हेन्री किसिंजर हे शंभर वर्षे जगले, अखेरपर्यंत बुद्धी शाबूत ठेवून कार्यरत राहिले, याचे कौतुक त्यांच्या निधनानंतर होते आहेच. पण अनेकांच्या मते किसिंजर हे ‘युद्ध गुन्हेगार’ होते. त्यांसारख्या युद्ध गुन्हेगाराचे एकांगी कौतुक करणे हे कोणत्याही नैतिक मापदंडात बसत नाही, असे मलाही वाटते म्हणून हे लिहितो आहे. मूर्तभंजक म्हणून प्रसिद्ध असणारे ब्रिटिश पत्रकार व लेखक ख्रिस्तोफर हिचेन्स यांनी ‘द ट्रायल ऑफ हेन्री किसिंजर’ हे पुस्तक लिहिले, त्यात त्यांनी किसिंजर यांना युद्ध गुन्हेगार ठरवले आणि पुढे अनेकांनी हा उल्लेख मान्य केला. किसिंजर यांच्यावर युद्ध गुन्ह्यांबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात कधी खटला दाखल झाला नसला, तरी त्यांच्या मृत्यूनंतरही ‘रोलिंग स्टोन’ या अमेरिकन नियतकालिकाने वारंवार ‘युद्ध गुन्हेगार’ असा त्यांचा उल्लेख करूनच निधनाची बातमी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे का? याचे उत्तर मिळवण्यासाठी अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या परराष्ट्र धोरणांची मांडणी करणाऱ्या या महोदयांच्या कारनाम्यांबाबत बोलणे महत्त्वाचे ठरेल. किसिंजरबद्दल बोलताना व्हिएतनाम, कम्बोडिया आणि चिलीबद्दल न बोलणे अन्यायकारक ठरेल. अमेरिकन हितसंबंध जपायचे, याच एका भूमिकेला अग्रस्थानी ठेवून किसिंजर यांनी शीतयुद्ध काळात सोव्हिएत रशियाकडे झुकलेल्या सर्व देशांना शत्रू राष्ट्राप्रमाणे वागवले. जिथे जिथे डाव्या पक्षांचे सरकार अस्तित्वात आले तिथे तिथे डॉमिनो इफेक्ट वाढवण्यासाठी (म्हणजे एखाद्या कम्युनिस्ट देशाला नेस्तनाबूत करून अन्य देशांमधली कम्युनिस्ट सत्ता संपवण्यासाठी) अमेरिकेने सक्रिय हस्तक्षेप केले. चिलीमध्ये १९७० पासून साल्वादोर अलेन्दे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने डावे सरकार सत्तेवर आले होते. अमेरिकेविरोधी विचारधारेचे समर्थन केल्यामुळे अमेरिकेने कधीही अलेन्दे यांच्या सरकारला सार्वभौम देशाप्रमाणे वागणूक दिली नाही. ‘किसिंजर केबल्स’ या तत्कालीन गोपनीय, पण नंतर उघड झालेल्या कागदपत्रांतून किसिंजर यांनी कशाप्रकारे चिलीचा क्रूर लष्करी हुकूमशहा ऑगस्टो पिनोशे याच्या सप्टेंबर १९७३ मधील मदत केली होती हे उघडकीस आले. पुढे कित्येक दशकांपर्यंत या क्रूर पिनोशेने मानवाधिकार उल्लंघनाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले. अंगोलामधील गृहयुद्धाच्या वेळी किसिंजर यांनी सोव्हिएत विरोधी गटांना खुली मदत केली. कित्येक देशांतील थेट अमेरिकन हस्तक्षेपांची यादी किसिंजर यांच्या कार्यकाळातच तयार झाली.

हेही वाचा – सर्वाधिक लिहिता-लिहिले गेलेला मुत्सद्दी!

किसिंजर यांच्या सर्वात वादग्रस्त कामांंच्या यादीत कम्बोडिया सर्वात अग्रस्थानी येते. एखादी व्यक्ती अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशातील अमेरिकी लोकप्रतिनिधींच्या (काँग्रेसच्या) परवानगीशिवाय कम्बोडियामध्ये अत्यंत गुप्तपणे लाखो टन बॉम्बहल्ले करण्याची योजना यशस्वीरीत्या पार पाडते ही एक विलक्षणीय अपवादात्मक बाब म्हणून इतिहासात नोंदवली जाईल. कम्बोडिया, लाओस आणि व्हिएतनाम या देशांत त्या काळात हवाई मार्गाने टाकलेले आणि तेव्हा न फुटलेले बॉम्ब आजही शेती वगैरे करताना अचानक फुटतात. आजही किसिंजर महोदयांनी केलेल्या गुन्ह्यांची फळे दक्षिण आशियाई देशांना झेलावी लागतात. बांगलादेशमधील नरसंहार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या मागे ठामपणे उभे राहिलेले व्यक्तिमत्व देखील हेन्री किसिंजर हेच. इंडोनेशियाने पूर्व तिमूरमध्ये केलेल्या हल्ल्यालादेखील किसिंजर महोदयांची संपूर्ण साथ होती.

