या पदाचा मुकुट काटेरीच..

या पदावर झालेल्या वादानंतर अनेक अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली

या पदाचा मुकुट काटेरीच..
प्रतिनिधिक छायाचित्र

अनिश पाटील

मुंबई पोलीस आयुक्त पद हे राज्यातील सर्वात मानाचे पद समजले जाते. या पदाचा इतिहास १८६४ पासूनचा आहे. पण ही खुर्ची जेवढी मानाची, तेवढीच काटेरी मुकुटासारखी आहे. मुंबई हे राज्याचे सत्ताकेंद्र आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा पोलीस आयुक्त बनण्याचे स्वप्न प्रत्येक आयपीएस अधिकारी उराशी बाळगून असतो. १९८० नंतर मुंबईची वाढ अधिकच झपाटय़ाने होत असताना ज्युलिओ रिबेरो, द. शं. सोमण, वसंत सराफ, रॉनी मेंडोन्सासारख्या अधिकाऱ्यांनी या पदाची उंची आणखी वाढवली, हा इतिहास आहे. सत्ताकेंद्राच्या जवळ असल्याचे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाभोवतालचे छोटे वादही राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरतो. तसेच त्यांच्याविरोधातील आरोपही सत्तेच्या दरबारी लवकर पोहोचतात. त्यामुळे काही नामवंत अधिकाऱ्यांना तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले.

या पदावर झालेल्या वादानंतर अनेक अधिकाऱ्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी त्याआधीची सारी वर्षे कमावलेल्या प्रतिष्ठेला गालबोट लागले. अशांच्या यादीत, ‘सुपरकॉप’ म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश मारिया, तडफदार अधिकारी अरूप पटनायक यांची नावे होती. पोलीस आयुक्त पदावर असताना हे अधिकारी वादात अडकल्यानंतर त्यांची बदली अथवा बढती देऊन त्यांना पदावरून हटवण्यात आले. मात्र परमबीर सिंह यांची गोष्टच निराळी.. मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावर असताना निलंबनाची कारवाई झालेले ते पहिलेच, आणि नंतर काही आठवडे न्यायालयात साक्ष देण्याऐवजी ‘कुठे तरी बेपत्ता’ झालेलेही परमबीर सिंह हे पहिलेच.

या परमबीर सिंह यांना अंबानी स्फोटक प्रकरण भोवले. त्यानंतर त्यांच्याविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल झाले. याच प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सीबीआय या सर्व प्रकरणांबाबत तपास करत आहे. यापूर्वी राकेश मारिया यांना शीना बोरा प्रकरणानंतर तडकाफडकी पदोन्नती देऊन या पदावरून हटवण्यात आले. मारिया यांनी केलेले काम पाहिले, तर ते पोलीस आयुक्त पदानंतर थेट पोलीस महासंचालक पदावर विराजमान होतील, असे कयास लावले जायचे. पण शीना बोरा प्रकरणानंतर मारिया यांची बदली गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी करण्यात आली. त्याच पदावरून पुढे ते निवृत्त झाले. याशिवाय डॅिशग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अरूप पटनायक यांनाही आझाद मैदान दंगलीनंतर बदलीला सामोरे जावे लागले होते. पण ही यादी तेवढीच नाही. १९९२च्या दंगलीनंतर पोलीस आयुक्तांची बदली करून अमरजीतसिंग सामरा यांना आणण्यात आले होते. अर्थात, मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाच्या इतिहासात कोणत्याही घटनेने सर्वाधिक अधिकाऱ्यांचा बळी घेतला असेल, तर ते तेलगी प्रकरण! आर.एस. शर्मा त्या वेळी महासंचालक पदाच्या स्पर्धेत होते. पण त्यांची सर्वच स्वप्ने या प्रकरणाने धुळीला मिळवली. आयपीएस अधिकाऱ्यांमधील राजकारण व राजकीय हस्तक्षेप हे विषयही या वादांना तेवढेच खतपाणी देणारे आहेत. अशा वादांपासून दूर राहिलेली, चोख कारकीर्द असलेली नावे कमी.. त्यापैकी रिबेरो हे एक आहेत. 

anish.patil@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about mumbai police commissioner post zws

Next Story
महाराष्ट्रातही आणीबाणीखोर भयगंड
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी