विचार, भावनाआणि कृती यांचा सुसंगम म्हणजे मानसिक आरोग्य सुदृढ असल्याची पोचपावती. या अर्थाने, पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वती या महान नद्यांच्या संगमावर १३ जानेवारीच्या पौष पौर्णिमेपासून २६ फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीपर्यंत सुरू असलेला ‘कुंभमेळा’ हा मानवी मनोविष्काराचे दर्शन ठरतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आध्यात्मिक प्रगती आणि मोक्षप्राप्ती यांबरोबरच ‘मानवत्वा’मुळे आत्म्याला आणि अस्तित्वाला जोडली जाणारी पापे धुऊन काढण्यासाठी या पवित्र पाण्यात स्नान करणे हा या सोहळ्याचा गाभा आहे. या सोहळ्याशी ‘धर्म’ जोडला गेलेला आहे यात दुमत नाहीच, परंतु मानसशास्त्रीयदृष्ट्या, मानवी स्वभावाचे अनेक पैलू या निमित्ताने दिसतात, हे रंजक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा कुंभमेळ्याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले, ते आध्यात्मिक व धार्मिक पार्श्वभूमीमुळे नक्कीच; परंतु सेलेब्रिटीजनी त्यास हजेरी लावल्यामुळेही. या हजेरीमुळे धर्म न मानणारे किंवा धर्म सोयीने अवलंबणारे असे दोन्ही मनोविष्कार इथे दिसतात. काहीजण लांबचा खडतर प्रवास करून पायी पोहोचतात, काही गाड्याघोड्यातून, काहींचा थेट विमान- हेलिकॉप्टरमधून एअरड्रॉप!

काहीजण केवळ एक अनुभव म्हणून गर्दी करताहेत तर काही इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आपले फोटो टाकून लाइक्स मिळवायला. काहींचे कारण आश्चर्य आणि अचंबा आहे तर काही नियम आणि नियमिततेचे धनी आहेत. काहींसाठी हे धर्मनिष्ठता आहे तर काहींसाठी केवळ कुतूहल! स्वास्थ्य आणि स्वच्छता या पैलूंपेक्षा, आत्मिक आणि आध्यात्मिक प्रवासावर अधिक भर इथे स्वाभाविकच दिसून येतो. या पवित्र पाण्यातील हे शाही स्नान किंवा ही डुबकी मानवी आत्मपरीक्षणाचे दर्शन आहे. ‘माझी पापे धुतली जावीत’ अशा धारणेने एखादी व्यक्ती या कुंभमेळ्याचा भाग बनते तेव्हा ‘मी पापे केलेली आहेत’ हा तात्त्विक विचार मुळात असतो, हे नमूद करावे लागेल. (कोणीही मोकळेपणी हे कबूल करणार नाही, किंवा अनेकांच्या हे जाणिवेतही नसेल, पण) आपण विश्लेषण करतो आहोत त्यामुळे आपण हे अध्याहृत धरूया.

हा सोहळा निसर्ग आणि परमेश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे द्याोतकही मानला जातो. आपल्याहून अधिक आणि उच्च शक्तींपुढे नतमस्तक होण्याचा आणि स्वत:कडे प्रसंगी कमीपणा घेण्याचा हा सोहळा. गतजीवनाकडे डोळसपणे पाहून, पाप-पुण्याचा विश्लेषणात्मक आलेख मांडून, बोध घेऊन पुढची वाटचाल नव्या कोऱ्या दृष्टिकोनातून, अधिक जागरूकतेने करण्याचा निर्धार म्हणजे हा सोहळा आहे.

सामूहिक आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा हे या सोहळ्याचे महत्त्वाचे तत्त्व आहे. तिकडच्या ‘गर्दी’त एकसंधपणा आहे. एक ध्येय, एक भूमिका, एक भावना, एक वर्तन, एक उपचार-सोपस्कार आहे. या सामायिक स्वरूपाच्या व्यक्तिमत्त्वामुळे कदाचित तो जनसागर लोकांना सुखसोयींचा अभाव निर्माण करणारा न वाटता प्रेरणादायी वाटतो. समूहाचा भाग बनून त्यातून आपले जीवनसंवर्धन करणे हा मानवी स्वभाव आहे. या मानवी स्वाभाविकतेचे दर्शन म्हणजे हा सोहळा जात-पात, धर्म आणि मनुष्यत्वाला जोडले गेलेले- मानवानेच तयार केलेले बाह्य स्वरूपाचे भेद या पवित्र पाण्यात विरघळून गेलेले दिसतात. यातून आपल्या संस्कृतीचा सर्वसमावेशक दृष्टिकोन जाणवतो. या गर्दीतली अनामिकताही कदाचित लोकांना मुक्त विचार आणि विहार करायला प्रोत्साहित करत असावी. सर्वजण एका उद्देशाने, एकाच उपचारात गुंतल्यामुळे कोणी कुणाला कमी लेखत नाही, त्यांच्या वर्तनाची कारणमीमांसा करत नाही, कोणाच्या कोणाहीकडून काही अपेक्षा नाहीत, अनोळखी असूनही सारेजण एका सामूहिक बंधनात आहेत आणि त्यामुळे कदाचित काही लोकांना तिथे अनिर्बंध अवस्थेचा प्रत्यय येत असावा. या सोहळ्याला अस्तित्वात्मक (एग्झिस्टेन्शिअल) आणि अनुभवजन्य (एक्स्पीरिएन्शिअल) पैलूंची जोड आहे. मानसशास्त्रात सिगमंड फ्रॉइड यांनी ‘कॅथार्सिस’ ही संकल्पना प्रथम मांडली आत्मिक क्लेश आणि दडलेल्या, त्रास देणाऱ्या भावना मनातून बाहेर काढून टाकून, एका अर्थाने त्यांचा निचरा करणे म्हणजे ‘कॅथार्सिस’ किंवा मनोशुद्धी. कुंभमेळा हा या अर्थानेसुद्धा, तिथे सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी तात्त्विकदृष्ट्या कुंभमेळ्याशी जोडल्या गेलेल्या पण तिथे हजेरी न लावलेल्या व्यक्तींसाठीसुद्धा, मनोशुद्धी वेळोवेळी करत राहावी असा बोध देणारा आहे.

