सांगण्यानुसार, संसारी मनुष्याचं कर्म आत्मबंधक ठरतं. परमार्थी मनुष्याचं कर्म आत्मविकासक होतं. याचं कारण एकच भावनाभेद! कर्म कोणत्या भावनेनं केलं जातं, कशा प्रकारची भावना मनात ठेवून केलं जातं, याला फार महत्त्व आहे. प्रापंचिकाचं कर्म त्याच्या भावनेच्या अनुसारच आत्मबंधक ठरतं तर परमार्थी मनुष्याचं कर्मही त्याच्या भावनेच्या अनुसारच आत्मविकासक ठरतं.  प्रपंचातच ज्याचं मन आसक्त आहे त्याचं कर्मही संकुचित हेतूनंच होतं. ‘मी’ आणि ‘माझे’पुरतंच कर्म होत असल्यानं ते बाधक आणि बंधकच होतं. परमार्थी मनुष्याचं कर्म भगवद्भावानं व्याप्त असतं आणि कर्तव्याची सीमारेषा ते कधीच ओलांडत नाही. त्यामुळे ते आत्मविकासकच होतं. विनोबांनी टॉलस्टॉयचं वाक्य उद्धृत केलं आहे. ते असं की, ‘‘लोक ख्रिस्ताच्या त्यागाची स्तुती करतात, परंतु हे सांसारिक जीव रोज किती रक्त आटवतात आणि काबाडकष्ट करतात! पक्क्या दोन गाढवांचा भार पाठीवर घेऊन आटाआटी करणारे हे सांसारिक जीव, यांना ख्रिस्तापेक्षा किती अधिक कष्ट. ख्रिस्तापेक्षा किती अधिक यांचे हाल! याच्या निम्मे कष्ट आणि हाल जर हे देवासाठी सोसतील तर ख्रिस्ताहून मोठे होतील!’’ विनोबा सांगतात की, ‘‘सामान्य मनुष्य आपल्या फळाभोवती कुंपण घालतो. अनंत मिळणारे फळ अशामुळे तो गमावून बसतो. सांसारिक मनुष्य अपार कर्म करून अल्प फळ मिळवतो आणि कर्मयोगी थोडेसे करूनही अनंतपट मिळवतो. हा फरक केवळ एका भावनेने होतो.. सांसारिक मनुष्याची तपस्या मोठी असते, परंतु ती क्षुद्र फळासाठी असते.’’ (पृ. २३).