मिथिला राऊत

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

भारतीय मुस्लीम पहलगामच्या घटनेचा निषेध करत होते आणि या समुदायापैकी काहीजण अनपेक्षित हल्लेही झेलत होते…

जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या भीषण हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ पुरुषांची निर्दयपणे हत्या केली, त्यापैकी एक स्थानिक काश्मिरी मुसलमानही होता. या क्रूर घटनेने भारतभर संतापाची लाट उसळली. भारताच्या कानाकोपऱ्यातून या अमानुष आणि नृशंस हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. सर्व धर्मांतील लोक तसेच धर्मगुरू, सामाजिक संस्था आणि राजकीय नेत्यांनी या दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध केला. परंतु स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या काही भारतीयांनी देशातील विविध भागांत ‘पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याचा बदला’ म्हणून, ज्यांचा त्या हल्ल्याशी किंवा त्यामागच्या दहशतवादाशी काहीही संबंध नाही तसेच हा दहशतवादी हल्ला ज्यांच्या नियंत्रणाखाली देखील नाही, अशा भारतीय लोकांवरच  हल्ला केल्याच्या, त्यांना धमक्या दिल्याच्या घटना घडल्या- हे निरपराध लोक मुस्लीम समुदायातील होते. या प्रकारच्या काही घटना अशा :

(१) उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये, २८ एप्रिल २०२५ रोजी एका मुस्लिम विद्यार्थ्याकडून जबरदस्तीने पाकिस्तानी झेंड्यावर लघुशंका करविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यात काही तरुणांनी त्या विद्यार्थ्याला घेरले असून, शिवीगाळ करत जबरदस्तीने हे कृत्य करवताना दिसत आहे.

(२) उत्तर प्रदेश मधील शामली जिल्ह्यातील तोडा गावात घडलेल्या एका घटनेत, सरफराज नावाच्या २५ वर्षीय युवकाने आरोप केला की, २६ एप्रिल रोजी त्याच्या गोविंद नावाच्या शेजाऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. सरफराजच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने मारहाण करताना “२६ मारले, तुमचेही २६ मारू” अशी धमकी दिली. (Kumar, 2025)

(३)  उत्तराखंड राज्यातील मसुरी येथे शबीर अहमद डर, काश्मीरमधील रहिवासी, गेली २० वर्षे पश्मीना शाली विकतात. काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, एका उजव्या विचारसरणीच्या गटाने त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्याला  मारहाण केली व दुकाने उद्ध्वस्त केली. शबीर म्हणाला, ‘पहलगाम हल्ल्याबद्दल आम्हाला दोष देण्यात आला आणि शहर सोडून पुन्हा कधीही न येण्याची धमकी देण्यात आली.’

(४)   पंजाबमधील डेहरा बस्सी येथील युनिव्हर्सल ग्रूप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये २३ एप्रिल २०२५ रोजी एक गंभीर घटना घडली. काश्मिरी विद्यार्थ्यांवर त्यांच्या होस्टेलमध्ये हल्ला करण्यात आला.

(५)   हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील खरावर गावात मुस्लिम कुटुंबांना २ मेपर्यंत गाव सोडण्याचा आदेश देण्यात आला. दी६पक मलिक आणि इतर काही गावकऱ्यांनी व्हॉट्सॲप गटावर पहलगाममधील घटनेबद्दल पाठवलेल्या संदेशात मुस्लिम कुटुंबांना गावातून हटवण्याची मागणी केली. १५ मुस्लिम कुटुंबांना गाव सोडण्याचा ठराव देण्यात आला असून, त्यातील बहुतेक लोक नजीकच्या कारखान्यांमध्ये मेकॅनिक, कामगार किंवा लहान-मोठे कचरा विक्रेते म्हणून काम करतात.

(६)   मुंबईच्या दादरमध्ये २४ एप्रिल रोजी सोफियान शाहीद अली नावाच्या २१ वर्षीय युवकाला रोहिंग्या मुस्लिम समजून धमकावून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात भाजपच्या माहीम विभाग अध्यक्ष अक्षता तेंडुलकर व इतर नऊ जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा रीतसर दाखल करण्यात आला; तर अक्षता तेंंडुलकर यांनी तक्रारदारच खोटे बोलत असल्याची बाजू फेसबुकवर मांडली. पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार नोंदवणारे सौरभ मिश्रा मुंबईच्या दादर मार्केटमध्ये टॉवेल विक्रीचा गाडा एकंदर सहा कामगारांसह चालवतात, त्यापैकी सोफियान हा कामगार उत्तर प्रदेशचा असून गेल्या सहा महिन्यांपासून मिश्रांसोबत काम करत आहे.