आत्मपरीक्षण नियमित करावे हे आपणा सर्वांना काही वेगळे सांगायला नको परंतु त्याचा अवलंब आपण किती नियमितपणे करतो, हा प्रश्नच आहे. आत्मपरीक्षणामध्ये प्रामुख्याने आपल्या अस्तित्वाची, निर्णयांची, वर्तनाची, विचार-भावनांची अप्रिय बाजू आपल्याला दिसू लागते आणि स्वाभाविकच आपण या बाजूकडे पाहणे टाळतो. या सोहळ्यातील सहभाग याही प्रक्रियेला चालना देण्याचे काम करतो.

दैनंदिन जगण्यात बऱ्याचदा आपि चुकलेले नसतोही परंतु परिस्थिती किंवा लोक आपले मूल्यमापन त्या दृष्टीने करत नाहीत. यामुळे आपल्याला अपमानित आणि अन्यायग्रस्त वाटते. न्याय मागणे आणि मिळवणे हा मानवी आग्रह असतो आणि त्यामुळे स्वाभाविकच आपली त्या दिशेने वाटचाल सुरू असते. इतरांनी ‘आपण चुकलो नाही,’ असे आपल्याला म्हणावे, ही आपली सुप्त इच्छा असते. बऱ्याचदा आपण एखादा निर्णय घेतो- तो बरोबर आहे ना याची शाश्वती आपल्याला दुसऱ्याने दिली तर आपल्याला अधिक खात्री वाटते. याला मानसशास्त्रात बाह्य प्रमाणीकरण (एक्स्टर्नल व्हॅलिडेशन) म्हणतात. हा सोहळा बऱ्याच लोकांसाठी हे व्हॅलिडेशन देणारा ठरल्यासारखा आढळून आलेला दिसतो. बाह्य स्वरूपाचे हे प्रमाणपत्र घेऊन आणि त्याला आत्मिक कृतज्ञतेची जोड देऊन लोक या सोहळ्याहून परततात.

अब्राहम मास्लो यांच्या ‘हायरार्की ऑफ नीड्स’ (मानवी गरजांची उतरंड) या सिद्धान्तानुसार, मानवी जीवन आणि त्यातील गरजा पिरॅमिडसारख्या आकाराच्या आधाराने समजून घेता येतात. मूलभूत गरजा हा या पिरॅमिडचा पाया आहेत तर ‘सेल्फ अॅक्च्युअलायझेशन’ हा त्याचा कळस. स्वत:च्या प्रतिभेची जाणीव आणि प्राप्ती, यांतून होणारा आत्मसाक्षात्कार हा मानवी अस्तित्वाचा परमोच्च क्षण आहे असे हा सिद्धान्त सांगतो. ‘कुंभमेळा’ हा लोकांना या साक्षात्काराच्या दिशेने वाटचालीस प्रेरित करेल हे मानायला हरकत नसावी. या सोहळ्याचा अनुभव घेऊन परतणाऱ्या लोकांच्या कथनांवरून हे निदर्शनास येते खरे. त्यांच्या कथनांतून, तेथील वातावरण, तीव्र आणि घटकेत बदलणारे हवामान या अडचणींना सामोरे गेल्याच्याही गोष्टी कानांवर येतात. पण आधी म्हटल्याप्रमाणे, तेथील अनुभव हा लोकांना भारावून टाकणारा आहे हे नमूद करायला मात्र कोणीही विसरत नाही.

अडचणींतून मार्ग काढून, निग्रह असल्यास वेळप्रसंगी नमते घेण्याकडे, जागरूक आणि नियमित आत्मपरीक्षण करण्याकडे कल असल्यास आणि अचूक वेळी गरुडझेप घेण्याकडे दृष्टी केंद्रित केल्यास यश मिळवता येते ही शिकवण या सोहळ्यातून मिळाल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे .

कुंभमेळा हा वरकरणी ‘संगमात स्नान’ इतकाच भासत असला तरी त्याचे तात्त्विक अर्थ आणि निकष हे या नद्यांच्या पवित्र मानले गेलेल्या पाण्याइतकेच खोल आहेत. जीवनाचा ‘कुंभ’ तर सोय/गैरसोय, चांगले/ वाईट, सशक्त/ अशक्त, अहंकार/ समर्पण या परस्पपरविरोधी तत्त्वांनी भरलेला आहे. यातून सुयोग्य विचार-आचार-भावना यांचा समन्वय आपण कसा साधतो आणि ‘मेळ’ कसा घालतो हीच खरी परीक्षा आहे आणि तिला ठरावीक कालावधी नसून, ती नियमित आणि निरंतर आहे.

ketkigadre10@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh mela 2025 bathing at the sangama during the kumbh mela amy