‘ऑपरेशन काँडोर’ची सुरुवातदेखील किसिंजर महोदयांनी केली. दक्षिण अमेरिकेतील हुकूमशाहांच्या समन्वयासाठी स्थापन झालेल्या या मोहिमेने असंख्य वेळा मानवाधिकारांचे उल्लंघन केले मात्र हे सर्व किसिंजर यांची तथाकथित ‘वास्तववादी भूमिका’ म्हणून नजरेआड करण्याची रीत अमेरिकी विद्वानांनी रुळवली. अमेरिकेच्या मैत्रीचे फायदे घेणाऱ्या युरोपीय देशांनी ती मान्यही केली.

हेही वाचा – मतदारांना सारे कळते, म्हणूनच भाजपबद्दल शंका वाढते…

राष्ट्रपती निक्सन यांच्या वॉटरगेट मालिकेतील पत्रकारांच्या टेप प्रकरणातदेखील या महोदयांचे नाव येते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पार पाडलेल्या कार्यकाळात ‘सीआयए’ या अमेरिकी गुप्तचर संस्थेने अनेक अमानुष कारवाया केल्या. या युद्धगुन्ह्यांची मालिका न संपणारी आहे. उत्तर व्हिएतनामशी गुप्त बोलणी सुरू करून १९६८ च्या अमेरिकन निवडणुकीत अप्रत्यक्षपणे हस्तक्षेपाचे प्रयत्नदेखील करून झाले.

अमेरिका ज्या कथित लोकशाही व मानवाधिकारांच्या संरक्षणाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा नेहमीच करते, त्यांचा पोकळपणा सिद्ध करण्यासाठी किसिंजर हे एक व्यक्तिमत्व पुरेसे आहे! किसिंजर यांनी निवृत्तीनंतर शस्त्रास्त्रे तयार करणाऱ्या भांडवलशाही कंपन्यांसोबत ‘लॉबिइस्ट’ म्हणून काम केले. भारतात जिचे आगमन वादग्रस्त ठरले आणि पुढे जी दिवाळखोरीत निघाली त्या ‘एन्रॉन’ कंपनीसाठीही ते या प्रकारचे काम करत होतेच. किसिंजर यांनी खुलेपणाने ‘काही अपवादात्मक परिस्थितीत’ व्यूहात्मक अणुआयुधांच्या वापरास समर्थन दिलेले होते. राष्ट्रपती जिमी कार्टर यांच्या कार्यकाळात किसिंजर महोदयांचे प्रस्थ काहीसे कमी झाले होते. सोव्हिएत युनियन व अमेरिकेतील शस्त्रास्त्र स्पर्धा संपविण्यासाठी होणाऱ्या ‘साल्ट’ (स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन टॉक्स) चर्चेची पहिली फेरी यशस्वी झाल्याचे पाहाताच, या चर्चेच्या दुसऱ्या फेरीला किसिंजर यांनी विरोध केला होता. अखेर किसिंजर यांच्यासारखेच अमेरिकन सिनेटदेखील विरोधात गेल्यामुळे ही बोलणी यशस्वी झाली नाहीत. अशा अनेक घटना आहेत जिथे अप्रत्यक्षपणे त्यांनी अमेरिकन धोरणांवर छाप सोडली. अमेरिकन विस्तारवादी भूमिकेचे समर्थन करणाऱ्या थिंक टँकसोबत ते आयुष्याच्या शेवटपर्यंत जोडलेले राहिले. मोठमोठ्या पदांवर असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना या नैतिक भूमिकेतून पाहण्याची गरज आहे.

तरीही अशी वादग्रस्त व्यक्ती ‘शहाणी’ असू शकते, ज्या व्हिएतनामध्ये बेछूट बॉम्बफेकीला खुली मुभा त्यांनीच दिली ते युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी १९७३ सालचे नोबेल पारितोषिकही (शांततेचे!) मिळवले! कारण इतिहासातील बहुतांश बडे युद्धगुन्हेगार (वॉर क्रिमिनल) सहसा चाणाक्ष बुद्धीवादीच होते. आंतरराष्ट्रीय संबंध व किसिंजर हे एक वेगळेच नाते आहे, फक्त किसिंजर यांच्या कर्तबगारीची मांडणी करताना आपण इतर बाबींची दक्षता घेण्याची नैतिक गरज असते.

prathameshpurud100@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation of war criminal on kissinger another side of kissinger personality ssb