(७)  मुंबईतील सांताक्रूझजवळील वाकोला येथे २६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाइनचे झेंडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर लावले होते. यापैकी पॅलेस्टाइनच्या झेंड्याचा अपमान करू नये अशी मुस्लीम समुदायातील तरुणांनी मागणी केली. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला, ज्यात काही जण जखमी झाले. या घटनेची सत्यता तपासण्यासाठी ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ सेक्युलॅरिझम’ची टीम गेली असता समजले की, वाकोला मधील ‘गोळीबार’या भागात हिंदू-मुस्लीम लोक बऱ्याच वर्षांपासून एकोप्याने राहतात, ते एकमेकांच्या सड-समारंभांतही सहभागी होतात. पण गेल्या दोन– अडीच वर्षांपासून हिंदू – मुस्लीम  समुदायांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. आजवर त्यांना यश आले नव्हते. परंतु या वादामध्ये काहीही संबंध नसलेल्या अबरार शेखला त्याने घातलेल्या टी शर्ट वर ‘असीम’ हे नाव लिहिले होते म्हणून बजरंग दलाच्या कार्यकार्त्यांनी मारले असल्याचे, अबरारचा भाऊ असीम याने सांगितले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना न्याय मिळावा, हा उद्देश या बहुसंख्याकवादी राजकारण करू पाहणाऱ्यांच्या या वर्तनातून दिसून येत नाही. उलट, या भयंकर हल्ल्याचा वापर समाजात मुस्लिमांविषयी द्वेष पसरवण्यासाठी केला जात असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते. पाकिस्तानातील काही दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष कृत्याचा सूड भारतातील सामान्य मुस्लिम नागरिकांकडून घेणे हे ना नैतिकदृष्ट्या योग्य आहे, ना कायदेशीरदृष्ट्या

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामागे आतंकवाद्यांचा, सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. ७ मे रोजी पहाटे १:४४ वाजता भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ८ मे रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “जम्मू आणि काश्मीर तसेच इतर ठिकाणी सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हे कट उधळून लावण्यात आले हे सरकार आणि भारतीय जनतेचे श्रेय आहे”. त्या पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवाद्यांचा सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा कट अयशस्वी करण्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे श्रेय आहे त्यात भारतीय मुस्लीम देखील सहभागी आहेत.

 जर भारतात मुस्लीम समुदयावर कोणत्याही घटनेच्या निमित्ताने हल्ले होत राहिले, त्यांना धमकावले जात असेल, तर पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राचा भारतात सामाजिक द्वेष निर्माण करण्याच्या हेतूला प्रोत्साहन मिळेल. इतिहास दर्शवतो की जिथे सामाजिक स्थिरता बिघडते, तिथे आर्थिक स्थैर्यदेखील ढासळते. आणि अशा परिस्थितीत, त्या समाजातील दुबळ्या व्यक्तींना सर्वाधिक फटका बसतो, मग ती व्यक्ती कोणत्याही धार्मिक समुदायाची असो. भारतातील मुस्लीम समुदायातील निरपराध नागरिकांवर हल्ला करणे हे राष्ट्रवादाचे लक्षण नाही, उलट अशा कृती देशाच्या एकात्मतेला आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवतात.

याला दुसरी आशादायक बाजूही आहे…

अनेक इस्लामी विद्वानांनी इस्लामच्या नावावर केले जाणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. काहींनी  कुरआनमधील अध्याय ५, आयत ३२ चा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे: ‘जो कोणी एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव घेतो, त्याने जणू संपूर्ण मानवजातीचा जीव घेतला; आणि जो कोणी एखाद्याचे प्राण वाचवतो, त्याने जणू संपूर्ण मानवजातीचे प्राण वाचवले.’

भारताची खरी ओळख ही भारताच्या विविधतेतील एकतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ३० मार्च २०२५ रोजी सांगितले की, विविध सण आणि नववर्ष साजरे होणे ही भारताच्या विविधतेतील एकतेची भावना दर्शवते. ‘मन की बात’मध्ये बोलताना त्यांनी सर्वांना ईदसह सणांच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेची भावना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.  वेगवेगळे सण साजरे करून विविधतेतील एकतेचा वारसा जपणाऱ्या भारतीयांनी, दहशतवादाचा ठाम निषेध करत आपली एकता आजवर दाखवली आहे.

मुस्लिम समाजाने या दहशतवादी हल्ल्याचा ठामपणे निषेध केला आहे. जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, आसाम, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरून दहशतवादाविरोधात शांततेत निषेध नोंदवला. जमीयत उलेमा-ए-हिंद, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमात-ए-इस्लामी हिंद यांसारख्या प्रमुख मुस्लिम संघटनांनी देखील या हिंसाचाराचा तीव्र निषेध करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, प्रमुख मुस्लिम संघटनांनी हा इस्लामच्या शांततेच्या संदेशाच्या विरोधात असल्याचे सांगितले.  भारतीय मुस्लिमांची प्रमुख धार्मिक संघटना असलेल्या ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’ने दहशतवादाला ‘कॅन्सर’ म्हटले असून शांततेच्या संदेश देणाऱ्या इस्लामी तत्वाच्या विरोधात जात असल्याची टीका दहशतवाद्यांवर केली

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian muslim condem pahalgam terror attack violence against muslims after pahalgam terror attacks zws